Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

Prime Minister Narendra Modi : इतिहासाचे जड झाले ओझे!

मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता होणे, भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. पंडित नेहरुंसारखे मोदींना लहान मुलांचे लाडके चाचा व्हायला आवडते. ते परीक्षांच्या आधी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा गुरुमंत्र देतात.

Team Agrowon

२०१४ मध्ये उदयास आलेली अमेरिकेतील ‘मॉर्निंग कन्सल्ट’ ही कंपनी व्यवसाय, विपणन, अर्थशास्त्र आणि राजकारणातील संस्था व व्यक्तींचे जागतिक सर्वेक्षण करते.

मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात या कंपनीने जगातील सर्वात लोकप्रिय नेता कोण, याबाबत सर्वेक्षण केले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मागे टाकत अव्वल स्थान गाठले.

नेत्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या मूल्यमापनावरून ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने लोकप्रियतेचा निष्कर्ष काढला आहे.

मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता होणे, भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. पंडित नेहरुंसारखे मोदींना लहान मुलांचे लाडके चाचा व्हायला आवडते. ते परीक्षांच्या आधी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा गुरुमंत्र देतात.

त्यातूनच मोदींचे `परीक्षा योद्धा’ (एक्जाम वॉरियर्स) हे पुस्तक जन्मास आले. मोदींचे ज्ञान आणि दृष्टी यांचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा म्हणून राज्य सरकारांना हे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या सूचना केल्या जातात.

सदैव उत्तम ज्ञान देण्यासाठी तत्पर असलेल्या मोदींना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) मात्र शिक्षणावरून घेरतात. त्यांची पदवी बनावट असल्याचा आरोप करतात, तेव्हा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.

शिक्षण किती यापेक्षा ती व्यक्ती आपल्या क्षमतेवर थेट लोकांच्या ह्रदयात स्थान निर्माण करतो हे महत्त्वाचे आहे. परंतु एकीकडे परीक्षांविषयी विचार करणाऱ्या मोदींच्याच काळात पाठ्यक्रमातील इतिहास मिटवण्याचा प्रयत्न होत असेल, तर या सगळ्याची संगती कशी लावायची, हा प्रश्न उभा राहातो.

भारत हिंदुराष्ट्र व्हावे म्हणून गेले काही वर्षे कट्टर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. २०१४ पासून नावे हटविण्याची धडक मोहीमच सुरू करण्यात झाली. दिल्लीतील औरंगजेब रोड, फिरोजशहा कोटला स्टेडियम, मुगल सराय जंक्शन, राष्ट्रपती भवन आणि दिल्ली विद्यापीठ परिसरातील ‘मुगल गार्डन’ यांची नावे बदलण्यात आली. हे इथेच थांबले नाही तर, `इतिहासा’शी खेळ विद्यार्थ्यांच्या पाठ्यक्रमापर्यंत घुसला आहे.

भगवा अजेंडा

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) विद्यार्थ्यांच्या डोक्यावर वर्षानुवर्षे असलेला अनावश्यक भार कमी करण्याची संधी घेतली. त्यासाठी तर्कशुद्धीकरण प्रक्रिया पार पाडली.

पण त्यातून काय तर्क निघाला? इतिहासाची मोडतोड करणे? अर्धवट इतिहास मांडणे? हिंदुराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करताना अडसर ठरू शकणारे इतिहासातील सत्य विद्यार्थ्यांत डोकावू न देण्याचा खटाटोप सूरु झाला आहे. गेल्या सहा वर्षात सहावी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात तीन वेळा बदल करण्यात आले.

पहिल्यांदा २०१७ मध्ये १८२ पुस्तकांमधून तेराशेपेक्षा अधिक बदल करण्यात आले. मुघल साम्राज्याचा उदय, दिल्ली दरबार, अकबरनामा, बादशाहनामा, मुघल शासक आणि त्यांचे साम्राज्य, हस्तलिखितांची रचना, आदर्श राज्य, १६ व्या आणि १७ व्या शतकातील मुघल न्यायालये, राजघराणे, मुघल अभिजात वर्ग, साम्राज्य आणि सीमा आदी धड्यांची पाने टराटरा फाडून टाकण्यात आली.

वस्तुतः मुघलांचा इतिहास गुलामीचा आहे. तसाच विजयाचाही आहे. तो बेदखल कसा करणार? जगातील सात आश्‍चर्यांमध्ये असलेल्या ताजमहालला कुठे लपवणार आहात? तो कोणी बांधला, याचे उत्तर कसे लपवणार आहात.

मुघलांच्या इतिहासाबरोबच जातीय भेदभावासंबंधित धडेही पाठ्यपुस्तकातून गायब झालेले आहेत. परंतु जातीय शोषणाचे बळी ठरलेले समुदाय यातना विसरू शकतील? एनसीईआरटी फक्त मुघल साम्राज्याच्या विरोधात ‘उठाव’ करीत नाही तर त्यांच्या डोळ्यांना महात्मा गांधीही खुपतात.

गांधी हे हिंदु-मुस्लिम एकतेच्या विचाराचे होते आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा होता, ही बाब पुस्तकात राहू नये, याची आता काळजी घेतली गेली आहे.संबंधित मजकुराचे संपादन करण्यात आले आहे.

आता केवळ `३० जानेवारीला आपल्या नियमित प्रार्थनेनंतर गांधीजींवर एका युवकाने गोळीबार केला. गोळीबारानंतर त्याने समर्पण केले. त्याचे नाव नथुराम गोडसे होते’, एवढेच काय ते ठेवण्यात आले आहे. यातूनच सरकारचा हेतू स्पष्ट होतो.

तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी गांधीहत्येच्या चार दिवसानंतरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली. पटेलांनी लिहिलेल्या पत्रात संघाच्या कार्यकर्त्यांना लुटमार, हिंसक कृती करणारे आणि द्वेषाचे राजकारण करणारे असे संबोधले होते.

हे सगळे संदर्भ विद्यार्थ्यांना वाचता येणार नाहीत. शिक्षण विभागाची ‘स्वच्छता मोहीम’ इथेच थांबत नाही, तर १२वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून थेट २००२ च्या गुजरात दंगलीचे संदर्भही काढले गेले.

या दंगली थांबविण्यात राज्य सरकार अयशस्वी झाल्याची मानवाधिकार आयोगाची टीका, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्म पाळण्याची मोदींना केलेली सूचना आदी टीकेचे संदर्भ काढून टाकण्यात आले आहेत.

लोकशाही आणि विविधता, लोकप्रिय संघर्ष आणि चळवळ, लोकशाहीची आव्हाने यासारखे धडेही अभ्यासक्रमातून काढून विद्यार्थी आणि त्यानिमित्ताने सरकारचाही ताण कमी करण्यात आला आहे.

आडातच नाही तर...

देशात गांधीविचारांवर अनेक संस्था काम करीत असतात. परंतु अशा अनेक संस्था भाजप आणि संघ कार्यकर्त्यांच्या हाती कशा गेल्यात ते कळलेही नाही. राजघाटवरील ‘गांधी स्मृती आणि दर्शन समिती’ केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाचा उपक्रम आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेले भाजपचे खासदार विजय गोयल हे समितीचे प्रमुख आहेत. खरे तर इथून गांधी विचाराचा प्रसार, प्रचार होणे अभिप्रेत आहे. परंतु आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? या समितीतर्फे ‘अंतिमजन’ हे नियतकालिक काढले जाते.

यात सावरकरांवरही अंक काढण्यात आला असून त्यात गांधीजींवर टीका झाली. असे अनेक प्रसंग होतात. परंतु संयमी गांधीवाद्यांच्या तोंडावर बोट आणि डोळ्यावर पट्टी असते. पाठ्यक्रमातही गांधीजींवरील प्रसंगांतील धड्यांना धडापासूनच वेगळे करण्याचे धाडस दाखविणाऱ्यांना जाब विचारण्याची एकाही गांधीवाद्याची हिंमत झाली नाही.

अभ्यासक्रमातून इतिहास वगळून गेल्या नऊ वर्षाच्या संशोधनातून पुढे आलेले ‘उडनखटोला म्हणजेच विमान’, ‘महाभारतातही होते इंटरनेट’, ‘नाल्यातील गॅसने चहा’, ‘गणपती शल्यचिकित्सेचेच उदाहरण’, ‘हनुमानाने सूर्याला गिळण्याचे विज्ञान’ इत्यादी विषय अभ्यासक्रमात आणले गेले तरी सगळेच आनंदाने स्वीकार करतील असे दिसते. परंतु मुलांच्या भविष्याचे काय होईल, याचा विचारही प्रत्येक सूज्ञ पालकांना करावा लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT