Vegetable Farming : अल्पभूधारकाची बारमाही पैसा देणारी ऊस- भाजीपाला पद्धती

Sugarcane Farming : कोपर्डे हवेली (जि. सातारा) येथील भरत चव्हाण अल्पभूधारक शेतकरी आहेत. मात्र कमी क्षेत्रात ऊस आणि जोडीला बारमाही विविध भाजीपाला पिके असे शेतीचे पद्धतशीर नियोजन त्यांनी तयार केले आहे.
Vegetable Farming
Vegetable FarmingAgrowon
Published on
Updated on

विकास जाधव

Sugarcane Farming in Maharashtra : कोपर्डे हवेली (जि. सातारा) येथील भरत चव्हाण अल्पभूधारक शेतकरी आहेत. मात्र कमी क्षेत्रात ऊस आणि जोडीला बारमाही विविध भाजीपाला पिके असे शेतीचे पद्धतशीर नियोजन त्यांनी तयार केले आहे. या पद्धतीतून महिन्याला शाश्‍वत स्वरूपाचे उत्पन्न मिळणे व कुटुंबाचे आर्थिक नियोजन करणे त्यांना शक्य झाले आहे.

सातारा जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांना कृष्णाकाठ लाभला आहे. यामुळे ही गावे बागायती शेतीतून विकसित झाली आहेत. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या लगत असलेले कोपर्डे हवेली हे गाव त्यापैकीच एक आहे. इंद्रायणी भात, ऊस व टोमॅटो यांचे उत्तम उत्पादन घेणारे गाव म्हणून ते प्रसिद्ध आहे.

गावातील भरत विठ्ठल चव्हाण अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांची चार एकर शेती असून, पैकी दोन एकर खारवट तर दोन एकर पिकाऊ आहे. भावाभावांमध्ये वाटणी झालेल्या शेतीचे एकीकरण केले आहे. खारवट जमिनीत भात घेण्यात येतो. उर्वरित दोन एकर क्षेत्र भाजीपाला व ऊस पिकासाठी निश्‍चित केले आहे.

...अशी आहे भाजीपाला शेती

चव्हाण यांना भाजीपाला शेतीचा सुमारे ३० हून अधिक वर्षांचा अनुभव तयार झाला आहे.
ऊस अधिक भाजीपाला या पद्धतीतून वर्षभर कोणती ना कोणती पिके शेतात राहतात. त्यामुळे
भांडवल खेळते ठेवणे व कुटुंबाचे आर्थिक नियोजन करणे शक्य झाले आहे. चव्हाण यांच्या पीक पद्धतीबाबत सांगायचे साधारण फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान ऊस तुटला जातो

त्यानंतर क्षेत्राची मशागत केली जाते. पंधरा दिवस विश्रांती देऊन त्या क्षेत्रात साडेचार फुटी सरी सोडली जाते. त्यावर मल्चिंग पेपर अंथरून झिगझॅग पद्धतीने दोन रोपांत एक ते सव्वा फूट अंतर ठेवून टोमॅटोची लागवड केली जाते. साधारण या काळात पाणीटंचाई असल्याने अन्यत्र भाजीपाल्याची लागवड कमी असते.

चव्हाण यांच्याकडे बागायती पाणी आहे. त्यामुळे या काळात लागवड केलेल्या टोमॅटोला पुढे मिळणारा दर लक्षात घेऊन ते हा हंगाम निवडतात. साधारणपणे ४० ते ४५ दिवसांनी टोमॅटो सुरू होतो. या काळात लग्नसराई तसेच हॉटेल व्यवसायाकडून मागणी असते. त्यामुळे चांगला दर मिळण्याची शक्यता असते.

Vegetable Farming
Vegetable Production : बारमाही भाजीपाला उत्पादनातून उंचावले अर्थकारण

साधारण जून-जुलैच्या सुमारास टोमॅटोचा प्लॉट संपतो. त्यानंतर त्या क्षेत्रात काकडी घेतली जाते. सुमारे ४० दिवसांनी उत्पादन सुरू होते व पुढे ४० दिवसांपर्यंत ते राहते. बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन काकडीला दोडका, दुधी भोपळा आदी वेलवर्गीय पिकांचे पर्यायही निवडले जातात.

