Knife Book Agrowon
ॲग्रो विशेष

Book Review : लेखकावर नव्हे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चाकूहल्ला

Knife Book : दुसऱ्या महायुद्धात फॅसिस्ट शक्तींचा पराभवझाला. त्यानंतर जगभर लोकशाही शासनव्यवस्था अवतरेल, असा विश्‍वास निर्माण झाला होता.

Team Agrowon

Book Update :

प्रा. अविनाश कोल्हे

पुस्तक : नाइफ

लेखक : सलमान रश्दी

प्रकाशक : पेंग्विन (रँडम हाउस)

पाने : ३२०

किंमत : ६९९ रु.

(ई-बुक ४२३ रुपये, तर हार्डबाउंड १३३३ रुपये)

दुसऱ्या महायुद्धात फॅसिस्ट शक्तींचा पराभवझाला. त्यानंतर जगभर लोकशाही शासनव्यवस्था अवतरेल, असा विश्‍वास निर्माण झाला होता. त्यानंतर सुरू झालेल्या निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेने काही प्रमाणात हा विश्‍वास सार्थ असल्याचे सिद्ध झाले होते. मात्र १९८० च्या दशकापासून यात सूक्ष्म बदल व्हायला लागला. लोकशाहीत असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आणि आविष्कारस्वातंत्र्याचा संकोच होताना दिसायला लागला. या संदर्भातली महत्त्वाची घटना म्हणजे ‘सॅटेनिक व्हर्सेस’ लिहिल्याबद्दल सलमान रश्दी (जन्म ः १९४७) यांना इराणचे धार्मिक प्रमुख आयोतुल्ला खोमेनी यांनी जाहीर केलेली मृत्यदंडाची शिक्षा. ही कादंबरी सप्टेंबर १९८८मध्ये प्रसिद्ध झाली होती. इराणमध्ये फेब्रुवारी १९७९ मध्ये धार्मिक क्रांती झाली होती. आयोतुल्ला खोमेनी यांनी ही शिक्षा १४ फेब्रुवारी १९८९ रोजी जाहीर केली होती.

आजच्या काळातील महत्त्वाचे लेखक म्हणून सलमान रश्दी ओळखले जातात. त्यांच्या १९८१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मिडनाइट चिल्ड्रेन’ या कादंबरीला प्रतिष्ठेचा ‘बुकर’ पुरस्कार मिळाला होता. तेरा कादंबऱ्या, दोन कथासंग्रह अशी ग्रंथसंपदा नावावर असलेल्या सलमान रश्दींच्या ताज्या ‘नाइफ’ पुस्तकाची मोठी चर्चा आहे. या पुस्तकाची थोडी पार्श्‍वभूमी माहिती असल्यास पुस्तकाविषयी जाणून घेताना फायदा होईल.

सतत मृत्युदंडाच्या भयाखाली वावरत असलेल्या रश्दींनी अमेरिकेत आश्रय घेतलेला आहे. ते गेली चोवीस वर्षे अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. १२ ऑगस्ट २०२२ रोजी रश्दी अमेरिकेत व्याख्यान देत असतानाच काळे कपडे, काळा बुरखा परिधान केलेल्या एका २४ वर्षीय तरुणाने स्टेजवर चढून रश्दींवर चा़कूने हल्ला केला. त्याने अवघ्या २७ सेकंदांत रश्दींवर पंधरा वार केले. यात रश्दी बचावले तरी त्यांचा एक डोळा कायमचा जायबंदी झाला. या जीवघेण्या अनुभवावर लिहिलेले पुस्तक म्हणजे ‘नाइफ’. या नावासोबत जोडलेली ओळ म्हणजेच ‘खुनाच्या प्रयत्नांनंतरचे ध्यान’ यातूनच पुस्तकाची संपूर्ण दिशा स्पष्ट होते. (Knife : Meditations After an Attempted Murder)’

लेखकाने नाइफ या पुस्तकाची रचना कालानुक्रमे केली आहे. प्रत्यक्ष हल्ला होण्याआधीचे प्रसंग, त्यात एका मुलीशी एलिझाशी झालेली ओळख, त्यातले चढ-उतार, नंतर अचानक झालेला हल्ला, रुग्णालयातील दिवस आणि आता जगत असलेले नॉर्मल आयुष्य यात ठिकठिकाणी रश्दी जागतिक साहित्य/ कलेतील संदर्भ अतिशय सफाईने पेरतात. या वाचकांना हेन्री जेम्स, इटालो काल्व्हीनो वगैरे कादंबरीकार तसेच मार्केझ यांच्या कादंबऱ्यांचे उल्लेख वाचायला मिळतात. वयाच्या ७७ व्या वर्षी लिहिलेले पुस्तक म्हणजे त्यांच्या शैलीचा परिपक्व आविष्कार आहे, असे नक्कीच म्हणता येते. यात रश्दी स्पष्ट शब्दांत लिहितात, की आजही त्यांना ‘सॅटनिक व्हर्सेस’ लिहिल्याबद्दल पश्‍चाताप होत नाही. या ओघातच ते त्यांची धर्माबद्दलची भूमिका स्पष्ट करतात. धर्मानुसार आचरण करायला हरकत नाही. पण त्याचबरोबर प्रत्येकाला धर्मावर टीका करण्याचा हक्क असला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे ते आग्रहाने मांडतात.

एक संवेदनशील लेखक म्हणून रश्दी या पुस्तकात अनेक ठिकाणी प्रेमाबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दल स्वतःची मते मांडतात. ही मते मांडतांना त्यांच्या मनात ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेबद्दल फार तीव्र भावना असल्याचे दिसून येते. शिवाय व्यक्तीची कृती आणि त्याचे भोगावे लागणारे परिणाम याबद्दलसुद्धा त्यांच्याकडे वैचारिक स्पष्टता आहे. परिणामांची भीती समोर ठेवून चांगले लेखन करता येत नाही, अशी त्यांची धारणा आहे. या निराळ्या प्रकारच्या लढाईत लेखकांनीही त्यांचे महत्त्वाचे शस्त्र म्हणजे शब्द प्रभावीपणे वापरले पाहिजेत, असे त्यांना वाटते.

कल्पना आणि वास्तव यांचे बेमालूम मिश्रण करणे हे सलमान रश्दीच्या शैलीचे वैशिष्ट्य मानले जाते. ‘नाइफ’ मध्येही त्यांनी ते स्वतः हल्लेखोराला भेटायला तुरुंगात जातात, अशी कल्पना करीत त्यावर लेखन करतात. रश्दीची शैली प्रसन्न असली तरी या पुस्तकावर मृत्यूचे सावट असल्याचे सतत जाणवत राहाते. यात तसे वावगे नाही. हे पुस्तक मुळातच जीवघेणा हल्ला झाल्यावर लिहिलेले आहे. त्यामुळे त्याच्यावर मृत्यूची सावली असणे स्वाभाविक आहे. मात्र आता आपल्याला दुसरे आयुष्य मिळाले आहे, तर यातही आपले सर्वस्व ओतावे, ही त्यांची भावनासुद्धा लक्षात येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT