Alibaug News : वणवे लागून दर वर्षी रायगड जिल्ह्यात लाखो झाडे भस्मसात होतात. अलिबाग वनपट्ट्यांतय याचे प्रमाण जास्तच आहे. वणवे विझविण्यासाठी वनविभागाने आधुनिक साधनांचा केलेल्या वापरामुळे अलिबाग कार्यक्षेत्रात येणाऱ्या पेण, पनवेल, उरण, खालापूर, सुधागड व रोहा तालुक्यांमध्ये सकारात्मक परिणाम जाणवू लागले आहेत.
या तालुक्यांमध्ये वनक्षेत्र अधिक असून त्यावरील अतिक्रमणाचे प्रमाणही मोठे आहे, मात्र जनजागृती, ऑनलाइन मॉनिटरिंगमुळे वणवे लागण्याच्या घटनांमध्ये ३५ टक्के घट झाल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
वणव्यामुळे वनसंपदेचा ऱ्हास होतो तसेच वन्यजीवांचा आश्रयही नष्ट होतो. नैसर्गिक वणवे लागण्याची प्रक्रिया ही जैविक समतोलाचा एक भाग समजली जाते, मात्र अतिक्रमणासाठी तर काही वेळा समाजकंटकांकडून जाणूनबुजून जंगलात आगी लावल्या जातात. काहीजण शिकारीसाठी आगी लावतात, शेतीच्या कामात आग नियंत्रणात राहिली नाही तरीही, वणवा पसरतो.
यावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाने नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले आहेत. अलिबाग वनविभागाचे कार्यक्षेत्रात वणवे लागण्याच्या घटना अद्यापही घडत असल्या तरी त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे.
वनक्षेत्रालगतच्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत, वनौषधीची लागवड, बांबू लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. वनक्षेत्रावर सतत होत असलेल्या ऑनलाइन मॉनिटरिंगमुळे वणवे लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दोन वर्षांत ५७४ वणवे लागले आहेत, तर एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत अलिबाग वनक्षेत्रात ४५ वणव्यांची नोंद झाली आहे.
आग प्रतिबंधक जाळरेषा
वनक्षेत्राला लागणारी आग ही जमिनीच्या पातळीवर असते. त्याची मोठ्या झाडांना झळ बसली तरी ती नष्ट होत नाही. अलिबाग वनक्षेत्रात खडकाळ, मुरूम, तसेच कातळाचा परिसर अधिक आहे.
यामुळे ज्या ठिकाणी गवत वाढते अशा ठिकाणी वणव्यास प्रतिबंध करण्याचे दृष्टीने दर वर्षी १५ मीटर, १० मीटर व ३ मीटर अशा प्रकारच्या आग प्रतिबंधक जाळरेषा केल्या जातात. तसेच रोपवनांभोवती ऑक्टोबरनंतर आग प्रतिबंधक जाळरेषा घेण्याबाबत सूचना करण्यात येतात. या विभागात फायर वॉच टॉवर्सही उभारण्यात आले आहेत.
प्रत्येक वनरक्षकास ५०० हेक्टर क्षेत्र
अलिबाग वनक्षेत्रात अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड व रोहा (काही भाग) या तालुक्यांचा समावेश होतो. या विभागात ११ वनपरिक्षेत्र, ६२ परिमंडळ व २२७ नियतक्षेत्र आहेत. जिल्ह्यात ३२ टक्के वनक्षेत्र असून अलिबाग वनविभागाचे निव्वळ क्षेत्र १०७४.६३ चौरस किलोमीटर इतके आहे.
याठिकाणी अलिबाग व पनवेल असे दोन उपविभाग असून दोन गस्ती पथके आहेत. या विभागात एकूण २२७ बीट वनरक्षक असून प्रत्येक बीट वनरक्षकावर सरासरी ५०० हेक्टर वनक्षेत्र संरक्षणाची जबाबदारी आहे. वर्षभरात वणवे लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.