Cotton Farming : कापूस वधारला; अन्नधान्य उत्पादन समाधानकारक

Cotton Market : मागील आठवड्यात शेतीमाल बाजारपेठेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. कापूस बाजारपेठेत अचानक तेजी येऊन कापूस ७,५०० रुपयांकडे झेपावला. येत्या काळात या घटनांचा बाजारावर काय परिणाम होऊ शकेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Cotton
Cotton Agrowon

Cotton Production : केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०२३-२४ या कृषिपणन वर्षासाठी अन्नधान्य उत्पादनाचे दुसरे अनुमान प्रसिद्ध केले. एव्हाना चालू पणन वर्षासाठी खरीप हंगामाबाबत तूर वगळता इतर पिकांच्या उत्पादनाबाबत बऱ्यापैकी स्पष्टता आलेली आहे. तांदूळ, तूर, उडीद यांच्या उत्पादनात बाजार विशेषज्ञ बऱ्यापैकी घट होण्याचा अंदाज व्यक्त करत असले तरी सरकारी आकडे समाधानकारक उत्पादन दाखवत आहेत.

खरीप हंगामातील सर्वात मोठे पीक म्हणजे तांदूळ. पहिल्या अनुमानामध्ये १०६ दशलक्ष टन एवढे उत्पादन अपेक्षित होते; परंतु दुसऱ्या अनुमानात ते १११ दशलक्ष टनापर्यंत वाढवले आहे. तांदळाची उत्पादकता अपेक्षेहून अधिक आल्यामुळे हा बदल झाला असावा. परंतु रब्बी हंगामातील उत्पादन अनुमान १७-१८ लाख टन कमी केले असल्यामुळे एकंदर उत्पादन १०-२० लाख टन कमीच राहील.

तुरीचे उत्पादन मात्र पहिल्या अनुमानातील ३४ लाख टनांवरून ३३ लाख टन एवढे घटवले आहे. वर्षाच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या ४३ लाख टन या उद्दिष्टांपेक्षा ते १० लाख टनांनी कमी आहे. बाजाराचे अनुमान मात्र अजूनही ३० लाख टन एवढेच आहे. देशाला दरवर्षी ४८ लाख टन तूरडाळ लागते. या आकडेवारीवरून लक्षात येईल की पुढील आठ-नऊ महिने तरी तुरीचा पुरवठा ‘टाइट’ राहणार आहे.

म्यानमार-आफ्रिकेमधून होणारी आयात अपेक्षेहून कमी आणि महाग असल्यामुळे केंद्र सरकारने चिंता व्यक्त केलीच आहे. ब्राझीलमधून डाळी आयात करार झालेला असला तरी प्रत्यक्ष डाळ येण्यात एक वर्ष तरी जाईल. त्यामुळे पुरवठा पाइपलाइनमध्ये अडथळे येत राहतील त्याप्रमाणे तुरीच्या किमतीदेखील व्यापकपणे पुढील हंगामापर्यंत ८,८००-१२,००० रुपये प्रति क्विंटल या कक्षेत राहतील. हंगामअखेर या कक्षेबाहेरदेखील किमती जाऊ शकतात. २०२४ या वर्षात साठवणूक करण्यासाठी सर्वांत चांगली कमोडिटी म्हणून तुरीवर भरवसा ठेवता येईल.

Cotton
Cotton Productivity : क्षेत्र कमी तरीही वाढली कापसाची उत्पादकता

मक्याच्या उत्पादनात किंचित वाढ करून ते २२७ लाख टन दाखवले असले तरी उद्दीष्टापेक्षा ते १६ लाख टनांनी कमी आहे. परंतु यावर्षी मक्याची मागणी सर्वच क्षेत्रातून वाढली आहे. इतर धान्ये महाग असल्यामुळे पोल्ट्री उत्पादकांना मका हवा आहे, तसेच स्टार्च आणि टेक्निकल टेक्स्टाइल उद्योगदेखील मक्याच्या पुरवठ्याबाबत चिंतित आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या मते मक्याच्या मागणीत चांगली वाढ होत आहे. परंतु या सर्वांवर कळस म्हणून स्वच्छ इंधन म्हणून मक्याला येणाऱ्या मागणीत सर्वाधिक वाढ नोंदवली जात असल्याने पुरवठा कमीच पडणार आहे.

त्यामुळे अर्थशास्त्राच्या नियमानुसार सर्वच घटक किमती चढ्या राहण्यासाठी अनुकूल आहेत. एनसीडीईएक्स कमोडिटी एक्स्चेंज टेफ्लाज आणि ॲग्रीनेट या संस्थांच्या सहकार्याने १५, १६ मार्च रोजी दिल्लीत राष्ट्रीय मका परिषद भरवणार आहे. धोरणकर्त्यांची उपस्थिती असणाऱ्या या महत्त्वाच्या परिषदेत अनेक विषयांवरील चर्चासत्रे होणार असून, त्यात वर नमूद केलेल्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींचा सहभाग राहणार आहे. येत्या काळात मक्याच्या बाजारपेठेबाबतचे व्यापक चित्र या परिषदेत निश्चित उलगडले जाईल.

ऊस उत्पादन अनुमान ४३४ लाख टनांवरून ४४६ लाख टन केल्यामुळे ढोबळपणे साखरेच्या उत्पादनात निदान १० लाख टन वाढ होईल. मात्र साखरेपासून इथेनॉल उत्पादनाबाबतच्या धोरणात बदल केल्यास हे समीकरण बदलू शकते. हरभरा हे रब्बी उत्पादन असले तरी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये नवीन मालाची आवक सुरू झाली आहे. एकंदर कडधान्य उत्पादन कमी असल्यामुळे हरभऱ्याला फायदा मिळून त्याच्या किमती मागील काळात चांगल्या वाढल्या होत्या. अजूनही हरभरा हमीभावाच्या वरच आहे. सरकारी

खरेदीदेखील होणार असल्यामुळे राजस्थानमधून आवक सुरू झाली की किमती कशा राहतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. केंद्र सरकारने दुसऱ्या अनुमानानुसार हरभरा उत्पादन १२२ लाख टन दाखवले असून, ते उद्दिष्टापेक्षा सुमारे १० लाख टन कमी आहे. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन स्थिर आहे. ढोबळपणे पाहता नाफेडने जुन्या हरभऱ्याचे लिलाव केल्याने हरभऱ्याचा एकंदर पुरवठा मागील वर्षीपेक्षा सात ते आठ लाख टन कमी झाला असला तरी देशाची गरज भागवण्यास तो पुरेसा राहील, असे एकंदर चित्र आहे.

शिवाय आयात सवलत दिल्यामुळे पिवळ्या वाटाण्याचा पुरवठा मागील वर्षीपेक्षा सात ते आठ लाख टन अधिक राहिल्यास त्याचा दबाव हरभऱ्यावर राहील. त्यामुळे तूर किंवा उडदाच्या तुलनेत हरभऱ्याचा पुरवठा मुबलक राहील. यास्तव मर्यादित काळासाठी साठवणूक करून बाजारात हमीभावाच्या वर येणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या तेजीत किंवा सरकारी खरेदीत हरभऱ्याची टप्प्याटप्प्याने विक्री करणे मध्यम कालावधीसाठी योग्य ठरेल.

सर्वांत शेवटी गहू. गव्हाच्या उत्पादनाबाबत केंद्र सरकार खूपच आशावादी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हवामान चांगले राहिल्याने उत्पादकता वाढून उत्पादन ११२ दशलक्ष टन होण्याचे अनुमान आहे. सरकारने ११४ लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले होते. त्या तुलनेत उत्पादन २० लाख टन कमी असले, तरी मागील वर्षीपेक्षा ते २० लाख टन अधिक आहे.

गहू आणि तांदूळ या दोन्ही महत्त्वाच्या अन्नधान्य पिकांचे उत्पादन समाधानकारक राहण्याचा अंदाज असल्यामुळे पुढील वर्षात महागाईच्या डोकेदुखीपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा ठेवता येईल.

अर्थात, वरील अनुमाने ही पेरण्यांची आकडेवारी आणि पिकवाढीबाबतची प्राथमिक माहिती यावर आधारलेली असून, सर्व राज्यांकडून माहिती गोळा झाल्यावर यात बदलही होईल. याशिवाय आतापर्यंत हवामानाने साथ दिली असली तरी मार्च महिन्यातील हवामानदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. मागील तीन वर्षे फेब्रुवारी ते एप्रिल आणि मागील वर्षी अगदी मे महिन्यात देखील गारपीट झाली होती. मध्य प्रदेश वगळता इतरत्र फेब्रुवारी महिना चांगला गेला असला, तरी मार्च महिन्याचे हवामान अंदाज तेवढे चांगले नाहीत.

Cotton
Cotton Productivity : क्षेत्र कमी तरीही वाढली कापसाची उत्पादकता

मार्च ते मे महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त तापमान राहणार आहे. उष्णतेच्या लाटा देखील अधिक राहतील. तसेच उत्तर-पश्‍चिम पट्ट्यात पाऊस राहील. एकंदरीत गव्हाचे पीक अंतिम टप्प्यात असताना प्रतिकूल हवामानामुळे उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊ शकेल, अशी चिंता आताच व्यक्त केली जाऊ लागली आहे. उशिरा पेरलेल्या हरभरा आणि मक्याचेही काही प्रमाणात नुकसान होऊ शकते, तर उन्हाळी पिकांचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होईल.

बाजाराच्या दृष्टीने विचार करता रमजाननिमित्त आखाती देशातून मागणी वाढल्यामुळे शेतीमाल निर्यातीला चालना मिळणार असली, तरी जहाज भाड्यातील वाढीचा कितपत परिणाम होईल हे पाहावे लागेल. बांगलादेश देखील अत्यावश्यक गोष्टींच्या आयातीसाठी भारताचे सहकार्य मागत आहे. यातून फळे आणि कांदा यांना जास्त फायदा होईल. काबुली चणा आणि मसाल्याच्या पदार्थांची निर्यात देखील वाढण्याची चिन्हे आहेत.

कापूस तेजीत

मागील महिनाभर या स्तंभातून सातत्याने कापूस बाजारपेठेमधील घडामोडींबाबत आपण चर्चा केली. आंतरराष्ट्रीय बाजारात वेगवान बदल झाल्यामुळे भारतीय कापसाला निदान नजीकच्या काळासाठी तरी बरे दिवस आले असे म्हणता येईल. काही काळापूर्वी प्रति क्विंटल ६,५०० ते ६,६०० रुपयांपर्यंत घसरलेल्या कापसाचे भाव दोन- तीन आठवड्यांत एक हजार रुपयांनी वधारल्यामुळे साठवणूक करून ठेवलेल्या उत्पादकांना निश्‍चितच दिलासा मिळाला आहे.

प्रति क्विंटल ७,४०० ते ७,७०० रुपये हे एप्रिल मध्यापर्यंत निर्धारित असलेले लक्ष्य जवळपास फेब्रुवारी अखेरपर्यंतच पूर्ण झाले आहे. पुढील काळाचा विचार करता कमी वेळात १,००० रुपयांची तेजी आल्यामुळे थोडीशी करेक्शन येणे अपेक्षित आहे. परंतु कल तेजीचाच राहील. निर्यातीत वाढ झाल्याची आकडेवारी स्पष्ट होत जाईल तशी बाजारभावात तेजी येईल आणि एप्रिल महिन्यात ८,००० रुपयांची पातळी गाठणेही शक्य होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच कस्तुरी भारत ब्रॅण्ड या अंतर्गत पहिला सौदा करणाऱ्या शेतकरी आणि जिनर्स यांची भेट घेतली. त्यानंतर कापूस जिनर्स आणि उत्पादकांमध्ये या उपक्रमाविषयी उत्सुकता वाढली असून, राज्यातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या कापसासाठी प्रीमिअम मिळू शकेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

(लेखक कृषी व्यापार व कमोडिटी मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com