
Weather Prediction:
भारतीय हवामान विभागाला (आयएमडी) दीडशे वर्षे पूर्ण झाली. या काळात हवामान विभागात घडलेल्या स्थित्यंतराविषयी काय वाटते ?
भारतीय हवामान विभाग (आयएमडी) त्याच्या स्थापनेपासून उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यांतून जात आहे. आज विभाग एका उंचीवर पोहोचला आहे. देशभरातील गंभीर घटनांचे उत्तम निरीक्षण आणि अंदाज घेण्यासाठी ३९ डॉपलर वेदर रडार उभारले आहेत. इन्सॅट उपग्रहाद्वारे दर १५ मिनिटांनी ढगांची छायाचित्रे उपलब्ध होत आहेत.
याशिवाय सुमारे २०० स्वयंचलित कृषी हवामान केंद्रे, ८०६ स्वयंचलित हवामान केंद्रे, १३८२ स्वयंचलित पर्जन्यमापक, ८३ वीज शोधण उपकरणे, हवेच्या वरच्या थरातील नोंदीसाठी ६३ बलून निरिक्षण केंद्रे या यंत्रणा हवामान निरीक्षण सेवेचा कणा म्हणून काम करत आहेत.
आयएमडीच्या वेधशाळा, दूरसंचार प्रणाली आणि नव्याने जोडलेल्या अंदाज कार्यालयांच्या विस्तृत जाळ्यांमुळे राष्ट्र उभारणीसाठी महत्त्वाची माहिती पुरविली जाते. यामुळे जीवित आणि मालमत्तेची हानी रोखण्यासाठी अंदाज आणि इशारे देऊन देशाच्या आर्थिक विकासाचे नियोजन करण्यास मदत होते.
आयएमडी सर्वच क्षेत्रांमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी अंदाज सेवा पुरवते. या अंदाज सेवेच्या अचूकतेमुळे १९९९ मधील चक्रीवादळातील मृत्यूंची संख्या १० हजाराहून कमी झाली. अलीकडच्या दशकात अशा मृत्यूची संख्या १० ते २० वर आली आहे. उत्तर हिंद महासागरातील देशांनाही या अंदाज सेवेचा फायदा झाला असून देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले आहे.
आयएमडी इतर देशांनाही सेवा पुरवते का?
आयएमडी भारतासह सार्क राष्ट्र व हिंद महासागरातील १३ देशांना चक्रीवादळाचा अंदाज व इशारा सेवा पुरवते. भारत, बांगलादेश, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या देशांना उष्णकटिबंधीय चक्रीवादळे आणि वादळाच्या वाढीचे मार्गदर्शन देण्यासाठी प्रादेशिक विशेष हवामान केंद्र म्हणून आयएमडी काम करते.
भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ आणि श्रीलंका या देशांना पूर इशारे तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला धुक्याचे (फॉग) इशारे याबाबत मार्गदर्शन सेवा देण्यात येते. जागतिक हवामान संस्थेच्या हवामान अंदाज कार्यक्रमाचे नेतृत्व करताना बांगलादेश, भारत, नेपाळ, भूतान, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, म्यानमार आणि थायलंड या देशांना उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, तीव्र गडगडाटी पाऊस, मॉन्सून, जोरदार पाऊस, तीव्र लाटा आणि जोरदार वाऱ्यांविषयी सेवा पुरवून जागतिक हवामान क्षेत्रामध्ये आयएमडी लक्षणीय योगदान देत आहे.
भारतात आयएमडी कृषी, नागरी विमान वाहतूक, जलविज्ञान, ऊर्जा क्षेत्र, जहाजबांधणी, आरोग्य, वाहतूक, राज्य सरकारे, केंद्रीय जल आयोग, जलसंपदा मंत्रालय, रेल्वे, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, पूर नियंत्रण प्राधिकरणे आणि विविध संशोधन संस्थांना सेवा पुरविते.
तसेच ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा, जल संसाधन, गृह, कृषी, पंचायती राज, ग्रामीण विकास, जलशक्ती, जहाजबांधणी, अंतराळ, संरक्षण या मंत्रालयांना आणि राज्य कृषी विद्यापीठे, राज्य कृषी विभागांना विशेष सेवा दिली जाते.
आसेतू हिमाचल प्रचंड विविधतेने नटलेल्या या देशाचा हवामान अंदाज देताना जाणवणारी आव्हाने कोणती?
हवामान विभागाचे अंदाज आणि इशारा सेवांच्या संदर्भात प्रचंड प्रगती झाली असली तरीही निरीक्षणे, मॉडेलिंग, अंदाजांची अचूकता आणि त्यांचा प्रसार ही मोठे आव्हाने आहेत. आमच्या निरीक्षणांना अवकाशीय आणि काळाच्या मर्यादा आहेत.
अंकीय हवामान अंदाजाच्या मॉडेलची मर्यादा १२ किमी असल्याने हवामानातील लहान-लहान घटनांचा अचूक अंदाज लावणे कठीण होते. अंदाज अचूकतेमध्ये पाच दिवसांपर्यंत लहान ते मध्यम श्रेणीत लक्षणीय सुधारणा झाली असली तरी अजून अंदाज सुधारण्यास वाव आहे.
हवामान बदलांबरोबरच वातावरणही अधिक गुंतागुंतीचे होत आहे. मुसळधार पाऊस आणि स्थानिक दुष्काळ यासारख्या घटना घडत असल्याने पूर आणि अवर्षण या दोन्हींच्या एकत्रित आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
ढगफुटी, तीव्र गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट आणि वादळांचे जटिल नमुने समजून घेण्यासाठी ढगांच्या आतील, ढगांच्या बाहेरील, पृष्ठभागावरील आणि वरच्या वातावरणातील, महासागरांतील आणि ध्रुवीय प्रदेशांमधील भौतिक प्रक्रियांचे सखोल ज्ञान आवश्यक आहे. तसेच अंकीय हवामान अंदाज मॉडेलची मर्यादा १२ किमी वरून ६ किमीपर्यंत करण्याची आवश्यकता आहे.
जेणेकरून पंचायत स्तरावरील अचूक अंदाज देता येतील. शेती,शहरे, आरोग्य आणि पर्यावरण यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी अचूक हवामान वर्तवण्यासाठी संशोधन, तांत्रिक सुधारणा आणि आर्थिक तरतूद आवश्यक आहे. मुख्य आव्हान हे अंदाजाचा प्रसार करण्यात आहे.
शास्त्रज्ञ सर्वोत्तम अंदाज तयार करत आहेत परंतु अंदाज लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. हवामान विभागाचे अंदाज राज्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतात. अनेक राज्ये एसएमएसद्वारे ही माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोचवतात. तरीही गावपातळीवर शेतकऱ्यांना पावसाचे इशारे मिळत नाहीत. अतिवृष्टीसारख्या काही घटनांचा इशारा देण्याच्या प्रक्रियेसाठी बराच वेळ लागतो.
या आव्हानांवर कशी मात करणार?
या आव्हानांवर मात करण्यासाठी, आयएमडीने एक बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारला आहे.हवामान विभागाकडून डॉप्लर वेदर रडार, स्वयंचलित हवामान केंद्र, स्वयंचलित पर्जन्यमापक, विंड प्रोफाइलर्स, मायक्रोवेव्ह रेडिओमीटर इत्यादींसह निरीक्षणाचे जाळे विकसित करण्याची योजना आखली जात आहे.
तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशिन लर्निंग आणि प्रगत डेटा विश्लेषण यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा उपयोग अंदाज अचूकता आणि वेग वाढविण्यासाठी केला जात आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या इशाऱ्यांचा अर्थ समजून घेणे हा तळागाळातील शेतकऱ्यांसाठी चिंतेचा मुद्दा आहे. म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाड्या, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, बचत गट यांच्या सहकार्यातून जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे, माहिती स्थानिक भाषेत उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
तीव्र हवामान घटनांमुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल आयएमडीला नेहमीच दोषी धरले जाते..
दैनंदिन हवामान व गंभीर घटनांसाठी अधिक अचूक अंदाज आणि इशारे देण्यात लक्षणीय प्रगती झाली आहे. बंगालच्या उपसागर, अरबी समुद्रातील चक्रीवादळ,अतिवृष्टी यासारख्या घटनांच्या वेळी संकटाचे व्यवस्थापन करण्यासाठी हवामान विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आणि अतिवृष्टीच्या घटनांसारख्या नैसर्गिक आपत्तींबद्दल हवामान आणि हवामान सेवा आणि सल्ल्यांमधील उल्लेखनीय सुधारणांसाठी प्रशंसा मिळाली आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये चक्रीवादळ, पाऊस, उष्णतेची लाट आणि शीत लहरींच्या अंदाजांसह कोणत्याही गंभीर हवामानाच्या अंदाजातील अचूकता पर्यंत ४० ते ५० टक्क्यांनी सुधारली आहे. विशेषतः, चक्रीवादळ मार्ग, तीव्रता आणि जमिनीवर येण्याच्या ठिकाणांच्या अंदाजांची अचूकता ६५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. २४ तासांच्या उष्ण लाटेच्या अंदाजातील अचूकता १०० टक्क्यांपर्यंत तर नैऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) कालावधीत अतिवृष्टीचा इशारा अचूकता ८३ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
आता जिल्हा स्तरावर गडगडाटी पाऊस आणि विजेचे इशारे पाच दिवस अगोदरच दिले जातात. अंदाजाची अचूकता वाढविण्याकरिता अंकीय हवामान अंदाज मॉडेलची मर्यादा १२ किमी वरून ते ६ किमीपर्यंत प्रयत्न सुरू आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून निरिक्षण केंद्रांचे जाळे विस्तारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
`मिशन मौसम` ही काय संकल्पना आहे?
हवामानाचा अचूक अंदाज देण्याची क्षमता सुधारण्यासाठी अधिक तपशीलवार निरीक्षणे, विविध भौतिक प्रक्रियांची सखोल समज तसेच प्रगत संख्यात्मक प्रारूपाची (मॉडेल्स) आवश्यकता आहे. ग्रामपंचायत स्तरावरील अंदाज साध्य करण्यासाठी प्रगत उपग्रह, रडार, उच्च-कार्यक्षमता संगणक, सुधारित पृथ्वी प्रणाली मॉडेल्स आणि डेटा-आधारित पद्धतींचा समावेश गरजेचा ठरतो.
भारताला ‘हवामान-सज्ज’ आणि ‘हवामान-स्मार्ट’ बनवण्याच्या उद्देशाने पृथ्वी विज्ञान मंत्रालय व भारतीय हवामान विभागाने ‘मिशन मौसम’ हा राष्ट्रीय उपक्रम हाती घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने पहिल्या टप्प्यासाठी (२०२४ ते २०२६) दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातून तंत्रज्ञान आणि प्रणाली विकसित करणे, प्रगत रडार आणि उपग्रहांचा वापर करून पृथ्वी प्रणाली प्रारूप (मॉडेल्स) सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, उच्च-कार्यक्षमता संगणन प्रणाली आणि डेटा-चलित पद्धती यावर भर दिला आहे. मिशन मौसममध्ये शेतकऱ्यांना प्राथमिकता देण्यात येत असून, स्थानिक हवामान अंदाज आणि योग्य वेळचा सल्ला पीक व्यवस्थापनातील कामांसाठी निर्णय घेण्यास मदत होईल. पूर आणि दुष्काळ आदी तीव्र हवामान घटनांच्या काळात पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी तत्काळ इशारे देण्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे.
हवामान विभागाच्या `पंचायत मौसम पोर्टल`ची सद्यःस्थिती काय आहे?
पृथ्वी विज्ञान मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय आणि हवामान विभागाने २४ ऑक्टोबर २०२४ रोजी ''मौसमग्राम'' सेवा सुरू केली. ग्रामपंचायत स्तरावरील हवामान अंदाज शेतकरी आणि स्थानिक समुदायांपर्यंत पोचविण्यासाठीचा हा उपक्रम आहे. देशवासीयांना कुठेही आणि कधीही हवामान अंदाज उपलब्ध करण्यासाठी `हर हर मौसम, हर घर मौसम` उपक्रम राबविण्यात येत आहे. यात ''मौसमग्राम''द्वारे ठिकाणाचे नाव, पिन कोड नंबर किंवा ग्रामपंचायत, तहसील, जिल्हा तसेच शहराचे नाव टाकून अंदाज मिळवता येतो.
देशभरातील २ लाख ६० हजार ग्रामपंचायतींना तापमान, पाऊस, आर्द्रता, वारा आणि ढगांचे आच्छादन यांसारख्या मापदंडासह स्थानिक स्तरावरील अंदाज उपलब्ध करून दिले आहेत. यात तीन दिवसांपर्यंत दर तासाचे, पाच दिवसांपर्यंत ३ तासांचे आणि दहा दिवसांपर्यंतचे ६ तासांचे अंदाज समाविष्ट आहेत. सरपंच आणि ग्रामसेवक यांना देखील ही माहिती पुरवली जाते. शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापनासाठी या माहितीचा खूप उपयोग होतो. पंचायत मौसम सेवा पोर्टलवर https://mausam.imd.gov.in/greenalerts ही सेवा उपलब्ध आहे.
ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहकार्यातून दीनदयाल अंत्योदय योजना तसेच राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, कृषी सखी आणि पशू सखीच्या ग्राम-स्तरीय जाळ्याद्वारे हवामान अंदाज आणि हवामान माहिती, कृषी हवामानविषयक सल्ले यांचा प्रसार करण्यात येत आहे.
स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून कृती योजना राबवून प्रशिक्षित सदस्यांना त्यांच्या गावांमध्ये हवामान माहिती प्रसारक म्हणून नियुक्त केले जात आहे. या सदस्यांना पूर, चक्रीवादळ आणि इतर धोक्यांबाबत वेळेवर माहिती दिली जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आयएमडी कोणत्या सेवा पुरविते ?
शेतकरी समुदायासाठी जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर हवामान आधारित कृषी सल्ला आणि अंदाज पोचविण्याचे काम १३० क्षेत्रीय कृषी हवामान विभागांमार्फत सुरू आहे. हवामान, माती आणि पिकांविषयीची माहिती संकलित करून शेतकऱ्यांना शेती व्यवस्थापनासंबंधीचे निर्णय घेण्यास मदत करण्यात येत आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवेअंतर्गत दर मंगळवारी आणि शुक्रवारी कृषी हवामान केंद्राच्या माध्यमातून सल्ला देण्यात येतो.
यात भूतकाळातील हवामानासह शेती पिके, फळबागा, पशुधन, मत्स्यपालन इत्यादींबाबत सर्वसमावेशक निर्णय घेण्याचे मार्गदर्शन आणि पाच दिवसांचे मध्यम श्रेणीचे हवामान अंदाज व हवामानाच्या सूचनांचा समावेश आहे.देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील विविध जिल्ह्यांसाठी हवामानाचे तीव्र इशारे, शेतीसाठी प्रभाव आधारित अंदाज तयार केला जात आहे. वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे, दूरदर्शन, रेडिओ, इंटरनेट याद्वारे शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी सल्ले देण्यात येतात.
कृषी मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान पोर्टलद्वारे मोबाईल फोनवर माहितीचे एसएमएस शेतकऱ्यांना देण्यात येतात. राज्य सरकार आणि खासगी संस्थांद्वारे सार्वजनिक-खासगी भागीदारीतून व्हॉट्सअॅप ग्रुप्स, शेतकरी गट आणि मेघदूत सारख्या मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून सुमारे २८ दशलक्ष शेतकऱ्यांना हवामानाची माहिती मिळत आहे.
हवामान विभाग, भू-विज्ञान मंत्रालय, पंचायत राज मंत्रालयाच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या ''मौसमग्राम'' संकेतस्थळाद्वारे इंग्रजी, हिंदी आणि बारा प्रादेशिक भाषांमध्ये, पंचायत स्तरावर शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यात येते. यात तापमान, पाऊस, सापेक्ष आर्द्रता, वारा आणि ढगांचे आच्छादन यासारख्या महत्त्वाच्या हवामान मापदंडांचा समावेश करून देशातील २ लाख ६० हजार ग्रामपंचायतींसाठी दैनिक ग्रामपंचायत स्तरावरील अंदाज उपलब्ध करून दिले जातात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.