
Zero Tillage Farming Success Story : लातूर जिल्ह्यातील हरंगुळ शिवारात संध्या राजेंद्र मद्देवाड यांची सुमारे १४ एकर शेती असून पैकी वहिती खाली साडे १२ एकर क्षेत्र आहे. पती राजेंद्र व्यावसायिक असून मुलगा सागर वकील तर मुलगी स्वप्ना डॉक्टर आहे. मुलांची शिक्षणे पूर्ण झाली होती. अशावेळी काही शेती विकावी काय असा विचारही घरी सुरू होती. त्याला कारणही तसेच होते.
शेती लातूरपासून दोन किलोमीटर अंतरावर लातूर ते कळंब राज्य मार्गालगत आहे. येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या एकरी काही लाखांपासून ते कोट्यावधीपर्यंत त्याला भाव आहेत. साहजिकच काही क्षेत्र विकून व्यवसायात वाढ करणे शक्य होऊ शकेल असे काहीसे नियोजन होते.
मात्र वडिलोपार्जित शेती न विकता ती अधिक उत्पादनक्षम व उत्पन्नक्षम करायची असा विचार संध्याताईंनी बोलून दाखवला. पूर्वीपासून पारंपारिक पद्धतीनेच शेती सुरू होती. उत्पन्न जेमतेम व्हायचे. अनेकदा बरोबरीच व्हायची. शेतकऱ्याची बायको कधीही आत्महत्या करत नाही. त्यामुळे महिलांनी शेतीत उतरलेच पाहिजे आणि आधुनिक पद्धतीने ती केली पाहिजे या विचारांनी संध्याताईंनी त्यात झोकून देण्याचा निर्णय घेतला. माहेरी म्हणजे त्यांचे वडील राजकारणात होते. मात्र आई शेतात जायची. यामुळे शेतीचे बाळकडू घरूनच मिळाले होते.
प्रयोगशील शेतीसाठी पुढाकार
बारावी विज्ञानपर्यंत संध्याताईंचे शिक्षण झाले होते. त्यामुळे शेतीचे विज्ञान समजून घेण्याबरोबत चार वर्षापूर्वी शेतीचा कारभार त्यांनी हाती घेतला. घरापासून शेती सात किलोमीटरवर आहे. घरातील कामे उरकल्यानंतर त्यांनी दुचाकीवर जाऊन शेतीच्या कामात गुंतवून घेण्यास सुरवात केली. हरंगुळचे कृषी पर्यंवेक्षक सूर्यंकात लोखंडे यांनी त्यांना शून्य मशागत तंत्र पद्धतीने सोयाबीन व हरभरा ही पिके घेण्यासाठी प्रोत्साहित केले. असे प्रयोग केलेल्या शेतकऱ्यांकडे नेऊन त्याबाबत प्रत्यक्ष अनुभवही दाखवले.
शून्य मशागत तंत्राचा वापर
आता सुमारे तीन वर्षांपासून संध्याताई खरिपात सोयाबीन तर रब्बीमध्ये हरभरा व त्यात ज्वारीचे आंतरपीक या पद्धतीने शेती करतात. टोकण पद्धतीने शेतीसाठी पूर्वी साडेतीन फुटी गादीवाफे (बेड) तयार केले होते. शून्य मशागत तंत्रासाठी त्याचा चांगला उपयोग झाला. मागील तीन वर्षात बहुतांश क्षेत्र शून्य मशागत तंत्राखालील शेतीत आणले आहे. काही क्षेत्रात एका बेडवर सातवे पीक आहे.
बेडवरील व सरीतील गवत काढून तिथेच कुजवले जाते. विहीर व बोअर यांच्या माध्यमातून तुषार सिंचनाने पाणी दिले जाते. पिकांचे राहिलेले अवशेष देखील बेडमध्येच कुजवले जातात. सोयाबीनचे एकरी बारा ते १३ किलो लागते. सोयाबीन काढणीनंतर हरभऱ्यासाठी बेड तयारच होतो. त्यामुळे मशागत न करता हरभऱ्याचे नियोजन केले जाते. हरभरा काढणीनंतर पुन्हा पुढील खरिपात सोयाबीन हेच पीक घेतले जाते. कृषी विद्यापीठांच्या सुधारित जातींचा वापर केला जातो.
शेतकऱ्यालाही गादीवर बसवणारे तंत्र
मागील तीन वर्षांत सोयाबीनचे एकरी १८ क्विंटल उत्पादनापर्यंत पोचण्यात संध्याताई यशस्वी झाल्या आहेत. हरभऱ्याचेही त्यांनी एकरी १२ ते १४ क्विंटलपर्यंत उत्पादन साध्य केले आहे. टोकण यंत्राचा वापर केल्याने पेरणी सोपी झाली आहे. शून्य मशागत तंत्र. गादीवाफा पद्धतीत पिकाला गादीवर बसवल्यास पुढे ते शेतकऱ्याला गादीवर बसवते म्हणजे त्याला समृद्ध करते असा अनुभव आल्याचे संध्याताई सांगतात.
हरभऱ्यात ज्वारीचे आंतरपीक घेतल्याने पक्षीथांबा तयार होऊन हरभऱ्यावरील घाटे अळीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होते. ज्वारी घरी खाण्यासाठीही पुरेशी होते. संध्याताईंना शेतीत मुलाचीही मोठी मदत होते. शेतात कुटुंबासाठी आणि सालगड्यासाठी देखील घर बांधले आहे. संध्याताई ट्रॅक्टर चालवायलाही शिकल्या आहेत. पेरणी, फवारणी, खुरपणी, काढणीपर्यंतची सर्व कामे करून मजुरांवरील अवलंबित्व त्यांनी काही प्रमाणात कमी केले आहे.
पीक स्पर्धेत गौरव
शून्य मशागतीमुळे जमिनीचा कर्ब वाढतो. पिकांची वाढ जोमाने वाढतात. मुंबई येथे एका वृत्तवाहिनीच्या वतीने शून्य मशागत आधारित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात संध्याताईंनाही गौरवण्यात आले आहे. सोयाबीन पीक स्पर्धेत हेक्टरी ५१.६३ क्विटंल उत्पादन घेतल्याबद्दल जिल्हा कृषी महोत्सवात त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राकडून कृत्रीम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित उसाच्या लागवडीसाठी त्यांनी मार्गदर्शन घेतले आहे. त्यानुसार लागवडीचे नियोजन आहे. अनेक वर्षांपासून शून्य मशागत तंत्राचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत त्यांनी माहिती घेतली आहे. त्यातून या तंत्रावर आधारित शेतीला मोठे बळ मिळाल्याचे संध्याईंनी सांगितले. शिवारातील शेतकऱ्यांनाही संध्या यांच्या प्रयोगांची प्रेरणा मिळाली आहे.
संध्या मद्देवा़ड ९४२१९८४५६१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.