Agriculture Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Agriculture Exhibition 2024 : दुसऱ्या दिवशीही प्रदर्शनाला अलोट गर्दी

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : सौरचलित उपकरणे, ड्रोन, मशागतीची अवजारे, बी-बियाणे, खतांपासून ते शेतीतील विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शुक्रवारी (ता. १२) दुसऱ्या दिवशी ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

ज्येष्ठ शेतकरी, तरुण आणि शेतीतील तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही कृषी प्रदर्शनासाठी अलोट गर्दी केली. विशेष म्हणजे त्यात महिलांचा सहभाग मोठा राहिला.

जालना रोडवरील श्रीराम मंदिर ट्रस्ट मैदानावर सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन सुरू आहे. येत्या रविवारपर्यंत (ता. १४) हे प्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक जी.के.एनर्जी सोलरपंप हे आहेत.

इकोजेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स बी.जी. चितळे डेअरी (भिलवडी, सांगली), इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को), तसेच कृषी विभाग महाराष्ट्र राज्य व आत्मा विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन साकारले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून प्रदर्शनातील विविध स्टॉल्स गर्दीने फुलले आहेत. तरुण शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उत्सुकतेने समजून घेत आहेत. प्रामुख्याने मराठवाड्यासह नगर, जळगाव, पुणे, कोल्हापूर, नाशिक यांसह राज्याच्या सर्व भागांतून प्रदर्शनाला अभ्यासू शेतकऱ्यांनी हजेरी लावली.

प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर आपल्याला आवश्यक ती माहिती जाणून घेत ज्ञानाची शिदोरी गाठीशी बांधत शेतकरी एकमेकांशी संवाद साधत असल्याचे चित्र दिवसभर दिसत होते.

सौरचलित संरक्षित कुंपण, ड्रोन तंत्रज्ञानासह बियाण्यांसोबतच सेंद्रिय निविष्ठा, पॅालिमल्चिंग, मिनी दाळमिल, क्षारयुक्‍त पाण्यासाठी उपयुक्‍त वॉटर कंडिशनर अशा नावीन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण स्टॉलवर गर्दी दिसत होती. कुपटा (ता. सिल्लोड) येथील माणिकराव काळे पत्नी सौ. कलाबाई काळे यांच्यासह प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते,

मला ठिबक सिंचनासह सौरचलित उपकरणाची माहिती मिळाली. त्यातील नवीन तंत्रज्ञान पाहता आले, अशी प्रतिक्रिया दिली. प्रदर्शनातील कृषी विभागाच्या स्वतंत्र दालनात ग्रामीण भागातील महिला शेतकरी तसेच बचत गटांची उत्पादनांनी लक्ष वेधले.

अनेक शेतकरी कंपन्यांनीही दुधाचे उपपदार्थांसह विविध उत्पादने इथे विक्रीस ठेवली होती, त्याच्या खरेदीसाठीही झुंबड पाहायला मिळाली. मजुरांची समस्या शेतीक्षेत्रात गंभीर आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणाच्या स्टॉल्सवरही शेतकऱ्यांची सर्वाधिक गर्दी होती.

सहभागी कंपन्यांकडून खास ऑफर

प्रदर्शनाच्या निमित्ताने सहभागी अनेक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनावर खास सवलती जाहीर केल्या आहेत. एका उत्पादकाने तर रोटाव्हेटरवर ट्रॅक्‍टर फ्री देणार असल्याचे जाहीर केले आहे. इतरही अनेक उत्पादकांनी या ठिकाणी साहित्याची नोंदणी केल्यास घसघशीत सवलती जाहीर केल्या आहेत. त्याला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या काही रुपयांत शेतकऱ्यांना नोंदणीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दुष्काळी भागाला उपयुक्त, रेशीम शेती स्टॉलवर रेलचेल

दुष्काळी भागासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेशीम शेतीच्या दालनाकडेही शेतकरी आवर्जून वळत होते. रेशीम विभागाच्या अनुदानाच्या योजना आणि अन्य तांत्रिक माहिती जाणून घेण्यावर शेतकरी उत्सुक दिसत होते.

प्रामुख्याने सिल्क समग्र योजनेविषयी या ठिकाणी शेतकऱ्यांनी अधिक माहिती जाणून घेतली, याच दालनाबरोबर दुष्काळावर मात करणाऱ्या गावांच्या आणि शेतकऱ्यांच्या अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या यशकथांवर आधारित ‘लढा दुष्काळा’शी या दालनावरही शेतकरी आवर्जून माहिती घेत होते.

‘लढा दुष्काळा’शी चर्चासत्राला प्रतिसाद

राज्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात ‘लढा दुष्काळाशी’ या थीमवर आधारित दालन उभारण्यात आले आहे. त्या दालनावर शेतकरी थांबून माहिती घेत आहेत.

माहितीपूर्ण आणि उपाय सुचविणाऱ्या या दालनाचेही शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहेच. पण शुक्रवारी (ता. १२) याच अनुषंगाने दुष्काळातील समस्येतील उपाय आणि पीकपद्धती यावर ‘लढा दुष्काळाशी’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT