Book Review : संघर्षप्रिय तरुणाची डायरी

Mrutyu Jaglela Manus : शिकून आनंदी जीवन जगण्याचा इरादा सगळ्यांचाच असतो. पण चांगले शिक्षण घेत असताना त्याला अचानक कर्करोगाची लागण व्हावी आणि ते कळाल्यानंतर उपचार घेताना वेदनांच्या मालिकेतून जात असताना, मृत्यू सोबत करताना त्याला प्रत्यक्ष जाणवतो.
Book Review
Book ReviewAgrowon
Published on
Updated on

Book : पुस्तकाचे नाव: मृत्यू जगलेला माणूस

सौरभ जाधव यांच्या दैनंदिनीतील नोंदी

संपादक: डॉ. दिलीप शृंगारपुतळे

प्रकाशन: निर्मल प्रकाशन, नांदेड.

पाने : १७०

मूल्य : २०० रू

शिकून आनंदी जीवन जगण्याचा इरादा सगळ्यांचाच असतो. पण चांगले शिक्षण घेत असताना त्याला अचानक कर्करोगाची लागण व्हावी आणि ते कळाल्यानंतर उपचार घेताना वेदनांच्या मालिकेतून जात असताना, मृत्यू सोबत करताना त्याला प्रत्यक्ष जाणवतो. तरीही तो त्याच्या दैनंदिनीमध्ये लिहितो, ‘‘मी कसा आहे किती टक्के लोकांना माहीत आहे काय? मला वाटत नाही मला १०० टक्के कोणी ओळखलं आहे. मी प्रत्येक क्षण जगतो तो आनंद मिळविण्यासाठी; हसतो ते दुःख लपविण्यासाठी; एकट्यात रडतो; ते मी दुबळा आहे हे लपविण्यासाठी. मला हार जमत नाही. मी जिंकण्यासाठी जगत आहे. ही माझ्यात घमंड आहे. मी कोणाचा आदर करत नाही. पण मी एन्जॉय करतो. मी एकटा राहतो तेव्हा जास्त खूष असतो.'''' स्वतःबद्दल इतकं प्रामाणिक कोण लिहू शकतो? तर ज्याच्यासोबत मृत्यू वावरायचा आणि अखेर जो मृत्यूचाच खरा सोबती झाला; तो संघर्षप्रिय तरुण म्हणजे सौरभ सुनीलराव जाधव-केरवाडीकर.

Book Review
Book Review : बाप अनेक अर्थांनी भेटतो तेव्हा...

सौरभने ९ ऑक्टोबर २०१४ ते २० नोव्हेंबर २०२२ अशी आठ वर्षें आपली दैनंदिनी लिहिलेली आहे. कर्करोगाचे उपचार आणि आर्थिक ओढाताण, मानसिक ताण-तणाव याबद्दल वेळोवेळी व्यक्त होतो. तसेच ही लढाई लढत असतानाच तो बी. फार्मसी. नंतर एम. एस. आणि सरतेशेवटी परभणीच्या श्री. शिवाजी फार्मा संस्थेत कायमस्वरूपी प्राध्यापक म्हणून कार्य करण्याची इच्छा व्यक्त करतो. तत्पूर्वी त्याने अनेक कंपन्यांमध्ये आणि प्रस्तुत महाविद्यालयात काम केलेले आहे. रुग्ण असूनही शिक्षणाची आणि जगण्याची उमेद न सोडणाऱ्या या पठ्ठ्याने जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत निग्रहाने लढा दिला. पण अखेरीस तो या जगातून आपल्यासाठी कायमचा परका झालेला आहे. त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या वडिलांनी- सुनीलरावांनी- डॉ. दिलीप शृंगारपुतळे या जाणत्या संपादकांकडे त्याच्या दैनंदिन नोंदींची वही आणि त्याला जाणणाऱ्या मान्यवरांचे लेख दिले. डॉ. शृंगारपुतळे यांनी नेटके संपादन करून हे पुस्तक आकाराला आणले.

Book Review
Book Review : शेतीची बिकट वाट...

आनंदात जग आनंदी वाटते. पण आपण दुःखात असल्यावर जग दुःखात राहत नाही. जगाने दुःखात असावे, हा ही जीवनव्यवहार संभवत नाही. पण समानुभूती सोडा, सहजाणीव असणे अपेक्षित असते. पण सौरभला काही सोयऱ्याधायऱ्यांकडून त्याच्या दुःखाच्या बाबतीत दुजेपणा जाणवतो. याची नोंद तो दि. १४ जून २०१६ च्या दैनंदिनीमध्ये करतो. तो लिहितो, ‘‘येतात नातेवाईकांचे फोन पण फक्त एक रुल आहे म्हणून; हृदयापासून नाही. जाऊ द्या आम्हाला फरक पडत नाही."ही त्याची वाक्ये वाचताना वाचक आतून हादरतो. मी माझ्या आईचा कर्करोग २०१९ मध्ये जवळून अनुभवलेला आहे. त्यामुळे सौरभचे अनुभव हे मला माझे अनुभव आहेत, असेच पुस्तक वाचताना वेळोवेळी वाटायचे. मी पानापानांवर कित्येकदा थबकलो, भावुक झालो. सौरभचे घरदार-मामा त्याच्या दुःखाने कसे झुलत आणि झुरत होते, हे सौरभने शब्दाशब्दांतून सांगितलेले आहे. सौरभचा या लेखनातील एक महत्त्वाचा गुण म्हणजे तो खरे लिहितो आणि टोकदारही लिहितो.

ही दैनंदिनी म्हणजे सौभरचा आत्मसंवाद आहे. संत तुकारामांसारखी निढळ वृत्ती त्याच्यात जाणवते. त्याचे लिखाण तत्त्वज्ञानाच्या पातळीवरचे आहे. इच्छाशक्तीच्या बळावर सतत आठ -नऊ वर्षें कर्करोगाचा सामना करताना तो या जगाला सांगून गेलाय,"घाबरू नका. कामात आनंद घ्या. आपल्या भावना शब्दबद्ध करा. वेळकाळाची गणितं ओळखा. माणसं न्याहाळा. आपण स्वतःचे जग व जगणे समृद्ध करावे."

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com