ॲग्रो विशेष

Vegetable Farming : कुटुंबाने बनविला भाजीपाला शेतीत ‘ब्रॅण्ड’

Vegetable Production : कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर (ता.शिरोळ) येथील रजपूत कुटुंबाने एकी जपण्याबरोबर अनेक वर्षांपासून ऊस आणि विविध भाजीपाला पिके या पद्धतीत सातत्य ठेवले. त्यामध्ये कौशल्य हस्तगत केले.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

राजकुमार चौगुले

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर (ता.शिरोळ) येथील रजपूत कुटुंबाने एकी जपण्याबरोबर अनेक वर्षांपासून ऊस आणि विविध भाजीपाला पिके या पद्धतीत सातत्य ठेवले. त्यामध्ये कौशल्य हस्तगत केले. त्यांच्या शेतमालाचा दर्जेदार ब्रॅण्ड बाजारपेठेत तयार झाला आहे. याच शेतीतून कुटुंबाने शेतीसह उल्लेखनीय कौटुंबिक प्रगती साध्य केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. येथील भाजीपाला
उत्पादकांनी सातत्यपूर्ण गुणवत्ताप्राप्त उत्पादनातून आपली वेगळी ओळख तयार केली आहे.
तालुक्यातील जयसिंगपूर येथील संजय रजपूत यांच्या कुटुंबीयांची सहा एकर शेती आहे. याशिवाय अन्य शेतकऱ्यांकडील तीन एकर शेती त्यांनी कसण्यास घेतली आहे. या कुटुंबाला तीसहून अधिक काळापासून भाजीपाला शेतीचा मोठा अनुभव आहे. पीक फेरपालट व घरच्या सदस्यांचे अखंड परिश्रम या बाबींच्या जोरावर कुटुंब शेतीत भक्कमपणे पाय रोवून उभे आहे. संजय यांचे वडील तुकाराम यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीचे कामकाज होते. सध्या चार एकरांत ऊस, दीड एकरांत फ्‍लॉवर तर एक एकरांत टोमॅटो लागवड आहे.

अशी आहे पीकपद्धती

सहा एकर शेतीचे दोन भाग केले आहेत. पैकी तीन एकरांत ऊस असतो. खोडवा न राखता फक्त लागवडीचा ऊस घेतला जातो. फेब्रुवारी, मार्चच्या दरम्यान ऊस तुटून गेला की पूर्ण नांगरट करून एक ते तीन एकरांपर्यंत क्षेत्र भाजीपाला पिकांसाठी तयार केले जाते. यामध्ये टोमॅटो, फ्‍लॉवर, काकडी आदी
पिके नियमित घेतली जातात. त्यामध्ये पॉली मल्चिंग व ठिबक सिंचन यांचा वापर केला जातो. त्यामुळे पाण्याची बचत होतेच पण रसशोषक किडींवर नियंत्रण मिळवता येते. साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोंबर पर्यंत भाजीपाला पिकांचा प्लॉट संपतो. त्यानंतर या शेतात ऊस लागवड केली जाते. त्यात आंतरपीक म्हणून फ्लॉवर घेतला जाते.

व्यवस्थापनातील बाबी

भाजीपाला पिके म्हटले की किडी-रोग आलेच पण रजपूत कुटुंब कीडनाशकांचा कमीतकमी वापर करते. बहुतांशी खते ठिबक सिंचनाद्वारेच दिली जातात. कूपनलिकांच्या पाण्याचा वापर जपून केला जातो. भाजीपाला पिकांचा अनेक वर्षांपासूनचा अनुभव तयार झाल्याने विविध वाणांचा चांगला अभ्यास झाला आहे. बाजारपेठेची मागणी ओळखून सातत्याने वाण बदल करण्याचा प्रयत्न असतो. वाणाची निवड करताना पिकाचा कालावधी, रोगप्रतिकारक क्षमता, एकरी उत्पादकता या बाबींना प्राधान्य दिले जाते. कृषी सेवा केंद्र व तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनातून भाजीपाला पिके यशस्वी करण्याचा प्रयत्न असतो.

काळी व तांबडी अशा दोन पद्धतीची जमीन आहे. भाजीपाला व ऊस या दोन्ही प्रकारच्या
पिकांमध्ये अन्नद्रव्यांचा संतुलित वापर व्हावा यासाठी एक ते दोन वर्षांतून माती परीक्षण केले जाते. प्रत्येक वर्षी जमिनीला शेणखत वा गांडूळखत, सेंद्रिय स्लरी,आळवणी यांचा वापर केला जातो. उसाचे एकरी ७० टनांपर्यंत उत्पादन मिळते. सहा एकरांमध्ये उसासहित भाजीपाला पिकांमधून वर्षाला दहा लाखांपुढे उत्पन्न मिळते. गेल्या वर्षी बेवड म्हणून केळी बाग घेतली आहे.



तयार केला भाजीपाल्याचा ब्रॅण्ड

दर्जा, पॅकिंग याबाबत काटेकोरपणा ठेवल्याने बाजारपेठेत रजपूत यांच्या शेतमालाला नेहमीच चांगला दर मिळतो. मालाच्या प्रत्येक गोणीवर ‘टीजीआर’ असे लेबल केलेले असते. या नावाने संबंधित व्यापाऱ्यांकडे भाजीपाला पोचला की तो तपासून पाहण्याची गरज भासत नाही. किलोला आवर्जून एक ते दोन रुपये जादा दर व्यापाऱ्यांकडून जादाच दिला जातो. मुंबईसह अहमदाबादपर्यंत असा प्रकारे रजपूत यांनी आपल्या नावाचा ब्रॅण्ड तयार केला आहे.


शेतीत साधली प्रगती

अलीकडील काळात कमी दरांमुळे भाजीपाल्याचे क्षेत्र कमी होत आहे. रजपूत कुटुंबीयांनाही कमी दरांचा फटका अनेकवेळा बसला. अनेकदा पीक काढून टाकण्याची वेळ आली. मात्र भाजीपाला पिकांपासून त्यांनी कधीच फारकत घेतली नाही. कोणत्याही गोष्टीत सातत्य हीच बाब महत्त्वाची मानली.
एकेकाळी संजय यांची आजी भाजीपाला उत्पादन घ्यायची. स्वतः डोक्यावरून वाहून नेऊन त्याची विक्री करायची. कुटुंबातील तुकाराम व रतनसिंग या दोन भावांनी शेतीवरील निष्ठा कायम ठेवत आर्थिक प्रगती साधली.

वीस वर्षात एक एकरांपासून सहा एकरांपर्यंत क्षेत्राचा विस्तार केला. दोन टुमदार घरे उभी राहिली. चारचाकी गाडी घेतली. रतनसिंग आज हयात नाहीत. पण संजय यांच्यासहित वडील तुकाराम, आई गंगूबाई, पत्नी श्रुती, काकू कुसुम, चुलत भाऊ राजाराम व त्यांची पत्नी सविता हे कुटुंबातील सर्व सदस्य शेतीत स्वतः राबतात. मशागतीपासून ते फवारणी, खत, पाणी व्यवस्थापन, काढणी या सर्व कामांत कुटुंबातील सदस्य तरबेज झाले आहेत. त्यातून मजुरांवरील अवलंबित्व कमी केले आहे. त्यावरील खर्चात मोठी केली आहे.

संजय रजपूत- ९८९०८५६११६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT