Indian Agriculture : हवामान बदलाच्या स्थितीत शेती व्यवस्थापनातील बदल

Climate Changes on Agriculture : हवामान बदलाचा सर्वांत मोठा फटका शेतीला बसतो आहे. हवामान बदलाची नेमकी व्याख्या, कारणे शोधून घेऊन त्यानुसार शेतीत विविध पद्धतींचा अवलंब फायदेशीर राहणारा आहे. अशा सुधारित व्यवस्थापनातूनच शेतीतील नुकसानीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

डॉ. रवींद्र जाधव, डॉ. रमेश चौधरी

Agriculture Management Under Climate Changes : भारतीय शेती प्रामुख्याने मोसमी पावसावर अवलंबून आहे. हवामान बदलाच्या स्थितीमध्ये शेती उत्पादनामध्ये चढ-उतार होण्याची अनेक कारणे आहेत. त्यातीव एक मुख्य कारण म्हणजे अति कमी किंवा प्रमाणापेक्षा जास्त पाऊस हेच ठरते. दुष्काळ महापूर, गारपीट आदी कारणेही त्यात भर घालतात. हवामानातील अन्य घटक उदा. कमी- जास्त आर्द्रता, वाढते तापमान, रोग- किडींचा वाढता प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस यांच्यामुळे शेती प्रभावीत होते.

गेल्या दशकापासून वातावरणातील बदलांचे प्रतिकूल परिणाम शेतीवर दिसून येत आहेत. अलीकडील काळात ते अधिकच गडद झाले आहेत. आगामी काळातही नुकसानीची तीव्रता वा नुकसान आणखी वाढण्याची भीती आहे. त्यातून शेतमाल उत्पादनाबरोबर त्याची गुणवत्ताही कमी होत आहे. हवामानात बदलात मातीची सुपीकता आणि उत्पादकताही कमी होत. त्यामुळे किडी-रोगांची समस्याही वाढणार आहे.

हवामानबदल व परिणाम

कारखानदारी, वाहनांची वाढती संख्या तसेच वाढत्या वातानुकुलीत इमारती यामुळे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन वाढत आहे. शेतीतील काही गोष्टींमुळेही मिथेन वायूचे उत्सर्जन वाढत आहे. नत्रयुक्त खतांचा वापर हा नायट्रस ऑक्साइडचे प्रमाण वाढवत आहे. त्यामुळेच एका बाजूस वायू प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. तर दुसऱ्या बाजूस कार्बन डायऑक्साइडचा वापर करणारी वने व वनस्पती मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहेत.

अलीकडील काळात बऱ्याच प्रमाणात जंगले नष्ट झाली आहेत म्हणजेच कार्बन डायऑक्साइड वापरणारी यंत्रणा नष्ट होत आहे. त्यामुळे हवेत कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे. सूर्यप्रकाशापासून मिळणारी उष्णता कार्बन डाय ऑक्साइड वायू धरून ठेवतो. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान वाढत आहे. त्यामुळेच त्याला जागतिक तापमान वाढ असे नाव देण्यात आले आहे. जेव्हा हवेचे तापमान वाढते तेव्हा हवेचा दाब कमी होतो.

आणि वारा जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वाहतो तेव्हा अतिवृष्टी होते. तर जेथे तापमान सरासरीपेक्षा कमी राहते तेथे हवेचा दाब वाढतो आणि दुष्काळी परिस्थिती जाणवते. यालाच हवामान बदल असे म्हणतात. काही भागात अवकाळी पडणारा पाऊस आणि त्यातून होणारे शेतीचे नुकसान हे नेहमीचेच झाले आहे. काही कालावधीत उदा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात होणारी गारपीट आणि पाऊस यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

Indian Agriculture
Fight for Climate Changes : सारे जग सरसावले हवामान बदलाशी लढायला

बदलत्या हवामानात पर्यायी शेती व्यवस्थापन

पीक पद्धतीत बदल

हवामान बदलाच्या काळात कमी पावसावर येणाऱ्या पिकांचा अवलंब करणे गरजेचे आहे. राज्यात कापूस पिकाखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. त्यास बरीच कारणे आहेत. सध्या बहुतांशी बीटी कापसाचीच लागवड आहे. कापूस पिकाचा कालावधी सुमरे सात ते साडेसात महिन्यांचा आहे. तर मॉन्सूनचा कालावधी सुमारे चार महिन्यांचा आहे. पाऊसमान आणि कपाशीचा कालावधी जुळत नाही.

शिवाय विविध किडींचा प्रादुर्भावही जाणवत आहे. कपाशीचे जवळपास ९५ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. कपाशीच्या वाढीच्या काळात गरजेनुसार पाणी उपलब्ध होत नाही. विविध कारणांमुळे राज्यातील कपाशीची सरासरी उत्पादकता केवळ तीन क्विंटल प्रति हेक्टर आहे. उत्पादन खर्च अधिक आहे. त्या तुलनेत दर व नफा कमी असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत. त्यामुळे कर्जबाजारी होण्याची समस्याही वाढली आहे. अशावेळी कपाशीखालील क्षेत्र कमी करून तेथे तूर, सोयाबीन, मका, मिरची आदींची लागवड करुन शाश्वत उत्पादन घेण्याची गरज भासत आहे.

रुंद- सरी व वरंबा पद्धत वापरणे

जलसंधारणाचे उपाय म्हणून रुंद- वरंबा व सरी पद्धतीचा वापर वाढवणे गरजेचे आहे. सोयाबीन सारख्या पिकांची पेरणी रुंद- वरंब्यावर (बीबीएफ पद्धतीने) करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. त्यामुळे हेक्टरी उत्पादकता वाढू शकेल.

रब्बी ज्वारीसाठी बंदिस्त वाफे

पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी मोठ्या आकाराचे वाफे अनुकूल ठरतील. जमिनींच्या उतारानुसार वाफ्याचा आकार असावा. वाफे तयार करताना सारा यंत्राने सारे करून त्यामध्ये नांगराने योग्य अंतरावर दंड टाकल्यास कमी खर्चात बंदिस्त वाफे तयार करता येतात. त्यातून पावसाचे पाणी वाफ्यात मुरवता येते. योग्य ओलाव्यावर पेरणी केल्यास पुन्हा होणाऱ्या पावसाचाही त्या पध्दतीने फायदा घेता येतो. त्यातून हेक्टरी ३० ते ४० टक्के उत्पादन वाढू शकते. जलसंधारणाची ही पद्धत रब्बी ज्वारीसाठी फायदेशीर ठरू शकते.

Indian Agriculture
Climate Change Impact In Agriculture : शेतीचा करा नव्याने विचार

हरभरा पिकाखालील क्षेत्रात वाढ करणे

हरभरा हे कमी पाण्यात येणारे पीक आहे. जेथे दोन ते तीन पाणी उपलब्ध असतील तेथे बागायत हरभऱ्याची लागवड करता येते. तर कोरडवाहू हरभऱ्याची लागवड ऑक्टोबर महिन्यात करून सारे पाडावेत. त्या साऱ्यांमध्ये पावसाचे पाणी मुरेल असे नियोजन करावे. त्यामुळे हरभऱ्याची हेक्टरी उत्पादकता देखील वाढण्यास मदत होईल.

सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब

पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केल्यास जवळपास ६० ते ७० टक्के पाण्याची बचत होऊ शकते. ठिबकद्वारे द्रवरूप खते दिल्याने काटेकोर पाण्यात अधिक उत्पादन काढणे शक्य होईल व पाणी बचत देखील करता येईल.

संरक्षित पीक पद्धतींचा अवलंब करणे

पॉलिहाउससारख्या संरक्षित पद्धतीचा वापर करून ढोबळी मिरची, जरबेरा, कार्नेशन, गुलाब, टोमॅटो, काकडी आदींची लागवड फायदेशीर ठरते. ठिबकद्वारे पाणीपुरवठा, अन्नद्रव्यांचा वापर व अन्य काटेकोर व्यवस्थापन केल्यास दर्जेदार कमाल तयार करता येतो.

आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे

एकपिक पद्धतीपेक्षा आंतरपीक पद्धती निश्चितपणे फायद्याची ठरते. मुख्य पिकाशिवाय आंतरपिकाचे उत्पादन शेतकऱ्यांना बोनस म्हणून मिळते. कोरडवाहू क्षेत्रात बाजरी + तूर (२:१), सोयाबीन + तूर, कपाशी + मूग किंवा उडीद अशी आंतरपिके घेणे फायद्याचे ठरते. तसेच बागायती क्षेत्रात ऊस + बटाटा किंवा भुईमूग, ऊस + हरभरा, ऊस + कांदा, ऊस + कोबीवर्गीय पिके, अशा प्रकारे अनेक आंतरपिके घेता येतात.

आच्छादनांचा वापर करणे

कोरडवाहू क्षेत्रात विविध प्रकारच्या आच्छादनांचा वापर करून बाष्पीभवनाचा वेग रोखता येतो. तसेच उन्हाळी हंगामात फळबागांमध्ये देखील आच्छादन फायदेशीर ठरते.

प्रकाश परिवर्तकांचा वापर

पिकांवर केओलीनची आठ टक्के फवारणी करून प्रकाश परिवर्तन साधता येते. त्यायोगे बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. फळपिकांसाठी पाणीटंचाईच्या काळात ही पद्धत खूप फायदेशीर ठरते.

जलयुक्त शिवारसारख्या योजनांचा अवलंब

शासनाकडून वेगवेगळ्या अभियानांद्वारे गावगावांत साखळी बंधारे व शेततळी तयार करून पाणी समस्या सोडवण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जलसंधारण होते. पाणीसाठा तयार होतो. त्यातून भूगर्भातील पाणीपातळी वाढते. कोरडवाहू भागातील पिण्याच्या पाण्याचे, सिंचनाचे आणि जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्न मिटण्यास मदत होते.

डॉ. रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१

(सहायक प्राध्यापक, मृदाशास्त्र विभाग, शासकीय कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com