Gulwara River
Gulwara River  Agrowon
ॲग्रो विशेष

River Emotions : वेदना एका नदीची!

डॉ. नागेश टेकाळे

Condition of Gulwara River : दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यामधील परळी वैजनाथच्या जवळ गुलवारा नदी काठावर वसलेल्या गोवर्धन गावास भेट दिली. उद्देश अर्थातच गावाचा पाणी प्रश्न सोडविणे, गुलवारा नदीमधील साठलेला तब्बल १२ ते १५ फूट गाळ काढणे आणि लोकसहभाग तसेच सीएसआर मदतीतून नदीस पुन्हा वाहते करणे हा होता.

मुसळधार पावसापासून गोकुळास वाचविण्यासाठी श्रीकृष्णाने त्याच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उभा केला. गोकुळातील सर्व शेतकरी आणि दूध उत्पादक वर्ग त्या पर्वताच्या छायेखाली सुरक्षित थांबले आणि गोकुळचे रक्षण झाले. अर्थात भागवत ग्रंथात उल्लेख असलेला, घनदाट वृक्षराजीने श्रीमंत असलेला गोवर्धन पर्वत आणि आज मी पाहत असलेल्या गोवर्धन गाव यात जमीन-अस्मानचा फरक होता.

एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे हे गोवर्धन गाव आज पाणी पाणी करत आहे. गुलवारा नदीचे उगमस्थान जवळच्याच डोंगरात आहे. मात्र उगमापासूनच जेमतेम ४० कि.मी लांबीच्या या नदीवर तीन धरणे बांधली आहेत, मग नदी वाहणार तरी कशी? पावसाळ्यात तिन्ही धरणे भरतात आणि नदीला पूर येतो.

पाणी आजूबाजूच्या सर्व शेतात पसरते. आज या थांबलेल्या नदीत फक्त गाळ आहे आणि ते येण्याचे मुख्य कारण म्हणजे गोवर्धन आणि परिसरामधील सर्व गावांमध्ये गेले कित्येक वर्षापासून सुरू असलेली रासायनिक शेती. पंधरा वर्षांपूर्वी नदी बारमाही वाहत होती. लोक तिचेच पाणी पीत होते, आज या परिसरामधील सर्व गावांत मार्चपासूनच टँकर सुरू झाले आहेत. एप्रिल आणि मे मध्ये काय स्थिती होणार? या चिंतेत सर्व गावकरी आहेत.

नद्यांचा उगम डोंगर, दऱ्या, घळीमधून होतो. ज्या गावांना असे गोवर्धन रूपामधील डोंगर लाभतात त्यांनी वास्तविक या डोंगरांचे सोने करावयास हवे. कारण उगमाजवळ असणारे वृक्षच त्या नदीच्या उगमास शाश्वत करतात. आज जर नद्यांना वाचवायचे असेल तर त्यांच्या उगमाजवळच घनदाट वृक्षराजी निर्माण करणे आवश्यक आहे.

सर्वत्र दिसणारे उजाड डोंगर, टेकड्या हे घसरलेल्या पर्यावरणाचे द्योतक आहे. आज आपल्या राज्यातील शेकडो नद्या गाळांनी भरलेल्या आहेत. कुठून आला हा गाळ? डोंगराच्या उताराहूनच ना! उघडे बोडके डोंगर उन्हाच्या काहिलीमध्ये सापडतात. पृष्ठभागावरील माती आद्रतेअभावी सैल होते आणि पहिल्या पावसामध्येच हा सर्व गाळ नदी मार्गाने खाली येऊ लागतो.

आज कोकणची परिस्थिती भीषण आहे ते याचमुळे! सह्याद्रीच्या रांगांमध्ये उगम पावणाऱ्‍या सर्व नद्या अरबी समुद्रास मिळतात. या सर्व लहान नद्या प्रतिवर्षी प्रचंड मोठा गाळ घेऊन खाली पृष्ठभागाकडे धाव घेतात. येताना त्या फक्त गाळच आणत नाही तर लहान मोठे दगड धोंडेही खाली घेऊन येतात. या दगड गोट्यांमुळे अनेक ठिकाणी या नद्या पात्र बदलतात.

आज कोकणामधील नद्यांमध्ये, खाड्यांमध्ये गाळाचे साम्राज्य आहे. खाड्यांमधील गाळ हा जलवाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहे. लहान मोठ्या बोटी बंदरात येऊ शकत नाहीत. कोकणामधील प्रत्येक गाव परिसरात शेकडो लहान मोठे डोंगर आहेत. मात्र त्यावरील शेकडो वर्षांचे आयुष्य लाभलेले हजारो वृक्ष नष्ट झाले आहेत.

त्यांची जागा आंबा, काजू या वृक्षांनी घेतली आहे. अनेक डोंगर उघडे नागडे होऊन नवीन काजू, आंब्याच्या रोपाची वाट पाहत आहेत. अशी ही वादळ वाऱ्‍यांमध्ये न टिकणारी, उन्मळून पडणारी वृक्षराजी नद्यांना कशी थांबवणार, गाळास कशी रोखणार! जेव्हा आपण पुरातन देशी वृक्षांना तोडतो, कापतो तेव्हा त्याखालची भूमी हादरून जाते. माती, दगड, धोंडे सैल होतात आणि कोकणच्या मुसळधार पावसात त्यांना खाली येण्यापासून कोण रोखणार?

प्रत्येक गावाच्या भौगोलिक क्षेत्रात डोंगर, दऱ्‍या, नद्या आणि प्राचीन वृक्षांना अनन्य साधारण महत्त्व आहे. नद्यांना वाहते करावयाचे असेल तर ज्या डोंगरदरीमधून त्यांचा उगम होतो तेथे सर्व प्रथम मोठ्या प्रमाणावर स्थानिक वृक्षांची लागवड होणे गरजेचे आहे. विविध प्रकारचे गवत, बांबू, बोगनव्हेलीया या सारख्या वनस्पती डोंगरावरील माती घट्ट धरून ठेवतात. पाणी मुरविण्यास मदत करतात आणि नद्या गाळ विरहित शाश्वत पद्धतीने वाहू लागतात.

पावसाळा अजून दोनअडीच महिने दूर आहे. येणाऱ्या मॉन्सूनचा पाऊस मुबलक असला तरी तो वादळ वारे आणि ढगफुटी सारख्या घटकांना बरोबर घेऊन येणार आहे. आज नद्यांमधील गाळाच्या भीतीने कोकणामधील महाड, चिपळून, खेड, राजापूर यासारखी शहरे आत्तापासूनच अस्वस्थ आहेत.

आमच्या परिसरातील नद्यांमधील गाळ काढा यासाठी ते विनवणी करत आहेत. कारण जेवढा गाळ जास्त तेवढे पाणी वेगाने धावणार! ही अवस्था दिशाहीन विकासामुळे झाली आहे. कोकणचा कॅलिफोर्निया हा फक्त वृद्धत्वाकडे झुकत असलेल्या हापूस आंबा आणि समुद्र काठावरील रुपेरी वाळूमुळे होणार नसून तो सह्याद्रीच्या डोंगररांगांना पुन्हा हरित करून होणार आहे. त्यासाठी स्थानिक वृक्षांना पुन्हा तेथे सन्मानाने आमंत्रित करणे गरजेचे आहे.

बिजिंग शहरापासून ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’कडे जाण्यासाठी मोठा रस्ता आहे. या रस्त्याच्या दुतर्फा पूर्वी असेच तुरळक संख्या असणाऱ्या डोंगररांगा होत्या. चीनची भिंत पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक येथे येतात. त्यांची संख्या वाढावी, परदेशी चलनाचा ओघ वाढावा म्हणून तेथील शासनाने या सर्व डोंगरावर गर्द वनराई निर्माण केली, पर्यटकांना दृष्टी सुख दिले. डोंगरामधून उगम पावणाऱ्‍या लहान नद्या पुन्हा वाहू लागल्या. शेतकऱ्‍यांनी या पाण्यावर त्यांची शेती समृद्ध केली. हे सृष्टिसौंदर्य पाहत तो पाच तासांचा प्रवास कधी संपतो, हे कळत सुद्धा नाही.

उघडा डोंगर, नद्यांमधील गाळ, उन्हाची काहिली आणि ग्रामीण भागामधील आजची भीषण पाणी टंचाई हे सर्व संवेदनशील विषय एकमेकांस साखळीमधील कड्याप्रमाणे घट्ट गुंफलेले आहेत. वाढती टँकर संख्या, जित्राबांची पाण्यासाठी व्याकुळता, घटणारी वृक्ष संपदा हे आजच्या ग्रामीण भागाचे भीषण वास्तव्य आहे.

प्रश्न नद्यांमधील गाळ काढून तो शेतात टाकून सुटणार नाही तर नदीमध्ये गाळच येऊ नये यासाठी काय करावयास हवे यावर शेतकऱ्यांना सुशिक्षित करुनच सुटणार आहे. त्यासाठी नदी काठची रासायनिक शेती बंद करून शेतामधील पावसाचे पाणी शेतातच कसे मुरेल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

डोंगर अथवा नदी उगम स्थानापासून येणारा गाळ थांबवण्यासाठी लोकसहभागातून डोंगरास विविध प्रकारच्या सुरक्षित हरित आच्छादनाने झाकणे गरजेचे आहे. हिरवा डोंगर आणि बारमाही वाहती नदी हा नदीकाठच्या गावांना निसर्गाने दिलेला आशीर्वाद असतो. समृद्धी अशाच ठिकाणी नांदत असते. गाळाने भरलेल्या नदीची वेदना समजून घेणारा, तिला पुन्हा वाहती करणारा पुण्यात्मा प्रत्येक गावात जन्मास येवो एवढीच अपेक्षा!

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनास हवामान अनुकूल

Fodder Shortage : हिरव्यागार उसाची चाऱ्यासाठी तोड

Pomegranate Farming : प्रशिक्षित स्थानिक मजुरांमुळे डाळिंब उत्पादकांचा खर्च वाचला

Rain Update : उंबर्डे, भुईबावडा परिसराला पावसाने पुन्हा झोडपले

Mango Season : आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सपुंष्टात

SCROLL FOR NEXT