Spice  Agrowon
ॲग्रो विशेष

Spice Industry : चौदा जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला मुंढे यांचा मसाला उद्योग

Success Story of Spice Industry : परभणी येथील बालाजी मुंढे यांनी विविध स्वादाचे मसाले, हळद, मिरची पावडर आदी २५ प्रकारच्या उत्पादनांचा शिवम व वरद हा ब्रॅण्ड नावारूपाला आणला आहे. अस्सल चव व स्वादाच्या या उत्पादनांनी मराठवाडा, विदर्भासह अन्य जिल्ह्यांमध्येही मोठी पसंती मिळवली आहे.

माणिक रासवे

Story of Spice Industry : हरिश्‍चंद्र बालाघाट डोंगर रांगांमधील परभणी, बीड व लातूर या जिल्ह्यांच्या सीमेवर सेलमोहा (ता. गंगाखेड, जि. परभणी) हे सुमारे दोन हजार ७०० लोकवस्तीचं गाव आहे. माळरान, दगडगोट्याची हलकी जमीन असं इथल्या जमिनीचं स्वरूप आहे. डोंगराच्या पायथ्याची जमीन मध्यम आहे.गावचे डॉ. बळिराम मुंढे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मुख्य ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते. तब्बल ३६ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले. सेलमोहा येथे त्यांची २५ एकर जमीन आहे.त्यांना बालाजी (थोरले) व शिवाजी ही दोन मुले. त्यापैकी एकाने प्रशासकीय अधिकारी व्हावे तर दुसऱ्याने उद्योजक व्हावे अशी त्यांचा मानस होता.

त्यादृष्टीने दोघा मुलांची तयारी सुरु होती. बालाजी यांनी परभणीच्याच विद्यापीठातून कृषी वनस्पतिशास्त्र (सीड टेक्नॉलॉजी) विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. ते शिक्षण घेत असताना पदवीधर असलेले शिवाजी यांच्यासाठी उद्योग उभारण्याची तयारी केली. याच कृषी विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालयातून प्रक्रिया उद्योगाबाबत माहिती घेतली. बाजारपेठांत उत्पादनांची मागणी व आपल्या परिसरात त्या अनुषंगाने उपलब्ध होणारा कच्चा माल असा अभ्यास मुंढे कुटुंबाने केला. त्यातून मसाले निर्मिती करण्यावर एकमत झाले.

दुर्दैवी घटनेचा आघात शिक्षण संपल्यानंतर बालाजी ‘एमपीएससी’च्या परिक्षांची तयारी करू लागले. साधारण ही सन २००१ ची गोष्ट. त्याच वेळी शिवाजी यांचे अपघाती निधन झाले. या घटनेचा मुंढे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. हे दुखः पचवणे म्हणजे मोठे आव्हान होते. हीच घटना बालाजी यांचे ‘करिअर’ बदलण्यासाठी ‘टर्निंग पॉइंट ठरली. ज्या मुलासाठी उद्योगाचे स्वप्न पाहिले होते तो काळाने हिरावून घेतला होता. आता आपल्या मोठ्या मुलाने म्हणजे बालाजी यांनीच मसाले उद्योगाची धुरा हाती घ्यावी अशी इच्छा वडिलांनी व्यक्त केली. मग मुलानेही ती इच्छा प्रमाण मानली.

मसाले उद्योगाला सुरुवात

तरुण भाऊ अकाली जाण्याचे दुख पचवणे अवघड होते. पण बालाजी हिंमत एकवटून कामाला लागले. उद्योगाची पायाभरणी साधारण दोनेक वर्षांत सुरू झाली. परभणी येथील ‘एमआयडीसी’ वसाहतीमध्ये बावीसशे चौरस फूट जागा घेण्यात आली. भांडवल म्हणून तत्कालीन स्टेट बँक हैदराबाद बँकेकडून पाच लाख ६० हजार रुपये कर्ज व १० लाख रुपये कॅश क्रेडिट असे अर्थसाह्य मिळाले. अन्न सुरक्षिततेविषयी केंद्र सरकारच्या ‘एफएसएआयआय कडे उत्पादनांच्या नोंदणीचा परवाना घेतला.पाच जानेवारी २००३ रोजी मसाले उद्योगाचा प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीला एक ‘पल्वरायझर’ व ‘पॅकिंग मशिन’ एवढीच यंत्रसामग्री होती. त्याद्वारे हळद व मिरची पावडर निर्मिती सुरू केली. एक पुरुष व एक महिला एवढेच मजूरबळ होते.

बाजारपेठ मिळविण्याचे प्रयत्न

चार वजनांमध्ये ‘पॅकिंग’ करून बालाजी स्वतः वाहनांद्वारे परभणी जिल्ह्यासह शेजारील नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत उत्पादनांचे ‘मार्केटिंग’ करीत. शिवम ब्रँड लोकप्रिय करण्यासाठी संघर्ष व मेहनत घ्यावी लागली. ‘गुणवत्तेत’ कुठेही तडजोड न केल्याने बाजारपेठेत उत्पादनांना पसंती मिळू लागली. विविध ठिकाणच्या किराणा व्यापाऱ्यांशी संपर्क वाढला. हळूहळू उलाढाल वाढत गेली. ‘मार्केटिंग’ नेटवर्क तयार झाले. यापुढील टप्पा म्हणून विविध प्रकारच्या मसाल्यांची निर्मिती सुरू झाली.

दोन ब्रॅण्डसहित आजचा उद्योग

देशातील जे भाग एखाद्या शेतीमालासाठी प्रसिद्ध आहेत तेथून तो कच्चा माल खरेदी करण्यात येतो.हिंगोली तसेच परभणी जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र मोठे आहे. वसमत, हिंगोली येथील मार्केटमधून हळद तर आंध्र प्रदेशातील गुंटूर येथून लाल मिरची घेतली जाते. स्वच्छता, प्रतवारी, ‘रोस्टिंग’, ‘ब्लेंडिंग, ग्राइंडिंग, ‘पॅकिंग’ आदी विविध प्रक्रियांसाठी अद्ययावत यंत्रसामग्री आहे. पावडरी व विविध स्वाद-प्रकारीतील मिळून सुमारे २५ उत्पादने तयार केली जातात.

पाच ग्रॅमपासून (पाच रुपये किंमत) ते पाच किलोपर्यंत विविध १४० प्रकारच्या वजनी आकारांमध्ये आकर्षक पॅकिंगमधून ही उत्पादने सादर केली आहेत. शिवम व वरद असे दोन ब्रॅण्ड तयार केले आहेत. मिरची, हळदीसह धने पावडर तर मसाल्यांमध्ये चटपट मसाला, कांदा- लसूण, मटण, चिकन, व्हेज ग्रेव्ही मिक्स, स्पेशल गरम, शाही गरम, रस्सा, काला तिखा, बिर्याणी, ६५ फ्राय, सांबर, चिवडा, पापड, कसुरी मेथी, जलजीरा, मठ्ठा अशी विविधता आहे. गुलाब जामून मिकस असाही प्रकार आहेत. बंगा मसाला, काळा मसाला (पाच प्रकार), मटण कोरमा ग्रेव्ही ही विशेष उत्पादने असून त्यांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे.

बालाजी मुंढे ९४२२१७९६१९

उद्योगाचे विणले जाळे

मराठवाड्यातील बहुतेक सर्व जिल्हे तसेच विदर्भातील वाशीम, अकोला, यवतमाळ, नाशिक, सोलापूर आदी सुमारे १४ जिल्ह्यांमध्ये मुंढे यांच्या ‘शिवम फूड्‍स ॲण्ड स्पायसेस’ कंपनीने आपले जाळे विस्तारले आहे. उत्पादने निर्मिती ते विपपन, वाहतुकीपर्यंत मिळून सुमारे ६० जणांची ‘टीम’ आहे. चार वाहनांची सुविधा आहे. वीस वर्षांच्या काळात उद्योगाने मोठी भरारी घेतली आहे. सुरुवातीलाकाही लाखांत असलेली उलाढाल आता काही कोटींवर पोहोचली आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी यांनी निर्यातक्षम उत्पादनांच्या निर्मितीसाठी उद्योगाचे आधुनिकीकरण सुरु केले आहे. त्यादृष्टीने आवश्यक इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. स्वयंचलित यंत्रसामग्रीद्वारे मसाले निर्मितीची क्षमता पाचपट करण्याचे उद्दिष्ट आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Issue : सोयाबीन खरेदीचा तिढा

Green Energy Investment : हरित ऊर्जेमधील गुंतवणूक २५ लाख कोटींवर जाणार

Alandi Kartiki Ekadashi : आळंदीत उद्यापासून माउलींचा संजीवन समाधी सोहळा

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक इंदापुरात ७६ टक्के मतदान

Satara Vidhansabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात चुरशीने ७१.९५ टक्के मतदान

SCROLL FOR NEXT