Pune News : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या भोर आणि वेल्हे तालुक्यात सुरु असलेल्या वणव्यांमुळे निसर्गसंपदा आणि पर्यावरण साखळी धोक्यात आली आहे. डोंगररांगाचे, घाटांचे आणि पर्यंटनक्षेत्रांचे निसर्गसौंदर्यही खराब होत आहे. औषधी वनस्पती, जंगली प्राणी, पक्षी व कीटकांचाही मृत्यू होतो. याशिवाय वणव्यांमुळे करोडो रुपयांची वित्तहानी आणि अनमोल जीवितहानीही मोठ्या प्रमाणात होत आहे.
त्यामुळे वणवे लावण्यांवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारवाईपेक्षाही शेतकऱ्यांबरोबर पर्यटकांनी आणि मद्यपींनी वणव्यांबाबत स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे. मात्र दरवर्षी वणवे लागण्यापूर्वीच जनजागृती करण्यात वन विभागासह शासनाचे सर्वच विभाग कमी पडत आहे. वणवे लागल्यानंतरच याकडे लक्ष दिले जाते.
भोर तालुक्यातील वरंधा घाट, मांढरदेवी घाट, भाटघर आणि नीरा-देवघर धरणांचा परिसर आणि ग़ड किल्यांजवळच्या डोंगरांमध्ये पर्यटकांची वर्दळ असते. दररोज शेकडो पर्यटक वरंधा घाटातून महाडकडे जात आहेत. काही पर्यटक रस्त्याच्या कडेला मद्यपान व धूम्रपान करीत थांबतात. धूम्रपान केल्यानंतर बिडी किंवा सिगारेट न विझवता तसेच टाकतात.
त्यामुळे वणवे लागतात. याशिवाय काही ग्रामस्थ आणि शेतकरी आपल्या खासगी जागेतील गवत जाळतात. परंतु झाडे-झुडपे जास्त असल्यामुळे आग आटोक्यात येत नाही आणि त्यामुळेही काही प्रमाणात वणवे लागत आहेत. शेतकरी आपल्या खासगी जागेत वणवे लावताना शेजारच्या शेतकऱ्यांना-यांना किंवा वन विभागाला कल्पना देत नाहीत. त्यामुळे वणवे लागण्याचे प्रकार वाढत आहेत. वणव्यांमुळे एरवीही हिरवेगार दिसणारे डोंगर काळेकुट्ट दिसत आहेत. त्यामुळे पर्यटकांची संख्याही कमी होते.
भोर-वेल्ह्यातील डोंगररांमधील घाटात झाडे, वेली, मोठ-मोठे वृक्ष आणि झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे वणवा लागला तर कित्येक तास आणि कित्येक दिवस थांबत नाही. झाडे वेली हिरवी असल्याने अनेक दिवस वणव्यातून धूर येत राहतो. परंतु त्यामुळे पर्यावरणाची फार मोठी हानी होते. आंबे, करवंदे, जांभूळ, आळू, हिरडा व इतर औषधी वनस्पती जळून खाक होतात. याशिवाय साप, घोरपड, सरडे यासारखे सरपटणारे प्राणी किडामुंगी व कीटकही मोठ्या प्रमाणात मृत पावतात.
वरंधा घाटातील जंगलात व डोंगरदऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे पक्षी व प्राणी आहेत. यामध्ये मोर, लांढोर, कबूतरे, कावळे, चिमणी आदी प्रमुख पक्षांबरोबर ससे, कोल्हे, गवे, तरस, रानमांजरे, माकडे, हरिण, भेकर आणि बिबट्या आदींचा समावेश आहे. या प्राण्यांना तर राहण्यासाठी जागा शिल्लक रहात नाही, आणि जरी स्थलांतरित झाले तरी त्यांना अन्नपाणी मिळत नसल्याने त्यांचा मृत्यू होतो.
उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच जानेवारी महिन्यापासून गावागावात जाऊन वणव्यांविषयी जनजागृती करायला हवी. मात्र वन विभागांसह पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायत आदींकडून कोणतीही हालचाल केली जात नाही. वनव्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी पोहोचण्यास उशीर होतो. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरते.
वणव्यांमुळे घरे, जनावरांचा चारा, जीवनावश्यक वस्तू आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची हानी होते शिवाय जनावरे आणि नागरिकांचे प्राणही जातात. वणवे विझवताना वन कर्मचा-याचा भाजून मृत्यु झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. वनवे लागल्यानंतर पर्यावरणाची वन विभागाच्या वतीने पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वय़ंशीस्त पाळावी असे आवाहन केले जाते. वनवे लागल्यानंतर झालेल्या नुकसानीची तुटपुंजी मदत वन विभागाकडून दिली जाते.
वनसंरक्षण समिती नावापुरतीच
वन विभागाच्या वतीने गावोगावी वन संरक्षण समिती स्थापन केली आहे. मात्र या समितीमार्फत वनवे न लावण्याबाबत कोणतीही जनजागृती केली जात नाही. यामुळे या समित्या फक्त नावापुरत्याच राहिल्या आहेत. वन विभागाकडून अनेक महिलांना सबसीडी देवून गॅस कनेक्शनही दिले आहे. परंतु वनसंरक्षण समितीचा मुख्य हेतू बाजूला राहील्याचे चित्र दिसत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.