Tur Pest Management Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Pest Management : तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. प्रज्ञा शं. कदम (इंगळे)

अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, धुके या बरोबरच दिवस आणि रात्रीच्या तापमानातील फरकामुळे तुरीवरील किडींना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या तूर पीक फुले आणि शेंगा परिपक्व होणाच्या अवस्थेत आहे. कळी ते फुलोरा अवस्थेत या पिकात मुख्यतः शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग आणि शेंगमाशीचा प्रादुर्भाव सुरू होतो. सध्या तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. किडीच्या नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना आखणे गरजेचे आहे.

तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हर्पा)

नुकसानीचा प्रकार

प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचा प्रादुर्भाव कळी व फुलांवर होतो. नंतरच्या अवस्थेतील अळ्यांचा प्रादुर्भाव शेंगावर होतो. शेंगेमधील दाणे खात असताना अळ्या शरीराचा पुढील भाग शेंगामध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेवलेल्या अवस्थेत आढळतात. त्यामुळे आतील कोवळ्या दाण्याचे जवळपास ६० ते ८० टक्के नुकसान होते. एक अळी साधारणतः २० ते २५ शेंगांचे नुकसान करत असल्याचे दिसून आले आहे.

तुरीवरील शेंगमाशी

या माशीची अळी बारीक पांढऱ्या रंगाची गुळगुळीत असते. अळीला पाय नसतात. पूर्ण विकसित अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते, त्यातून प्रौढ माशी बाहेर पडते, तेव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो. कोष तपकिरी रंगाचा असतो.

नुकसानीचा प्रकार

कोवळ्या शेंगेच्या आत माशी अंडी घालते. अंड्यातून अळ्या बाहेर पडल्यानंतर त्या दाण्यांचा पृष्ठभाग कुरतडून खातात. त्यामुळे दाण्यावर नागमोडी खाचा तयार होतात व दाण्यांची मुकणी होते. त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे दाणे कुजतात. कीडग्रस्त दाणे खाण्यासाठी अथवा बियाण्यासाठी उपयोगी ठरत नाहीत. प्रादुर्भावग्रस्त बियाण्यांची लवकर उगवण होत नाही. अशा बियाण्यास बाजारात दरसुद्धा कमी मिळतो. उत्पादनात १० ते ४० टक्के घट आढळून येते.

सर्वेक्षण

पीक कळी व फुलोरा अवस्थेत असताना आठवड्यातून किमान १ वेळा हेक्टरी २० ते २५ झाडांचे निरीक्षण करावे. कारण याच अवस्थेत तूर पिकाचे खरे आर्थिक नुकसान होते. शेतात प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे पिकाच्या १ फूट उंचीवर लावावेत. सापळ्यामध्ये सतत ३ दिवस जर नर पतंगाची संख्या ८ ते १० इतकी आढळली किंवा १-२ अळी प्रति झाड किंवा ५ टक्के कीडग्रस्त शेंगा दिसल्यास त्वरित पीक संरक्षणाचे उपाय योजावेत.

एकात्मिक कीड व्यवस्थापन

शेताच्या बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पर्यायी खाद्य तणे काढून नष्ट करावीत. उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी इ.शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीसाठी पीक कळी अवस्थेत आल्यापासून १ फूट उंचीवर हेक्टरी ५-१० कामगंध सापळे लावावेत (हेलील्युअर / हेक्झाल्युअर)

मोठ्या अळ्या वरचेवर वेचून त्यांचा नायनाट करावा. तुरीचे झाड थोडेसे वाकडे करून हळूवार हलवल्यास अळ्या खाली पडतात, त्या गोळा करून नष्ट कराव्यात.

शेतात १० ते ५० पक्षिथांबे प्रति हेक्टरी उभारावेत.

पीक कळी अवस्थेत असताना निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५० मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीसाठी एच.ए.एन.पी.व्ही. (५०० एल.ई.) विषाणूजन्य कीटकनाशकाची १ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.

वरिल सर्व उपायांचा अंमलबजावणी केल्यानंतरही किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास, पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना पहिली फवारणी करावी. (प्रमाण ः प्रति लिटर पाणी)

पहिली फवारणी :

इथिऑन (५० टक्के प्रवाही) २ मिलि किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के ई.सी.) २.८ मि.लि.किंवा फ्लूबेंडायअमाइड (३९.३५ टक्के एस.सी.) ०.२ मिलि किंवा फ्लूबेंडायअमाइड (२० टक्के डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम.

पहिल्या फवारणीनंतर

१५ दिवसांनी दुसरी फवारणी :

इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के एस.जी.) ०.४५ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानीलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.३ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ई.सी.) १ मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ०.७ मिलि.

गरज भासल्यास तिसरी फवारणी २० दिवसांनी, क्लोरॲन्ट्रानीलीप्रोल (९.३) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.६ टक्के) (संयुक्त कीटकनाशक) ०.४ मिलि.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT