Patna News: ‘‘२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी गैरप्रकार करण्यात आला आणि केंद्रातील एनडीए सरकार हाच फॉर्म्यूला या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत देखील वापरू इच्छित आहे,’’ असा दावा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. महाराष्ट्राप्रमाणे ‘एनडीए’ची घोळ करण्याची डाळ इथे शिजू देणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
बिहारच्या मतदार यादीचा सखोल आढाव्याविरोधात आज पाटणा शहरात निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘इंडिया’ आघाडीने मोर्चा काढला. यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला फायदा मिळवून देण्यासाठी गैरप्रकार करण्यात आला.
हाच कित्ता ते बिहारमध्ये गिरवू इच्छित आहेत. पण आम्ही ते होऊ देणार नाही. निवडणूक आयोगाने राज्यघटनेचे संरक्षण करायला हवे. ते भाजपच्या निर्देशावर काम करत आहे. या निवडणुक आयुक्तांची नेमणूक भाजपनेच केली आहे. मतदारयादीचा सखोल आढावा करणे म्हणजे निवडणुकीत गैर प्रकार कण्याचा प्रयत्न आहे. आम्ही मतदार, प्रामुख्याने तरुणांच्या मतदारांचा अधिकार अबाधित राखण्यासाठी संघर्ष करू.’’
तत्पूर्वी आज सकाळी राहुल गांधी पाटण्यात दाखल झाले. त्यांच्यासमवेत राजदचे नेते तेजस्वी यादव, भाकप (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशनचे सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य, भाकपचे सरचिटणीस डी. राजा आणि अन्य प्रमुख विरोधी पक्षाचे नेते देखील होते. पाटण्यातील प्राप्तिकर गोलंबर येथून सुरू झालेला मोर्च्यात राहुल गांधी सहभागी झाले. बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत असताना त्याच्या मतदार यादीत फेरतपासणी करण्याच्या निर्णयाविरोधात महाआघाडीने बुधवारी राज्यव्यापी बंदचे आवाहन केले होते.
त्याचे राज्यभरात पडसाद उमटले. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही भागात रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याने अनेक भागांतील रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पाटण्यात महात्मा गांधी सेतू येथे टायर जाळून ‘रस्ता रोको’ करण्याचा प्रयत्न केला.
निवडणूक आयोगावर टीका
राहुल गांधी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील मतदार यादीत बऱ्याच विसंगती दिसून येतात. हजारो मतदारांचा घराचा पत्ता म्हणून एकच घर दाखविले गेले आहे. यावर आम्ही आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने त्याचे विवरण सादर करण्यास नकार दिला आणि ते भाजप आणि संघाचीच भाषा बोलू लागले. तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आहात, भाजपची सेवा करण्यासाठी नव्हे हे निवडणूक आयोगाने विसरू नये. ते महाराष्ट्राचे मॉडेल पुन्हा आणू इच्छित आहेत. ते या माध्यमातून अनेक मतदारांचे नाव काढून घेऊ शकतात. मात्र हे बिहार राज्य आहे, हे आयोगाने विसरू नये. बिहारच्या लोकांना निवडणूक आयोगाची चाल चांगलीच ठाऊक आहे.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.