वेलवर्गीय पिकांच्या प्लॉटमध्ये फ्लॅावरची लागवडही केली जाते. यामुळे कमी क्षेत्रात एकाहून अधिक पिकांचे उत्पादन व उत्पन्न मिळण्याची संधी तयार होते. काहीवेळा एक एकर तर काही वेळा दहा गुंठे असेही क्षेत्र निवडले जाते. काकडीसारखे पीक संपल्यानंतर पुन्हा उसाचे नियोजन केले जाते.

Vegetable Farming
Vegetable farming: वेलवर्गीय भाजीपाला पिके ठरली किफायतशीर

भाजीपाला उत्पादन

गावात टोमॅटोचे क्षेत्र मोठे आहे. साहजिकच चार ते पाच गाड्या गावातून भाजीपाला वाहतूक करीत असतात. चव्हाण यांनीही या पिकात सातत्य टिकवले आहे. दरवर्षी एक एकरांत तरी त्याची लागवड असतेच. सुमारे अडीच ते तीन लाख भांडवली खर्च येतो. एकरी २०, २५ ते कमाल ४० टनांपर्यंत

उत्पादन त्यांनी घेतले आहे. वर्षभराचा विचार केल्यास किलोला २० रुपये दर मिळतो. यंदा टोमॅटोला चढते दर होते. हंगामाच्या अखेरीस चव्हाण यांना किलोला शंभर रुपये दर मिळाल्याने उत्पन्न चांगले मिळाले. काकडीचे सुमारे २५ टन उत्पादन मिळते. काही गुंठे क्षेत्रातून दुधी भोपळा, दोडका, फ्लॉवर आदींचे चार ते पाच टनांपर्यंत उत्पादन मिळते.

काकडीस किलोला दहा ते पंधरा रुपये किलो, दुधी व फ्लॅावर १५ ते २० रुपये व दोडक्यास ३० ते ४० रुपये दर मिळतो. चव्हाण यांच्यासाठी मुंबई व पुणे या दोन बाजारपेठा आहेत. मात्र कऱ्हाड बाजारपेठेतही नियमित जात असल्याने व्यापाऱ्यांकडून चांगला दर मिळवता येत असल्याचे चव्हाण सांगतात.

शेती व्यवस्थापनातील ठळक बाबी

भांडवली खर्चात बचत करण्यावर विशेष भर दिला आहे. थोड्या थोड्या क्षेत्रावर वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला असल्याने शेतीतील व विशेषतः दरांची जोखीम कमी करता आली आहे. वेलवर्गीय पिकांची लागवड २० वर्षांपेक्षाही जास्त काळापासून असल्याने त्यासाठी लागणाऱ्या बांबूची लागवड बांधावर केली आहे. त्यामुळे खर्चात मोठी बचत होण्याबरोबर आवश्यक काठ्याही उपलब्ध होतात.

वेलवर्गीय पिके तोडणीस सोपी होत असल्याने मजूर कमी लागतात. मल्चिंगचा वापर सलग दोन पिकांना होत असल्याने तणनियंत्रण होण्यास मदत होते. उसाचे उत्पादन एकरी ४० ते ६० टनांच्या दरम्यान मिळते. पत्नी शोभा यांची मदत चव्हाण यांना होतेच.

पण नोकरीस असलेला मुलगा सुधीरदेखील उपलब्ध वेळेनुसार व सुट्टीच्या काळात शेतीत हातभार लावतो. बांधावर आंबा, नारळ, सीताफळ, रामफळ, केळी आदींचीही लागवड केली आहे. किडींना बांधावरच रोखण्यासाठी शेताच्या भोवती नेटचे कुंपण केले आहे.

भरत चव्हाण, ९८८१६५५३०६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com