This is a conversation with Shalu Kolhe:
विदर्भातील तलावांच्या पुनरुज्जीवनाच्या कामाकडे कसे वळलात?
मी गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील निमगावची. मासेमारी करणाऱ्या धीवर समाजातील एक गरीब मुलगी म्हणून मी घुंगट ओढणारी तसेच चूल आणि मूल या भोवतीच गुंतून पडली होते. आता गेल्या ११ वर्षांपासून फाउंडेशन फॉर इकॉनॉमिक अॅण्ड इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट (फीड) नावाच्या संस्थेत काम करतेय.
त्यांनीच मला मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनाची संधी दिली. त्यापूर्वी २०१३-१४ मध्ये कोरोइंडियाची एक पाठ्यवृत्ती मिळाली. त्या एक वर्षात मी स्वतःला कसे ओळखावे, नेतृत्व कसे करावे, समुदायाचा विकास कसा करावा, तळागाळात कसे काम करावे, पुरुषप्रधान संस्कृतीमध्येही महिला म्हणून कशी झेप घ्यावी असे खूप काही शिकले.
तेथून मग मी गावाचा अभ्यास करू लागले. प्रश्न विचारू लागले. महिलांशी बोलू लागले. तलावांमधील मासेमारीचा मी बारकाईने अभ्यास केला. त्यातील समस्या समजावून घेतल्या. गावातील रोजगाराची समस्या सोडवायची असेल तर आधी मृत झालेले तलाव जिवंत करावे लागतील, हे मला जाणवलं. त्यानंतर मी पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले. आता हे काम राज्यभर करते आहे.
महिलांमध्ये काम करण्यास कशी सुरुवात केली?
माझे सासर नवेगावचे आणि माहेर निमगावचे. मी शेतकरी परिवारातील. आम्हाला केवळ दोन एकर शेती. मला दोन भाऊ होते. त्यातील एक मरण पावला व दुसरा लहान कंपनीत काम करतो. माझे पती दहावी शिकले असून, ते शेती आणि बांधकामात ‘सेंट्रिंग’चे काम करतात. सासरी आठ एकर शेती आहे.
माझे लहानपण गरिबीत गेले. आमच्या धीवर समाजात कोणीही शिकलेले नाही. तरीही पोटाला चिमटा घेत मला बापाने बारावीपर्यंत शिकवले. आमच्या समाजात सर्वांत जास्त शिकलेली मी एकमेव मुलगी. लग्नानंतर चार वर्षे तशी मी चुलीभोवतीच गुंतलेली होते. आमचे सासरे गावातील मच्छीमार सोसायटीचे सचिव होते. एकदा फीडच्या मनीष राजनकर यांनी आमच्या घरी बैठकीचे आयोजन केले. बैठकीत मी चहापाणी वाटत असताना काही प्रश्नांची उत्तरेदेखील देत होते. माझी धडपड पाहून राजनकरांनी मला पाठ्यवृत्ती मिळवून दिली.
त्यातून मी समाजासाठी झटू लागले. ग्रामपंचायतीला जाब विचारू लागले. मी महिलांचा बचत गट तयार केला. परंतु महिला येत नसायच्या. त्यांच्या काही अडचणी होत्या. त्या बदलायला तयार नव्हत्या. त्यांना काय त्रास होतोय हे मला कळत होते. राजकारणाचा किंवा घरातील व्यक्तींचा दबाव त्यांच्यावर होता. हा दबाव माझ्यावर देखील होता.
अनेकदा मी घरी रडत यायची. त्या भागात आमच्यापेक्षाही एक दुसरा समाज स्वतःला श्रेष्ठ मानत होता. त्यांच्यासमोर आम्हाला बसायला, बोलायला बंदी होती. त्यांना जबरदस्तीने मान द्यावा लागत असे. मात्र आम्ही जेव्हा त्यांच्या घरात जात असू, तेव्हा आम्हाला साधे पाणी देखील दिले जात नसायचे. आम्ही कनिष्ठ समाजातील महिला त्या तथाकथित वरिष्ठ समाजाकडे धुणीभांडी करीत असू. आमची शेतीदेखील या समाजाकडे गहाण ठेवलेली होती. हे सर्व मी पाहिले आणि मग महिलांचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली. त्यातून आम्ही महिला ग्रामसभा सुरू केली. त्यामुळे महिला जाग्या झाल्या.
पण हे करताना घरातून विरोध झाला का?
समाजातून, घरातून सर्व ठिकाणांहून विरोध झाला आणि आता संघर्षानंतर सर्वत्र स्वागतही होते आहे. मी पहिल्यांदा ग्रामसभेत गेले, तेव्हा तेथील पदाधिकाऱ्याने मला आरेतुरे करीत इथे तू कशाला आली, तुझे काय काम, असे प्रश्न विचारले होते. पण मी डगमगली नाही. मी त्या पदाधिकाऱ्याला सांगितले, की काका मला फक्त बसू द्या, ऐकू द्या. त्या ठिकाणी कनिष्ठ जातीचा म्हणून सरपंचाला प्लॅस्टिकची साधी खुर्ची दिली होती आणि वरिष्ठ जातीचा म्हणून उपसरपंच राउंड चेअरवर बसला होता.
मी अस्वस्थ झाले आणि प्रश्न विचारू लागले. मी लोकांना तेथेच ठामपणे सांगितले, की इथे जर सरपंचाला नोकरासारखे वागवले जात असेल, तर गावातील आपल्यासारख्या गरिबाची प्रगती कधीही होणार नाही. लोकांना माझी भूमिका पटली. त्यानंतर लोक मला समर्थन देऊ लागले. मात्र ग्रामसभेतून येताच माझ्याच घरी भडका उडाला.
सासरे स्वतः राजकारणी होते. तू आता गावाला कायदे शिकवू लागली का, असा सवाल सासऱ्यांनी विचारला. मी देखील बंडखोरपणे उत्तर दिले, की मी आत्ताच्या आत्ता घर सोडायला तयार आहे; पण गावाला सुधारण्याचा घेतलेला वसा आता मी सोडणार नाही. मी लगेच माझी चूलही वेगळी केली. सासरे मला म्हणायचे, की संस्थेच्या कामासाठी कोणाच्याही सोबत मी कुठेही जायला नको.
पण या साऱ्या संघर्षात माझा नवरा मात्र माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. ‘माझी बायको समाजासाठी काम करतेय आणि माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. शालू तू बेधडक लढ. मी तुझ्यासोबत आहे,’ असे माझ्या नवऱ्याने मला सांगितले. माझे डोळे भरून आले. तो दिवस माझ्यासाठी अत्यानंदाचा होता. मग मी कधीही मागे वळून पाहिले नाही.
त्यानंतर मग काय झाले?
माझ्या घरात आग लावणाऱ्यांना मी धडा शिकवला. आधी सरपंचाला चांगली खुर्ची मिळवून दिली. गावातील महिलांना धाडसाने पुढे आणले. त्यांना बोलायला प्रवृत्त केले. गावातील तलावांकडे पुरुषप्रधान व्यावसायिकतेने साफ दुर्लक्ष केले होते. आम्ही महिलांनी एक होऊन ती वृत्ती मोडून काढली. आम्ही तलाव साफ केले. पुरुषांकडून बंगाली मासेपालन केले जात होते. ते तलावांमधील जैवविविधतेला घातक होते. उत्पन्नही कमी देत होते.
आम्ही महिलांनी बंगाली माशांऐवजी मुलकी माशांवर भर दिला. त्यांची संख्या वाढवली. त्यामुळे उत्पन्न वाढले. तलावांमधील अतिक्रमण हटविले. तेथील जैवविविधतेकडे लक्ष दिले. त्यामुळे गावात पशुपक्षी येऊ लागले. महिलांना सोबत घेत आम्ही बचत गट व छोटे प्रक्रिया व्यवसाय सुरू केले. आतापर्यंत मी असे ६३ तलाव पुनरुज्जीवित केले आहेत.
तुमच्याविषयी आता गावातील श्रेष्ठींचा दृष्टिकोन बदलला का?
आम्ही तलाव जिवंत केल्यानंतर मासेमारी वाढली. त्यामुळे रोजगार वाढला. त्यातून घराघरांत पैसा खेळू लागला. थोडी समृद्धी आली. ते पाहून मला नाव ठेवणाऱ्यांचे दात घशात गेले होते. आता मला केवळ गावात नव्हे तर विदर्भात, राज्यात देखील वेगळी ओळख मिळाली आहे. अर्थात, ही माझी स्वतःची ओळख नसून माझ्या गावाचा, तेथील एकेकाळच्या दुःखी, पीडित महिलांचा हा सन्मान आहे.
उपजीविका करताना निसर्गाला, पर्यावरणाला जपा असा संदेश आमच्या गावाने राज्याला दिला आहे. केवळ तलाव खोलीकरणाचा उपयोग नसून तेथील जैवविविधता, त्याद्वारे रोजगार निर्मिती महत्त्वाची असते, असाही संदेश आम्ही दिला आहे. महिला सक्षमीकरण, जैविक शेती, शेतीपूरक जोडधंदे या मुद्द्यांभोवती देखील लोकांची जागृती आम्ही महिला करतो आहोत.
राज्यातील महिलांना काय संदेश द्याल?
मी एक साधी मुलगी माझ्या राज्यातील नारीशक्तीला काय संदेश देणार बरे..! पण आता युग बदलले आहे. ही वेळ आता पुरुषप्रधान संस्कृतीमधील अन्याय सहन करीत, पदराला अश्रू पुसत, चुलीभोवती घुसमटत दिवस काढण्याची नाही.
महिलेत साऱ्या मानवजातीच्या कल्याणाची ताकद आहे. हे युग रडण्याचे नाही; तर लढण्याचे आढे; आणि लढायचे म्हणजे हाणामाऱ्या, भांडण करायचे नसून समाज सुधारणांसाठी प्रत्यक्ष कृती करायची आहे. मी माझ्या गावात लढतेय. प्रत्येकीने आपापल्या गावात लढावे.
शालू कोल्हे ९६८९४ ३२८०२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.