भीमाशंकर बेरुळे
Agriculture Land Proof: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या दहाव्या प्रकरणात हक्क नोंद तयार करून ठेवण्याबाबत कायदेशीर तरतुदी केलेल्या आहेत. यातील भोगवट्याखालील जमिनीबाबत हक्क नोंदणी पत्रके ‘अ’ विभागातील कलम १४७ ते १५९ मध्ये कायदेशीर तरतूद आहे. तर ‘ब’ भागात भोगवट्यात नसलेल्या जमिनीबाबत हक्क विशद करणारी कलमे १६० ते १६७ ची समाविष्ट आहेत. आपण येथे भोगवट्यात असलेल्या जमिनीबाबतच्या हक्क नोंदीचा विचार करणार आहोत.
सातबारामध्ये काय नोंदवावे?
जमीन धारण करणारे, (कुळाखेरीज करून) भोगवटा करणारे, मालक, गहाण घेणारे, जमिनीचे भाडे घेणारे किंवा महसूल आपले नावे करून घेणारे अशा इसमांची नावे हक्क नोंदीत नमूद असतील.
सरकारी पट्टेदार म्हणून किंवा संबंधित कूळ कायद्याप्रमाणे कूळ; तसेच जे जमीन धारणा करीत असतील अशांची नावे हक्क नोंदीत नोंदवायची आहेत.अशा इसमांच्या हितसंबंधाचे स्वरूप आणि त्याची मर्यादा, त्याच्याशी संबंधित असलेल्या अटी किंवा दायित्व जे असेल ते, त्याचा तपशील हक्क नोंदीत दाखवायचा आहे.
अशा इसमांपैकी कोणीही देण्याजोगा खंड किंवा महसूल हक्क नोंदीत नोंदविला पाहिजे.
राज्य शासनाने या बाबतीत केलेल्या नियमान्वये निर्दिष्ट केलेल्या क्षेत्राच्या प्रयोजनासाठी विहित केलेला तपशील हक्क नोंदीत असला पाहिजे.
हक्काबरोबरच कर्तव्यांची नोंद
जमीन महसुलाचे हिशेब या अभिलेखावर आधारित असतात. तेव्हा हक्काबरोबर कर्तव्यांचीही नोंद सात बारामध्ये असते. प्रत्येक जमीन खातेदाराला त्याच्या नावे असलेल्या जमिनीच्या प्रत्येक तुकड्यावरील जमीन महसूल, तसेच त्यावरील शासकीय कर/महसूल देण्यासाठी जबाबदार धरण्यात येते. अर्थातच यामुळे बेनामी खातेदार राहत नाहीत, ते नष्ट होतात. इनाम जमिनीच्या बाबतीत कोणता जमीनधारक जुडी भरण्यास जबाबदार आहे हे हा अभिलेख दाखवितो.भाडेपट्ट्याच्या किंवा इतर खास जमीनधारणा पद्धतीने देण्यात आलेल्या जमिनीच्या बाबतीत जी व्यक्ती जमिनीचा महसूल देण्यासाठी जबाबदार धरली जाते ती या जमिनीची कब्जेदार मानायची आहे. जमिनीत जर कूळ असेल, तर कुळाने द्यावयाची खंडाची रक्कम दाखविलेली असते.
सातबारा हक्क पत्रक
भूधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे दाखवून देणारा गावच्या अभिलेखामधील (रेकॉर्ड) सातबारा हा एक कागद आहे. जमिनीची मालकी, भोगवटा, कब्जावहिवाट निर्विवादपणे सातबारा दाखवितो. जमिनीवरील भोगवट्यास पोलिस आणि महसूल खात्याकडून संरक्षण प्राप्त करण्यास या नमुन्याचा उपयोग होतो. जमिनीवरील भोगवटा कोर्टात सिद्ध करण्यास उपयोगी ठरतो. राष्ट्रीय बँक, सहकारी बँक, सहकारी सोसायटीमधून कर्ज काढण्यासाठी जेव्हा जमीन गहाण ठेवावी लागते तेव्हा सात-बारा उपयोगी पडतो. त्याच्या आधारे गरजू भूधारकाला सरकारकडून कर्ज म्हणजे तगाई प्राप्त करता येते. कोर्टात जामीन राहण्यासाठी या नमुन्याचा व्यावहारिक उपयोग आहे.
ना-शाबीत होईपर्यंत हक्क नोंद खरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम १५७ च्या तरतुदीनुसार हक्क नोंदीतल्या नोंदी त्याविरुद्ध शाबीत होत नाहीत, तोपर्यंत खऱ्या असल्याचे गृहीत धरायचे आहे. भक्कम साक्षी- पुराव्याच्या आधारे जेव्हा गृहीत धरलेले हे सत्य नाशाबित होईल, तेव्हाच या नोंदीची पुरावा म्हणून किंमत शून्य होते.
