Maharashtra News : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महायुती सत्तेत आली असून महाविकास आघाडी विरोधात बसली आहे. तर ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅटच्या मोजणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. विशेष अधिवेशनात देखील हा विषय गाजला असून विरोधकांनी मारकडवाडीच्या ग्रामस्थांच्या बॅलेट पेपरवरील मतदानाचा मुद्दा उचलून धरला होता.
पण आता या वादावर निवडणूक आयोगानेच स्पष्टीकरण दिले आहे. आयोगाने ईव्हीएम मशीमध्ये आणि व्हीव्हीपॅट मशिनमधील मोजणीत कुठेही तफावत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर अक्षेप घेत बॅलेट पेपरची मागणी केली होती. तर नवनियुक्त आमदार उत्तमराव जानकर यांनी देखील पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर होणार असेल तर आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे जाहीर केले होते.
यानंतर आज भाजपने येथे उत्तर सभा घेत शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. माजी आमदार राम सातपुते, आमदार गोपिचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मविआवर टीका केली. तर मारकडवाडी गावातील ग्रामस्थांचा ईव्हीएमवर अक्षेप नसून त्यांचा बळी घेतला जात असल्याचा दावा केला.
दरम्यान आता ईव्हीएमच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाने एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकात आयोगाने मतमोजणी प्रक्रियेतील व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीत कोणतीच तफावत नसल्याचे म्हटले आहे.
आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीवेळी भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघ/विधानसभा विभागातून ५ मतदान केंद्रांची निवड करण्यात आली होती. आयोगाने निवडलेल्या या ५ मतदान केंद्रांच्या व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी करणे अनिवार्य होते. त्यानुसार, मोजणी करण्यात आली होती. ज्यात तफावत आढळलेली नाही.
२३ नोव्हेंबर रोजीच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील निवडलेल्या ५ मतदान केंद्रांची व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी २३/११/२०२४ रोजी करण्यात आली. जी मतमोजणी निरीक्षक/उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात आली. त्यानुसार, महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील १४४० व्हीव्हीपॅट युनिट्सची स्लिप गणना करण्यात आली.
यानंतर सर्व डेटा संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजेच डिईओस् कडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार व्हीव्हीपॅट युनिट्समधील स्लिपचा काउंट आणि ईव्हीएममधील मतदानाची आकडेवारी समसमान आली आहे. यामध्ये कोणतेही तफावत नाही. तर आयोगाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व प्रक्रियेचे २८८ मतदारसंघात योग्य पालन करण्यात आल्याचेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.