Book Review : शेतीची बिकट वाट...

The Difficult Path of Farming Book : एकेकाळी समृद्ध शेती असलेल्या भारताने आपली कृषिप्रधान देश ही ओळख आजवर अभिमानाने मिरवली. परकीय आक्रमण आणि पारतंत्र्याच्या काळात शेतीकडे दुर्लक्ष होत गेले.
Book
BookAgrowon
Published on
Updated on

नीलेश माळी

Samruddha Shetichi Bikat Vaat Book Update :

पुस्तकाचे नाव : समृद्ध शेतीची बिकट वाट

लेखक : सचिन आत्माराम होळकर

प्रकाशन : अक्षरबंध प्रकाशन, जऊळके दिंडोरी, जि. नाशिक

पाने : १०४

किंमत : २०० रुपये

एकेकाळी समृद्ध शेती असलेल्या भारताने आपली कृषिप्रधान देश ही ओळख आजवर अभिमानाने मिरवली. परकीय आक्रमण आणि पारतंत्र्याच्या काळात शेतीकडे दुर्लक्ष होत गेले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज कशी भागवली जाणार, असे म्हणणाऱ्या विकसित देशांना आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या कामातून चोख उत्तर दिले. पण शेतीच्या प्रश्‍नांची जाण व दूरदृष्टी असलेल्या राजकीय नेतृत्व आणि प्रशासनाच्या अभावामुळे शेतीसमोरील आव्हानांमध्ये सातत्याने वाढच होत गेली.

Book
Book Review : शिवार सुगंधाचे मौलिक संपादन

आपल्या देशात फक्त निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक पक्षाला शेतकरी आठवतो. मग कर्जमाफी, वीजबिल माफी, शेतीमालाला हमीभाव, अनुदान अशा लालूच दाखविणाऱ्या वरवरच्या मलमपट्ट्या केल्या जातात. पोकळ आश्‍वासनातून सामान्य शेतकऱ्याच्या हाती काय पडते, हा खरा संशोधनाचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या समस्या नेमकेपणाने समजून योग्य धोरणांची आखणी करण्याची गरज आहे. या समस्या विविध वृत्तपत्रांमधून सातत्याने मांडण्याचे काम स्वतः फळबागशास्त्राची पदवी घेतलेले सचिन होळकर गेल्या काही वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या लेखांचा संग्रह असलेले ‘समृद्ध शेतीची बिकट वाट’ हे आठवे पुस्तकही तेच काम नेटाने करते.

शेतकरी आत्महत्या हा खरेतर कोणत्याही समाजाला लागलेला कलंक आहे, हे आपण कधी मान्य करणार? आत्महत्या झाल्यावर प्रथम विविध कारणे दाखवत नाकारण्यापासून शेवटी नाइलाज म्हणून मान्य करण्यापर्यंत अचाट धावपळ करणारी नोकरशाही यंत्रणा आत्महत्या होऊच नये यासाठी प्रयत्न का करत नाही? दर काही वर्षांनी मिळणाऱ्या वेतन आयोगाप्रमाणे वाढणाऱ्या नोकरदारांच्या पगाराच्या तुलनेमध्ये शेतकरी आणि अन्य असंघटित वर्गातील सामान्यांचे उत्पन्न वाढले का, यावर कधीच कोण बोलत नाही? उलट देशांतर्गत ग्राहकांना खुश करण्यासाठी धोरणे राबविण्यात शासन आघाडीवर असते. मग धरसोड पद्धतीने घेतले जाणारे निर्यातबंदीचे निर्णय आणि विविध जाचक अटींच्या पायतळी शेतकऱ्यांच्या हित तुडवले जात असते. यातून शेतकरी संपत आहे, हे कुणाला समजत नाही का?

Book
Book Review : बाप अनेक अर्थांनी भेटतो तेव्हा...

प्रत्येक पिकाच्या लागवडीपासून शेतकऱ्याला चांगल्या उत्पादनाची आणि उत्पन्नाची अपेक्षा असते. शेतीला जर आपण व्यवसाय म्हणत असू, तर उत्पन्नाची आशा असणे स्वाभाविकच आहे. त्यासाठी तो रासायनिक निविष्ठांचा वापर करत राहतो. त्याचा अतिरेक झाल्याचे सांगत कोणी त्याला सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करायला सांगतो. त्यातून शेतकऱ्यांनी नेमका कोणता मार्ग पकडावा, हे समजत नाही. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी अभ्यासपूर्वक खरेतर एकत्रितपणे याचा निर्णय घ्यायला हवा.

या भ्रमातून बाहेर येऊन शेती व्यवस्थापन करताना आसमानी संकटाची मालिकाच त्याच्या उघड्यावरील शेतावर येऊन आदळत असते. त्याला जोड असते ती मानवनिर्मित कारणांची. उदा. प्रत्येक हंगामात कृषी निविष्ठांचे गगनाला भिडलेले भाव, बँकांद्वारे कर्ज मिळविण्यात येणाऱ्या आडकाठी, दिवसेंदिवस न मिळणाऱ्या विजेच्या बिलाची वसुली अशा अडथळ्यातून आलेल्या उत्पादनाला बाजारात नेऊन विक्रीपर्यंतचा खडतर प्रवास आणि तिथे मिळणारा नगण्य दर अशा स्थितीत शेतकऱ्याला फायदा कसा मिळणार? या पुस्तकामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांची मांडणी करण्यात आलेली आहे. शेतमजूराची अनुपलब्धता, आर्थिक चक्रव्यूह, सामाजिक पातळीवर शेतकऱ्याचे घसरणारे मूल्य, त्यातून बिघडत चाललेली मानसिक स्थिती...

अशा नुसत्या समस्यांची यादी पाहिली तरी आपल्याला शेतकऱ्याचा संघर्ष कळू शकेल. शेतकऱ्यांना शेती करताना येणाऱ्या प्रत्येक अडचणीविषयी अगदी मोजक्या शब्दांत मांडणी या पुस्तकात केलेली आहे. काही प्रमाणात या समस्यांवर उपाययोजना सुचविण्याचाही त्यांचा प्रयत्न दिसतो. मात्र विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेळी प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह किंवा पुस्तक करत असताना अधिक साक्षेपाने संपादन करण्याची गरज असते. त्या बाबत थोडे लक्ष दिले असते, तर या पुस्तकाचे मूल्य अधिक वाढले असते, असे वाटत राहते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com