जमीन व महसूल व्यवस्थापनासाठी तलाठ्याला जे विविध गाव नमुने ठेवावे लागतात त्यांपैकी सर्वांत महत्त्वाचा सातबारा हा गाव नमुना आहे.
जमिनीचा सरकारी कागद म्हणून फक्त सातबारा हे दोन गाव नमुने आहेत. एक सात आणि दुसरा बारा हे दोन्ही नमुने एकाच कागदावर एकत्रित असतात, त्यामुळे त्यास एकत्रित असा सातबारा उतारा म्हटले जाते. यांपैकी गाव नमुना सात वरच्या बाजूला, तर गाव नमुना बारा खालच्या बाजूस असतो. त्यामुळे यास याला जोड नमुनाही म्हणतात.
गाव नमुना सातला हक्क पत्रक आणि गाव नमुना बाराला पीकपाहणी पत्रक म्हणून संबोधले जाते. या जोड नमुन्यातील गाव नमुना सात हक्क पत्रकाची प्रथम आपण माहिती घेऊयात. त्यानंतर गाव नमुना बारा पीकपाहणी पत्रकाची माहिती घेऊयात.
गाव नमुना सात (हक्क पत्रक)
गाव नमुना सातबारामधील गाव नमुना सात अधिकार अभिलेखाचे तीन ढोबळ भाग आहेत. हा नमुना समोर धरला तर त्याचे पडणारे तीन भाग खालीलप्रमाणे आहेत.
एक: जमिनीची माहिती ः डावी बाजू.
दोन : जमीन भोगवटदार ः मधला भाग.
तीन : इतर हक्क ः उजवी बाजू.
डावी बाजू
शेतवार पत्रकावरून जमिनीची घेतलेली माहिती
गाव नमुना सातमध्ये सुरुवातीला शिरोभागी गावाचे नाव व तालुक्याचे नाव दर्शविलेले असते.भूमापन क्रमांक, जर असेल तर भूमापन क्रमांकाचा उपविभाग, भूधारणा पद्धती. शेताचे स्थानिक नाव, लागवडीयोग्य क्षेत्र, लागवडीस योग्य नसलेले क्षेत्र, पोटखराब क्षेत्र, त्यामधील वर्ग (अ) आणि वर्ग (ब) चे क्षेत्र स्वतंत्र दाखवून शेवटी त्याची बेरीज केलेली असते. या जमिनीवरील आकारणी; तसेच जुडी विशेष आकारणी त्या भागात दाखविलेले असते. थोडक्यात, जमिनीची परिपूर्ण माहिती येथे दाखविलेली असते.
गावाची मूळ जमाबंदी करण्यात येते तेव्हा गावच्या मोजलेल्या, बिनमोजलेल्या जमिनीच्या माहितीचे एकत्रीकरण सूड पत्रकात म्हणजे शेतवार पत्रकात केलेले असते. मोजणी खाते जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत गावच्या तलाठ्याकडे हे पत्रक पाठविते. गावच्या प्रत्येक जमिनीची मूलभूत माहिती या पत्रकात दर्शविलेली असते.
जमिनीचा भूमापन क्रमांक असल्यास हिस्सा क्रमांक, भूधारणा पद्धती, जमिनीची वर्गवारी, लागवडीस अयोग्य जमीन पोटखराब,लागवडीयोग्य क्षेत्र, आकार आणि जमिनीत असलेले सुविधाधिकार या पत्रकार दाखविलेले असतात. या सूड पत्रावरून तलाठी गाव नमुना एक म्हणजे शेतवार पत्रक तयार करतात. यानंतर सूड पत्रक मोजणी खात्याकडे पुन्हा परत पाठविले जाते. गाव नमुना नं.१ मधील स्तंभ १ ते ७ मधील माहितीचा वापर करून तलाठी गाव नमुना ७ मध्ये जमिनीची माहिती भरत असतो. हे सात स्तंभ खालीलप्रमाणे आहेत.
स्तंभ १: भूमापन क्रमांक
स्तंभ २: धारणा प्रकार
स्तंभ ३: एकूण क्षेत्र
स्तंभ ४ व ५: लागवड अयोग्य बिनआकारी किंवा लागवडीसाठी अनुपलब्ध प्रकार व क्षेत्र.
स्तंभ ६: निव्वळ लागवडयोग्य क्षेत्र
स्तंभ ७: कृषिक आकारणी
वरीलपैकी स्तंभ १ ते ३ आणि ६ ते ७ स्तंभ स्वयंस्पष्ट आहेत. स्तंभ ४ व ५ मध्ये लागवडीस अयोग्य बिनआकारी किंवा लागवडीसाठी अनुपलब्ध असलेला जमिनीचा प्रकार दर्शविलेला असतो. या प्रकारात एक पोटखराब आणि दोन लागवडीस अयोग्य बिनआकारी जमीन असे दोन प्रकार प्रामुख्याने असतात. त्यांपैकी कोणत्याही भूमापन क्रमांकात पोटखराब असेल, तर तो गाव नमुना सातमध्ये दाखविला जातो, तर बिनभोगवट्याच्या बिनआकारी या प्रकारात मोडणाऱ्या जमिनी गाव नमुना सातमध्ये पोटखराबसारख्या स्वतंत्र दाखविण्यात येत नाहीत.
पोटखराब वर्ग अ आणि वर्ग ब
भूधारणा पद्धतीची माहिती स्वतंत्रपणे सविस्तर दिलेली आहे. लागवडीसाठी पूर्णतः अयोग्य असलेल्या जमिनीची म्हणजे खडकाळ क्षेत्र, नाले, खंदक व खाणी असलेल्या क्षेत्राची पोटखराब वर्ग ‘अ’मध्ये नोंद करण्यात येते; परंतु अशी नोंद करण्यापूर्वी भूमापन अभिलेखावरून त्याची पडताळणी करून घ्यायची आहे; पण विशिष्ट प्रयोजनासाठी राखून ठेवलेल्या जमिनी लागवडीस उपलब्ध होत नाहीत तेव्हा अशा जमिनीच्या क्षेत्राचा समावेश पोटखराब वर्ग ‘ब’मध्ये होतो. सार्वजनिक रस्ते, जलप्रवाह, कालवे, तलाव इत्यादी खाली या जमिनी असतात.
भूमापन लेखामध्ये आढळणाऱ्या क्षेत्रानुसार त्याचे क्षेत्र लिहायचे आहे. याप्रमाणे पोटखराब वर्ग ‘अ’ व पोटखराब वर्ग ‘ब’ अशा जमिनीच्या क्षेत्राच्या नोंदी स्वतंत्रपणे गाव नमुना सातमध्ये करावयाच्या आहेत. या नोंदी जिल्हा भूमापन कार्यालयातील संबंधित आकड्यांशी जुळत्या ठेवाव्या लागणार आहेत; पण जेव्हा जिल्हा भूमापन कार्यालयात अशी माहिती उपलब्ध नसेल, तेव्हा मात्र विद्यमान हक्क नोंदीमध्ये उपलब्ध असलेल्या एकूण पोटखराब क्षेत्राची नोंद करायची आहे.
लागवडीस योग्य असलेल्या जमिनीला आकारणी केलेली असते, तर पोटखराब वर्ग ‘अ’ तसेच पोटखराब वर्ग ‘ब’ क्षेत्राला कृषी आकारणी बसविलेली नसते. कारण हे क्षेत्र कृषियोग्य नसते. या क्षेत्रातून जमीन धारण करणाऱ्याला काही एक उत्पन्न मिळण्याचा संभव नसतो. गाव नमुना आठ-अ मध्ये देखील भोगवटादाराने धारण केलेली जमीन दर्शविताना त्यामध्ये आकारणी केलेले लागवडीयोग्य क्षेत्रच फक्त दाखविलेले असते.
एखादा भूमापन क्रमांक किंवा भूमापनाचा उपविभाग यामध्ये लागवडीयोग्य क्षेत्र नसेल आणि त्यातील सर्व क्षेत्र जर पोटखराब असेल तेव्हा त्या जमिनीला आकारणी दाखविलेली नसते; पण तेव्हा एखाद्या भूमापन क्रमांकातील किंवा भूमापन क्रमांकाच्या पोटविभागातील वर्ग ‘अ’ किंवा वर्ग ‘ब’मधील काही क्षेत्र किंवा सर्वच क्षेत्र अकृषी प्रयोजनासाठी (बिनशेती उपयोगाकरिता) वापरण्यात येईल, तेव्हा बिनशेतीसाठी वापरलेल्या क्षेत्रावर त्या भागात प्रचलित असलेल्या दराने आकारणी बसवून ती वसूल करण्यात येते. ही बसविलेली आकारणी हक्क पत्रकात दाखवली जाते; तसेच बिनशेती वापरातील पोटखराब क्षेत्र गाव नमुना आठ-अ मध्ये संबंधित खातेदाराच्या खात्यात दाखविलेले असते.
bvberule@gmail.com
(लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.