Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Sunburn Crop Condition : उष्णतेचा प्रकोप, भुईही तापली

Warming Update : तापमानवाढीमुळे राज्याच्या शेतीसमोर भविष्यात मोठे संकट कसे येऊ शकते, याचा भयावह ‘ट्रेलर’ सध्याचा उन्हाळा दाखवतो आहे. गावतळी, विहिरी, विंधन विहिरी कोरड्याठाक असताना उष्णतेच्या लाटा आदळत आहेत.

Team Agrowon

Pune News : तापमानवाढीमुळे राज्याच्या शेतीसमोर भविष्यात मोठे संकट कसे येऊ शकते, याचा भयावह ‘ट्रेलर’ सध्याचा उन्हाळा दाखवतो आहे. गावतळी, विहिरी, विंधन विहिरी कोरड्याठाक असताना उष्णतेच्या लाटा आदळत आहेत.

त्यातून राज्यातील हवेतील सरासरी कमाल तापमान ४३ ते ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आणि जमिनीचे तापमान सरासरी ३३ ते ५३.८ अंश सेल्सिअस झाले आहे. त्यामुळे राज्याची भाजीपाला व फळशेती होरपळून निघाली आहे. मात्र होरपळणारी पिके सध्याच्या निवडणूक धुराळ्यात राज्यकर्त्यांना दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील पुण्यासारख्या जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा असूनही तापमानवाढीच्या समस्या ढळकपणे दिसत आहेत. हवेली, दौंड, खेड, जुन्नर, आंबेगावसारख्या फळभाजी व पालेभाज्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यांना उष्णतेचा फटका बसला आहे.

पारा ४३ अंशांच्या पुढे जात असल्यामुळे शेतीमालाच्या उत्पादनात घट येत आहे. दुसऱ्या बाजूला बाजारात आवक घटलेली असली, तरी शेतीमालाला अपेक्षित भाव नाहीत. पुरंदर, बारामती, इंदापूर, खेड, शिरूर परिसरांत बहुतेक गावांमध्ये सिंचनाचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे फळबागा जगवायच्या कशा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

वाढते तापमान, पाण्याची कमतरता, विजेचा लंपडाव या कारणामुळे सातारा जिल्ह्यातील आले शेती यंदाही संकटात आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारी आले लागवड यंदा होणार नाही. जिल्ह्यात साडेतीन हजार हेक्टरवर आले लागवड होते. यंदा लागवड जूननंतरच होईल व एकूण क्षेत्रात २५ टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

४० अंशांच्या पुढे सतत पारा असलेल्या खानदेशातील केळी बागांचे व्यवस्थापन कोलमडून पडले आहे. निसवलेल्या व काढणीवरील केळी बागांमध्ये झाडे मोडून पडणे व घड खाली पडण्याच्या समस्या वाढल्या आहेत.

खानदेशात कांदेबाग व मृग बहर मिळून अंदाजे ६२ हजार हेक्टरवर केळी लागवड झाली आहे. काही भागांत २० ते २५ दिवसांपासून तापमान ४१ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. त्यामुळे उपाय करूनदेखील यंदा उष्णतेमुळे केळी बागांचे ३० ते ३५ टक्के नुकसान झाल आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे संत्रा बागांची मोठी हानी होते आहे. अमरावती, नागपूरसह विदर्भातील विविध संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरावती जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर संत्रा बागा आहेत.

या बागांमध्ये शेंडामर, फळगळ अशा समस्या वाढत आहेत. तापमान वाढीमुळे फळ गळती वाढू शकते. त्यामुळे बागेतील बाष्पीभवन नियंत्रणावर भर द्या, असे आवाहन शास्त्रज्ञांनी केले आहे.

प्रखर उष्णतेमुळे परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेती कोरडी पडत आहेत. पिकांना लागणारा ओलावा नष्ट होत असून, केळी बागा होरपळून निघत आहेत. तुरळक ठिकाणी पाणी आहे; पण वीजटंचाईमुळे कृषिपंप चालवता येत नाहीत. त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे.

आंबा, कलिंगड, केळीला फटका

उष्णतेची लाट अहमदनगर जिल्ह्यातील आंबा, कलिंगड, डाळिंब, केळी बागांच्या मुळावर उठली आहे. कोपरगाव, राहाता, राहुरी भागांतील टोमॅटो, कोबी, वांगी, फ्लावर, गवार, काकडी, कारले, भोपळा अशी नगदी भाजीपाला शेती संकटात सापडली आहे. नवीन रोपांची लागवड केली तरी उष्णतेमुळे रोपे जळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

आच्छादनाद्वारे पिके वाचविण्यासाठी धावपळ

फळबागांसाठी पॉलिथिनचे तसेच काडीकचरा, गव्हाचे कांड असे सेंद्रिय आच्छादन, शेडनेट याद्वारे बागा वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. टॅंकरद्वारे पाणी आणून, इतरांच्या शेतातील पाणी विकत घेऊन पिके जगविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा आहे.

