Agriculture Cultural Gratitude : ज्यांच्या स्मरणाने मनुष्याच्या (सर्वसाधारण पापांचा नाश होतोच, पण) महापापांचाही नाश होतो, अशा पाच स्त्रियांसंबंधीचा एक श्लोक हिंदू धर्म साहित्यात आहे. या स्त्रियांना ‘पंचकन्या’ म्हटले आहे. तो श्लोक असा,
अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा।
पंचकन्याः स्मरेन्नित्यं महापातकनाशिनीः॥
अहल्या, सीता, तारा, मंदोदरी या रामायणातील पतिव्रता आहेत, तर द्रौपदी महाभारतातील पांचाली आहे. या सर्व स्त्रिया विवाहित असूनही त्यांना ‘कन्या’ म्हटले आहे. या श्लोकाचा उगम अज्ञात आहे. या श्लोकात दोन बदल आढळतात.
पहिला बदल, ‘अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी’ या श्लोकाच्या पहिल्या भागातील ‘तारा’च्या जागी ‘कुंती’चे नाव येते, असे ब्रह्म पुराण सांगते (ब्रह्म पुराण ३.७.२१९). दुसरा बदल म्हणजे श्लोकाच्या ‘पंचकन्या:’च्या जागी ‘पंचकम् ना’ असा शब्द येतो.
‘पंचकम् ना स्मरेत नित्यम् महापातक नाशिनीः’ असे वाचल्यास या कन्यांचे नित्यनेमाने रोज स्मरण न केल्यास महापातकांचा नाश होणार नाही. म्हणून त्यांचे स्मरण करावे. या सहा स्त्रिया विवाहित असल्या ‘कुमारी भूमी’ किंवा भूमी मातेच्या प्रतिनिधी मानल्या जातात.
‘अहल्या’ ही ब्रह्मदेवाची मानसकन्या आणि ऋषी गौतमाची पत्नी होती. ‘अ + हल् + या’ मिळून ‘अहल्या शब्द बनतो. हल म्हणजे नांगर. म्हणून ‘अहल्या’ म्हणजे न फिरविलेली पण नांगरटीस योग्य जमीन. कॉम्रेड शरद पाटील यांच्या मते, ‘अहल्या’ ही विदेह गणराज्याची राणी होती आणि तिने नांगराचा शोध लागलेला नसतानाच्या आदिम काळात ‘स्फ्य’ने काठीने नांगरणी केली.
‘स्फ्य’ काठी हे खुरप्यासारखे यज्ञात जमीन उकरण्यासाठी वापरले जाणारे अवजार होते. ‘अहल्या’ गौतमाची पत्नी होती म्हणजे गौतम ऋषीने ‘स्फ्य’ या नांगराचा जणू पूर्वज असलेल्या अवजाराने आश्रमाभोवतीची भरताड जमीन लागवडीखाली आणली.
‘सीता’ म्हणजे नांगरताना जमिनीत पडलेली रेषा, म्हणजे नांगरलेली पेरणी योग्य जमीन. राजा सीरध्वज याला नांगरत असताना सीता सापडली याचा अर्थ त्याने नवीन भूमी वहिताखाली आणली. रामाने वनवासींच्या मदतीने पंचवटीतील भरताड, जंगली जमीन उपजाऊ सुपीक बनवली. रावणाने ती जमीन बळकावली, तेच सीताहरण. वाल्मीकींनी सीता हा शब्द जमिनीसाठी वापरला.
जनकाची कन्या या अर्थाने इतर वेळी ते जानकी, मैथिली, वैदेही अशी नावे ते वापरतात. सीता शब्दाचा एक महत्त्वाचा अर्थ ‘स्वर्गांतून मेरू पर्वतावर पडल्यानंतर गंगेचे चार प्रवाहांपैकी एक प्रवाह.’ सीता हा पूर्वेचा प्रवाह.
अलकनंदा, भद्रा व चक्षू हे उरलेले तीन. इतर अर्थ : सीता हा एक वृक्ष, म्हणून वनस्पतिदेवता, एक प्रकारची मोठी कवडी, एका जातीच्या गवताचे बी, चवरीचा (वनस्पती) एक प्रकार, खळ्यावरची रास नेल्यानंतर उरलेले धान्य. हे सर्व नांगरणीशी, अन्नाशी निगडित अर्थ आहेत. तसेच अर्धा रुपया म्हणजे सीता आणि पूर्ण रुपया म्हणजे सीताराम.
‘तारा’ म्हणजे नदीच्या किंवा खाडीच्या मध्यातील खुली, बेटाच्या स्वरूपातील उघडी जागा, भरतीचे पाणी ओसरल्यानंतर निर्माण होणारा पायउतार. तारा सुग्रीवाची पत्नी ऊर्फ त्या भागातील सर्व नद्या, त्यांच्या भोवतीची सारी जमीन सुग्रीवाच्या मालकीची. पण ती वालीने बळकावली. रामाने ती वालीचा वध करून, सोडवून सुग्रीवाला परत केली.
‘मंदोदरी’चा अर्थ होतो मंद + उदरी, अर्थात, विलंबाने पिके देणारी, हलकी पण कसदार जमीन. ही लंकेतील भूमी. पीकपाणी फारसे उत्तम नसल्याने रावणाने आजूबाजूच्या देवांच्या बायका ऊर्फ जमिनी गिळंकृत करून टाकल्या. त्या जमिनीच्या उपजाऊपणाची रहस्ये जाणून आपल्या ‘मंद उदरी’ जमिनी विकसित केली, अन् लंकेवर सोन्याच्या विटा चढवल्या!
द्रौपदी ही पृथ्वीची प्रतीक ठरते. तिची इतर नावे : याज्ञसेनी (यज्ञातून जन्मलेली), कृष्णा (वहिताखालील जमीन), धनंजया (पृथ्वी). सुगीच्या प्रारंभी केल्या जाणाऱ्या यज्ञविधीसाठी तयार केलेली जमीन म्हणजे याज्ञसेनी. अर्थात, विधिवत यज्ञ करून जमीन नांगरणे. नांगरली की ती होते वहिताखालील जमीन काळी, म्हणून ती कृष्णा. काळी आई.
यादव राजा शूरसेनची मुलगी कुंती. तिचे जन्म नाव ‘पृथा’. ‘पृथा’ म्हणजे पृथ्वीची कन्या. कुंती जमिनीच्या तुकडीकरण धोरणाच्या तीव्र विरोधाची प्रतिनिधी ठरते. महाभारतकालीन पुरुषप्रधान समाजरचनेनुसार ज्येष्ठ बंधू कुटुंबातील सामूहिक जमीन व इतर मालमत्तेचा ‘मालक’ असतो.
(आजही हेच चित्र आढळते) अर्जुनाने द्रौपदी ही ‘जमीन’ जिंकली असली, तरी तिचा मालक युधिष्ठिर झाला. हे चुकीचे होते म्हणून ही कुप्रथा तोडण्यासाठी कुंतीने पाचही भावांत समान वाटणी केली. द्रौपदी रूपाने घराण्यातील जमिनीवरील ज्येष्ठांची मक्तेदारी आणि तुकडीकरणही तिने हाणून पाडले.
द्रौपदी पाच पतींची एक पत्नी असल्या कुटुंब व्यवस्था एकात्म ठेवणाऱ्या आणि जमिनीच्या तुकडीकरण विरोधक होत्या. या सर्व स्त्रियांचे रोज स्मरण करणे याचा अर्थ ‘काळी आई’ आणि मानवी आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे.
(लेखक तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.