Beekeeping  Agrowon
ॲग्रो विशेष

Beekeeping Management : परागीकरणासाठी मधमाशी पेट्यांचे व्यवस्थापन

Pollination Management : निसर्गात परागीकरण करण्याचे ८० टक्के काम कीटकांद्वारे होते. त्यामध्ये मधमाश्‍या महत्त्वाच्या आहेत. सध्या बदलते पर्यावरण, वृक्ष तोड आणि अनियंत्रित कीटकनाशकांच्या वापराचा परिणाम मधमाश्‍यांवर होत आहे.

Team Agrowon

ऋषिकेश औताडे

Beekeeping Pollination : निसर्गात परागीकरण करण्याचे ८० टक्के काम कीटकांद्वारे होते. त्यामध्ये मधमाश्‍या महत्त्वाच्या आहेत. सध्या बदलते पर्यावरण, वृक्ष तोड आणि अनियंत्रित कीटकनाशकांच्या वापराचा परिणाम मधमाश्‍यांवर होत आहे.

याचा परिणाम डाळिंब, टरबूज, खरबूज, कांदा बियाणे, तेलबिया आदी पिकांच्या उत्पादनावर होत आहे. यासाठी फुलोरा सुरू झाला, की फळबागेत मधमाश्‍यांच्या पेट्या ठेवणे फायदेशीर ठरते. या मधमाशी पेट्यांची काळजी घेणे आवश्यक असते.

मधमाशी पेटी शक्यतो फुलकळी सुरू होण्यापूर्वी ५ ते १० दिवस आधीच आपल्या फळबागेत आणून ठेवावी. शास्त्रीयदृष्ट्या एका एकरासाठी चार पेट्या ठेवण्याची शिफारस आहे परंतु परिस्थितीनुसार व निसर्गातील मधमाश्‍यांचा बागेतील वावर पाहून निर्णय घ्यावा. 

पेटी मधमाशीपालकाकडून सायंकाळी अंधार पडल्यावर आणावी, म्हणजे सर्व कामकरी मधमाश्या पेटीमध्ये आलेल्या असतात. पेटी घेण्यापूर्वी मधमाशीपालकाद्वारे तपासून घ्यावी. पेटी घेताना ९ ते १० फ्रेम आहेत आणि सर्व फ्रेमवर मधमाश्‍या आहेत याची तपासणी करूनच पेटी ताब्यात घ्यावी. पेटीचे मुख्य द्वार बंद आहे तसेच इतर कुठूनही पेटी बाहेर मधमाश्या येत नाहीत, याची खात्री करावी. पेटी घेऊन प्रवास करताना पेटीची आदळ आपट होणार नाही याची काळजी घ्यावी.  पेटीबरोबर स्टँड आणि स्टील वाट्या मधमाशी पालकाकडून घ्याव्यात.

रात्रीच्या वेळी मधमाशी पेटी फळबागेत अपेक्षित जागेवर ठेवावी. पेटीचे मुख्यद्वार उघडून द्यावे. पेटीचे मुख्यद्वार पूर्वेला ठेवावे. गवत किंवा झुडपाच्या फांद्यांचा पेटीला स्पर्श पेटीला होऊ देऊ नये. चारही बाजूंनी पेटीला हवेशीर जागा असावी.

पेटी सावलीत ठेवावी. ठेवण्याची जागा सपाट, स्वच्छ व तणविरहित असावी. चार विटा आणि विटेवर चार पाण्याने भरलेल्या स्टील वाट्या ठेवल्याने मुंग्या व मुंगळे यांचा त्रास होत नाही. वाट्यांमध्ये दिलेल्या स्टँडचे चार पाय पाण्यात बुडतील असे ठेवावेत. वाटीत असणारी पाणीपातळी दर ३ ते ४ दिवसांनी तपासावी. वाटीत असणारे पाणी स्वच्छ असावे, कारण मधमाश्‍या ते पाणी पितात, किंवा पेटीमध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा वापर करतात. मधमाश्‍यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, त्यामुळे त्यांच्या कामात व्यत्यय येत नाही.

मधमाशी पेटी व्यवस्थित काम करते की नाही हे बघायचे असल्यास पेटी ठेवल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण ऊन पडल्यावर ८ ते ९ या वेळेत मधमाश्‍या पेटीच्या मुख्य दारातून बाहेर येताना किंवा आत जाताना दिसतात. पेटीच्या मुख्य दरवाजातून मधमाश्यांची ये-जा दिसत नसल्यास मधमाशीपालकास त्वरित कळवावे. हिवाळ्यात मधमाश्‍या ऊन वाढल्यावर १० ते ११ नंतर ये-जा सुरू करतात.

बागेत फुलोरा सुरू असल्यामुळे दिवसा मित्र कीटक, मधमाश्‍यांच्याद्वारे परागीकरण होत असते. यादरम्यान बागेत कीटकनाशकाची फवारणी करू नये. फवारणीची गरज असले तर तज्ज्ञांच्या सल्याने योग्य कीडनाशकाची निवड करावी, योग्य कालावधीत फवारणी करावी, त्यामुळे मधामाश्‍यांना त्रास होणार नाही.

दररोज शेतावर चक्कर मारताना पेटी ठेवलेल्या ठिकाणाची पाहणी करावी. पाहणी दरम्यान पेटीच्या मुख्यद्वाराजवळ १० ते ५० मधमाश्‍या मेलेल्या किंवा तडफडत आढळल्यास मधमाशीपालकास त्वरित कळवावे. याचा अर्थ पेटी ठेवलेल्या ठिकाणाहून १ ते २ किलोमीटर परिघात कीटकनाशके फवारली गेल्यामुळे किंवा आजार झाल्याने मधमाश्‍या मेल्या असल्याची शक्यता असते. अशावेळी मधमाशीपालकास कल्पना द्यावी.

परागीकरण आणि फळ सेटिंग पूर्ण समाधानकारक झाल्यावर पेटी मधमाशीपालकास रात्री पेटीचे मुख्यद्वार बंद करून त्याचवेळी पोहोच करावी. मुख्य द्वाराजवळ मधमाश्‍यांचा घोळका असल्यास थोडे पाणी फवारले की त्या पेटीत जातात, मुख्यद्वार बंद करण्यात अडचण येत नाही.

अपघाताने किंवा प्रवासात मधमाशीचा डंख लागल्यास गोंधळून न जाता, पेटीपासून दूर जावे. डंख नखाने त्वचेलगत मुडपून काढावा. चक्कर किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा. मधमाश्‍या जास्त घोंघावत असल्यास थोडा धूर केल्यास डंख मारण्याची प्रवृत्ती कमी होते.

ऋषिकेश औताडे, ९९६०५५३४०७

(लेखक मधमाशीपालनाचे अभ्यासक आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT