Vidhansabha Election Result Agrowon
ॲग्रो विशेष

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Election Result 2024 : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने जोरदार बॅटिंग करत १० पैकी ९ जागांवर विजय मिळवत इतिहास घडवला. जिल्ह्यात दहापैकी एकाही जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला नाही.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur / Sangli News : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने जोरदार बॅटिंग करत १० पैकी ९ जागांवर विजय मिळवत इतिहास घडवला. जिल्ह्यात दहापैकी एकाही जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला नाही. चंदगड विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार विजयी ठरले. शहरासह जिल्ह्यातील एकही जागा काँग्रेसला जिंकता न आल्याने सतेज पाटील यांचा प्रभाव दिसला नाही.

इचलकरंजी विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे सर्वोच्च ५५,००० मतांनी निवडून आले. महायुतीचे विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपला गड कायम राखला. महायुतीचे राहुल आवाडे, अशोक माने, राजेश क्षीरसागर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा दणदणीत पराभव करत विजयाची माळ पदरात पाडून घेतली.

कोल्हापूर शहरात काँग्रेसला दोन्ही जागा गमवाव्या लागल्या. कोल्हापूर दक्षिणमधून विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांचा अमल महाडिक यांनी १७,९३६ मतांनी पराभव केला. तर, दुसरे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्यावर राजेश क्षीरसागर यांनी ३० हजारांहून अधिक मतांचे अधिक्य घेत विजय मिळवला. कागल मतदार संघामध्ये विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपला गड अभेद्य राखत समरजीत सिंह घाटगे यांचा पराभव केला.

हातकणंगलेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोक माने यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू आवळे यांचा ४० हजारांहून अधिक मतांनी दणदणीत पराभव केला. शिरोळमध्ये विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांचा ४० हजारांहून अधिक मतांनी पराभव करत आमदारकी मिळवली.

स्वाभिमानी संघटनेचे उल्हास पाटील यांनीही कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला, पण ते तिसऱ्या स्थानावर राहिले. शाहूवाडी पन्हाळा मतदार संघात विद्यमान आमदार विनय कोरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा ३६ हजारांहून अधिक मतांनी पराभव करत पुन्हा आमदारकीला गवसणी घातली.

करवीर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राहुल पाटील यांचा चंद्रदीप नरके यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत थरार रंगला. अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये नरके यांनी बाजी मारली. चंदगडमध्ये महायुतीचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांचा अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी पराभव केला.

महाविकास आघाडीच्या नेत्या नंदाताई बाभुळकर यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. राधानगरी मतदार संघात आमदार प्रकाश आबिटकर यांनी महाविकास आघाडीच्या के. पी. पाटील यांचा २५००० हून अधिक मतांनी पराभव करत तिसऱ्यांदा आमदारकी मिळवली.

सांगलीत जयंत पाटील, रोहित पाटील, विश्वजित कदम विजयी

सांगली जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघांमध्ये चुरशीची होणारी निवडणूक एकतर्फीच दिसून आली. महायुतीचे पाच उमदेवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीला तीन जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने गेल्या वेळी गमावलेल्या जत आणि शिराळा या दोन्ही जागा पुन्हा मिळवल्या आहेत. जिल्ह्यात आठ पैकी पाच जिंकून महायुतीने बाजी मारली आहे.

महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील, विश्वजित कदम यांच्यासारख्या दिग्गजांना जिंकतानाही नाकी दम आला. सांगलीत सुधीर गाडगीळ, मिरजेत सुरेश खाडे यांनी काँग्रेसच्या बंडखोरीचा लाभ घेत निर्विवाद यश मिळवले, शिराळ्यात सत्यजित देशमुख, जतमध्ये गोपीचंद पडळकर यांनी धक्कादायक विजय मिळवत भाजपच्या जिल्ह्यातील विजयावर शिखर चढवले.

खानापूर-आटपाडी मतदार संघात सुहास बाबर यांनी दिवंगत अनिल बाबर, तर तासगावात रोहित पाटील यांनी आर. आर. पाटील यांचा वारसा कायम ठेवला. लोकसभेला ‘बॅकफूट’वर गेलेल्या भाजपने मतदार संघनिहाय ‘मायक्रो प्लॅनिंग’ करीत दुरुस्त्या केल्या. जिल्ह्याचा सामना पाच विरुद्ध तीन असा जिंकला.

खानापूर आटपाडीत शिंदे गटाच्या शिवसेनेने बाबरांना आपलेसे करीत निकालाची पुनरावृत्ती केली. काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी, व्यक्ती घराण्याच्या अहंकारात आशादायी वातावरण काँग्रेसनेच धुळीस मिळवले. तेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाबाबत झाले. जयंत पाटील यांनी मैदान मारले. रोहित पाटील यांनी काट्याच्या लढतीत चांगले यश मिळवले तर शिराळा मतदारसंघात मानसिंगराव नाईक यांना धक्का बसला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

Postal Votes : पोस्टल मतांनी पटोलेंना तारले

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

SCROLL FOR NEXT