The logic of Agriculture
The logic of Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

The logic of Agriculture : शेतीचे तर्कशास्त्र करावे लागेल विकसित

Team Agrowon

Indian Agriculture : आपण जागेपणीच काय पण झोपेतही विचार करीत असतो, असे समजतो. ‘माणूस हा विचार करणारा प्राणी आहे’. अशी माणसाची व्याख्या प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता अॅरिस्टॉटल (इ.स. पूर्व ३८४ ते इ.स. पूर्व ३२२) यांनी केली असा एक समज आहे. ‘विचार करणे’ हा शब्दप्रयोग आपण अनेकदा शिथिलपणे वापरतो. जेवणानंतर झोपेची वाट पाहत असतानाही कसले ना कसले तरी ‘विचार’ स्वैरपणे आपल्या मनात जात येत असतात, असे आपण म्हणतो.

परंतु त्या कल्पनांच्या स्वैरसंचाराला ‘विचार करणे’ म्हणणे चुकीचे आहे. विचार करण्याला निश्‍चित विषय आणि निश्‍चित दिशा असते. कसल्यातरी समस्येने विचार क्रिया सुरू होते, त्या विचाराचा प्रवास ती समस्या सोडविण्याकरिताच होतो आणि ती समस्या सुटली की ती विचारक्रिया संपते. असे सतत घडते.

विचार करणे म्हणजे तर्क, अंदाज करणे. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, हवामान, पाऊसपाणी, दुष्काळ, महागाई, बाजार, कौटुंबिक, सामाजिक व राजकीय घडामोडी इत्यादी विषयी अंदाज व्यक्त केले जातात. पण प्रत्येक अंदाज हा योग्य तर्क असतोचं, असे नाही. तर्काला वास्तवाचा, सत्य घटनांचा आधार असतो;

तर अंदाज व्यक्तिगत भावना, इच्छा, वासना यांनी प्रभावित असतो. ‘तर्क’ वस्तुनिष्ठ शास्त्रीय असतो तर अंदाज व्यक्तिनिष्ठ अशास्त्रीय असतो. या व्यक्तिनिष्ठ अशास्त्रीय अंदाजाला ‘तर्कदोष’ म्हणतात. निर्दोष विचारासाठी तर्कदोष टाळून सत्य (true) आणि युक्त (valid) तर्क करावा लागतो. म्हणून ‘युक्त व सत्य विचार म्हणजे तर्क.’ या तर्काचे शास्त्र ते तर्कशास्त्र (Logic).

युक्तिवाद

सुसंगत विचार कसा करावा, त्याची पुन्हा सुसंगत मांडणी कशी करावी, त्याचे नियम कोणते इत्यादी माहिती देणारे शास्त्र म्हणजे तर्कशास्त्र. विचार मांडण्यासाठी भाषेतील काही विशिष्ट अर्थाचे शब्द, संज्ञा आणि विधाने उपयोगात आणावी लागतात. त्यांना ‘तर्काची उपकरणे’ असे नाव आहे.

तर्क करताना काही विधाने पुरावा म्हणून तर काही विधाने निष्कर्ष म्हणून वापरली जातात. ज्यांचा आधार घेतला जातो त्यांना ‘आधार विधाने’ तर त्यांच्यातून जो निष्कर्ष काढला जातो त्यास ‘निष्कर्ष विधान’ म्हणतात. आधार विधाने + निष्कर्ष विधान मिळून पूर्ण होणारी तर्काची रचना म्हणजे ‘युक्तिवाद’ (Argument).

सर्व माणसे मर्त्य आहेत. (आधार विधान)

अॅरिस्टॉटल माणूस आहे.

म्हणून अॅरिस्टॉटल मर्त्य आहे.

(निष्कर्ष विधान)

यातील पहिल्या दोन सत्य विधानांमधून तिसरे सत्य विधान मिळते. सत्य आधार विधानांमधून सत्य निष्कर्ष विधान निष्पन्न होणे म्हणजे ‘युक्तता’ (validity). म्हणून सत्य व युक्त विधानांची रचना म्हणजेच तार्किक युक्तिवाद. त्याचे शास्त्र ते तर्कशास्त्र होय. युक्तिवादालाच ‘अनुमान’ म्हणतात. त्यालाच ‘अनुमानशास्त्र’ असेही नाव आहे.

भारतात प्राचीन काळापासून अतिशय समृद्ध उच्च दर्जाचे तर्कशास्त्र उपलब्ध आहे. त्याला ‘न्यायशास्त्र’ म्हटले जाते. परंतु वर्ण-जाती आणि लिंगभेद व्यवस्थेने सत्य व युक्त विचार करण्याचे प्रशिक्षण घेण्याची संधी सामान्य लोकांना हजारो वर्षे नाकारली गेली. परिणामी, भारतीय माणूस विचारप्रधान होण्याऐवजी भावनिक जास्त झाला.

शेतीबाबतचा तार्किक विचार

शेतीबाबत तर्काचा विचार प्रथम शेतकरी करतो. बियाणे ते पूर्ण अन्न या प्रवासाची तार्किक प्रक्रिया शेतकऱ्याला उत्तम रीतीने माहीत असते. पण तार्किक विचार, केवळ शेती पिकवणे याबाबत मर्यादित ठेवणे चुकीचे आहे.

उत्पादनानंतर अन्नधान्य हे बाजारपेठ, दलाल, व्यापारी, अडते, हमाल व सरकार अशा अनेक लोकांच्या कब्जात जाते. तेथे शोषण सुरू होते. म्हणून सरकारी ध्येयधोरणे आणि त्यावर आधारित बाजारपेठग्रस्त अर्थशास्त्र याविषयीचे अचूक, आणि जास्तीत जास्त बरोबर ठरू शकणारे तर्क कसे करता येतील, याचे ज्ञान शेतकऱ्याला असणे नितांत गरजेचे असते.

उदाहरणार्थ, कांदा निर्यात बंदीमुळे शेती बुडाली, ‘आमची शेतीविषयक धोरणे कल्याणकारी आहेत’ हा सरकारचा दावा अथवा ‘शेतकऱ्याची मुले सत्तेत गेली की ती शेतीविषयक कल्याणकारी धोरणे राबवतील’ ही विधाने कोणत्या तरी युक्तिवादाचे निष्कर्ष असतात. अनेकदा हे तर्क चुकतात. त्याची कारणे शोधावी लागतात. आधार तार्किकदृष्ट्या सत्य व युक्त नसेल, आणि भावनिक असेल तर निष्कर्षही भावनिकच ठरतो.

शेती व शेतीजीवन याबाबत भावनिक अंदाज व योग्य तर्क यातील फरक उमजणे, याकरिता शेतीचे तर्कशास्त्र विकसित करणे ही शेतकऱ्यांची आणि काळाची गरज आहे. शेतीचे तर्कशास्त्र विकसित करण्याची जबाबदारी शेतीतज्ञ, शेती तंत्रज्ञ, शेती अर्थशास्त्रज्ञ, शेती राज्यशास्त्रज्ञ, शेती समाजशास्त्रज्ञ, विविध क्षेत्रांतील शेती अभ्यासक, शेतकी खात्यातील कर्मचारी-अधिकारी तसेच तर्कशास्त्रज्ञ अशा वेगवेगळ्या आणि मुख्यतः शेतकरी वर्गाचीही ज्ञानात्मक जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांची एकत्रित मोट बांधणे आवश्यक आहे.

(लेखक तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक तसेच व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT