Baramati News : वनविभागाच्या हद्दीत मानवनिर्मित वणव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बारामती वनविभागाने पुढाकार घेतला आहे. बारामतीतील जैवविविधतेला वणव्यांमुळे असलेला धोका लक्षात घेऊन, असे वणवे लावणाऱ्यांस कायदेशीर मार्गाने दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते, असा इशारा वनविभागाने दिला आहे.
तसेच जंगलास आग लावणाऱ्याचे नाव व पुरावे वनविभागास दिले तर अशा नाव कळवणाऱ्यास वनविभागाकडून योग्य बक्षीस दिले जाणार आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जंगलातील पालापाचोळा, गवत, छोटे रोपे हे वाळलेले कुजलेले असते व ते ज्वलनशील बनते. तसेच तापमानवाढीमुळे ते आणखीनच ज्वलनशील बनते. बारामती तालुक्यात असलेले जंगल हे बहुतेक माळरानचे जंगल असून, त्यामध्ये बहुतांश पानगळ उन्हाळ्यात होते.
अशा वेळी जंगलात नैसर्गिक अथवा कृत्रिम वणवा लागण्याची शक्यता असते. तसेच वनविभागाचे नसलेले इतर शासकीय जमीन व खासगी जमीनक्षेत्र हे पडीक असून, त्यावरही सरपटणारे प्राणी, कीटक, किडे, मुंग्या, पक्षांची अंडी अशा प्रकारे जैवविविधता विकसित झालेली असते. तेथेही मोठ्या प्रमाणात आगी लागतात तेथे वनविभागास काम करायला कायदेशीर अडचणी येतात.
वणवा लागला की जमिनीवरील गवत जळून जाते ती जमीन भाजली जाते पर्यायाने पाऊस पडल्यावर त्या जमिनीवरील माती वाहून मोठ्या प्रमाणात जमिनीची धुप होते. जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी आणखीन खोल जाते. सजग नागरिकांनी देखील स्थानिक जैवविविधता टिकवण्यासाठी कोणत्याही जमिनीवर आग लावू नये.
वनविभागाचे क्षेत्र हे बहुतेक रस्त्याच्यालगत असल्याने मद्यपान करणारे, सिगारेट फुंकणारे लोक रस्त्याच्या कडेला पेटती काडी वा सिगारेट टाकतात. तीच आग जंगल जळण्यास कारणीभूत ठरते. यावर प्रतिबंध म्हणून वनविभागाने वनक्षेत्रावर जाळपट्टे (जाळ प्रतिबंधित रेषा) घेतले आहेत. तरीही कोठे जर वणवा लागला तर नागरिकांनी जबाबदारीने, असे वणवे क्षमविण्यासाठी प्रशासनास मदत केली करावी.
आम्ही शासकीय वनक्षेत्रात नियमानुसार जाळरेषा काढलेल्या असतात. मात्र, काही लोक आत जाऊन आगी लावत असल्याने जंगलांना आग लागते. जंगलाजवळील शेतकऱ्यांनी शेतातील केरकचरा पेटवत असताना दुसरीकडे आग पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन वन परिमंडळ अधिकारी अमोल पाचपुते यांनी केले आहे.
जर केणी जंगलाला आग लावण्याचा प्रयत्न केला तर अशा आरोपी विरुद्ध भारतीय वनअधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा कारवाई करण्यात येईल. अशा गुन्ह्यास दोन वर्षांची शिक्षा व ५ हजार रुपये दंड देखील होऊ शकतो. जर कोणी जंगलास आग लावणाऱ्यांचे नाव व पुरावे वनविभागास दिले तर अशा नाव कळवणाऱ्यास वनविभागाकडून योग्य बक्षीस दिले जाईल व त्याचे नाव गुपीत ठेवले जाईल. जंगलातील आगी रोखण्यात वेळोवेळी वनविभागास स्थानिक ग्रामस्थ, पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन, पर्यटक तसेच इतर प्रशासकीय विभागाची मदत झालेली आहे.- शुभांगी लोणकर, वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.