प्रमुख जिल्ह्यांतील उष्णतेचा प्रकोप (तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

जिल्हा कमाल जमिनीचे तापमान

छत्रपती संभाजीनगर ४०.८ ३७.८

अकोला ४३.७ ४९.८

सोलापूर ४२.२ ४४.८

जळगाव ४२.० ५३.१८

रत्नागिरी ३२.८ २८.५

सांगली ३९.२ ३१.३५

कोल्हापूर ३७.६ ४३.०

पुणे ३९.३ ४१.१

जागतिक कमाल तापमानात दीड अंशाने वाढ

यंदाच्या वर्षी राज्यात सगळीकडे तापमानात वाढ दिसून आली आहे. या बाबत माहिती देताना ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले, की यंदाच्या वर्षी भारताबरोबरीने जगभरातील सरासरी कमाल तापमानामध्ये १.५ अंश सेल्सिअसची वाढ दिसून आली आहे.

त्याचबरोबरीने जमिनीच्या कमाल तापमानातही वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणकानुसार उन्हाळ्याच्या दिवसांत हवेतील तापमानापेक्षा जमिनीचे तापमान हे पाच अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते.

जेव्हा जमिनीचे तापमान वाढते तेव्हा सेंद्रिय कर्ब कमी होत जातो. त्यामुळे उपयुक्त जिवाणूंची संख्या झपाट्याने कमी होते. वनस्पतींना अन्नद्रव्ये, पाणी कमी प्रमाणात उपलब्ध झाल्याने वाढ आणि उत्पादनावर परिणाम दिसतो. माझ्याकडे राज्यातील १५ हवामान केंद्रांतून किमान आणि कमाल तापमानाची माहिती जमा होत असते.

त्यानुसार गेल्या वर्षी राज्यातील सरासरी कमाल तापमान हे ४२ ते ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. यंदाच्या वर्षी हे सरासरी तापमान ४३ ते ४६ अंश सेल्सिअस आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यातील तापमानात वाढ दिसून आली आहे.

तापमान वाढीचा फटका

उन्हाच्या कडाक्यात सुकू लागल्या फळबागा.

केळी, संत्रा, डाळिंब, आंबा, कलिंगडाचे नुकसान.

टॅंकरचे पाणी, आच्छादन, उष्णतारोधक उपायांसाठी धावपळ.

रोपवाटिकांनाही उष्णतेची झळ; रोपांची मरतुक वाढली.

फुलगळ, फळगळ, रोगांचे प्रमाण वाढले.

उष्णतेच्या लाटेत वीजटंचाईमुळे शेतकरी मेटाकुटीला.

वारा अवरोधक, ओलावापूरक तंत्र, आच्छादन वाढवावे.

वनस्पतींमध्ये विविध चयापचयाच्या क्रिया तसेच प्रकाश संश्‍लेषण, श्‍वसनाची क्रिया सातत्याने सुरू असते. या क्रिया वनस्पतीमधील विकिरे नियंत्रित करत असतात. परंतु ज्या वेळी तापमानात मोठी वाढ होते, त्या वेळी वनस्पतीमधील विकरांचे विघटन होऊन प्रकाश संश्‍लेषण, अन्ननिर्मिती प्रक्रिया मंदावते. हवेतील तापमान ५० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले, की विपरीत परिणाम दिसण्यास सुरुवात होते. गेल्या काही वर्षांत जमिनीतून पाण्याचा उपसा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. पाणीपातळी खोलवर गेली आहे. जमिनीच्या वरच्या थरातील ओलावा अत्यंत कमी झाला आहे. यामुळे मुळांच्या वाढीवर परिणाम झाल्याने पाणी आणि अन्नद्रव्य शोषण कमी झाल्याने वनस्पतींची वाढ खुंटते. जमिनीचे तापमान ५० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले की त्याचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर दिसू लागतो.
डॉ. मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ
माझी आठ हजार केळीची लागवड आहे. उष्णतेची लाट आहे. महावितरणच्या दुर्लक्षामुळे वीजपुरवठाही नाही. जमिनीतील ओलावा नष्ट झाला आहे.
पंकज अडकिणे, शेतकरी, मु. पो. डोंगरकडा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

Adam Master Retirement : माजी आमदार आडम मास्तरांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

Garlic Import : अफगाणिस्तानातून लसणाची आयात

SCROLL FOR NEXT