Sharad Pawar : ईव्हीएम बंद होईपर्यंत लढा देणार

EVM Ban : ईव्हीएमबाबत तक्रार घेऊन आम्ही केंद्र, राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडे जाणार आहोतच, पण प्रसंगी न्यायालयातही जाऊ, पण लोकांच्या शंकांचे निरसन करणे, हे निवडणूक आयोगाचे काम आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Solapur News : ईव्हीएमबाबत तक्रार घेऊन आम्ही केंद्र, राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडे जाणार आहोतच, पण प्रसंगी न्यायालयातही जाऊ, पण लोकांच्या शंकांचे निरसन करणे, हे निवडणूक आयोगाचे काम आहे.

त्यांनी गावात येऊन मारकडवाडी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्यावे, आम्ही आता हा लढा देशभर नेताना, ईव्हीएम जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी (ता. ८) मारकडवाडीत (ता. माळशिरस) आयोजित आक्रोश सभेत सांगितले.

विधानसभा निवडणुकीत मारकडवाडीतील मतदारांना ईव्हीएम मशिनविषयी शंका होती. त्यांचे निरसन करण्यासाठी ग्रामस्थांनी गाव पातळीवर बॅलेट पेपरवर मतदान करण्याचे निश्‍चित केले, परंतु मतदानाचा हा प्रयोग कायदेशीररीत्या योग्य नसल्याने पोलिस प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू करून ही मतदान प्रक्रिया रोखली. तसेच या सर्व प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या नूतन आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह ८९ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

या सर्व पार्श्‍वभूमीवर मारकडवाडीची सध्या देशभर चर्चा आहे, याच गावातील ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी श्री. पवार आज सकाळी मारकडवाडी येथे दाखल झाले. त्या वेळी आयोजित आक्रोश सभेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार रामहरी रुपनवर, विजयराव मोरे, रिपब्लिकन पक्षाचे सचिन खरात, रमेश बारसकर, मनोहर डोंगरे आदी या वेळी मंचावर उपस्थित होते.

Sharad Pawar
Markadwadi Ballot Paper Re-Voting Case : ईव्हीएमविरोधात क्रांतीचा एल्गार! मारकडवाडीला शरद पवार व राहुल गांधी जाणार, लाँग मार्चची तयारी

श्री. पवार म्हणाले, ‘‘पूर्ण देशाला या गावाने जागे केले आहे. देशातील सर्व खासदार या गावाची चर्चा करतात. देशाच्या जे लक्षात आले नाही, ते या गावकऱ्यांच्या लक्षात आले. संपूर्ण देश आपले स्वागत, अभिनंदन करतोय म्हणून मी आपणास भेटायला आलो आहे. आज देशाला, राज्याला काही शंका निर्माण झाल्या आहेत.

मतदान प्रक्रियेविषयी खात्री वाटत नाही. त्यात दुरुस्ती केली पाहिजे. आज अमेरिका, चीन, युरोप खंडातील सर्व देश मतदानासाठी चिठ्ठ्या टाकतात. आपल्याला संविधानाने तर अधिकार दिला आहे. काहीतरी गडबड नक्की आहे. माहिती गोळा केली आहे, ही शंका घालवायची असेल तर निवडणूक पद्धती बदलणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘भारतात मारकडवाडीसारखे दुसरे गाव नाही. या गावाने क्रांती घडवली आहे. मशिनमध्ये गडबड आहे. जनतेच्या मनात प्रचंड शंका आहेत. पोस्टाने पडलेली मते आणि मशिनमध्ये यामध्ये खूप अंतर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला अधिकार आहे, तो प्रत्येकाने वापरणे गरजेचे आहे. शासन बॅलेट पेपरला का घाबरते? जनतेच्या मनात काय दडलेले आहे, हे समजले पाहिजे, असे ते म्हणाले.

आमदार उत्तमराव जानकर म्हणाले, ‘‘ईव्हीएम मशिनने लोकशाहीच्या थोबाडीत मारले आहे. आम्हाला शरद पवारांनी साथ दिली आहे. येथील बहादूर मतदार बंधूंचे आभारी आहे. येथील लढाऊ माती ही परिवर्तनाची क्रांती आहे. मी खरोखरीच राजीनामा देऊ शकतो, या गावातील १४०० लोकांनी प्रतिज्ञापत्र तयार करून द्यावे, ते निवडणूक आयोगाकडे मी देणार आहे. आमची शंका दूर करायला साधे सोपे बॅलेट पेपर आहे.

Sharad Pawar
Maharashtra Political News : सत्ताधारी आमदारांचा शपथविधी, विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार; ईव्हीएमच्या मुद्द्यावर सभात्याग

भाजपवाले प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळे बहाणे करतात. पुलवामा घटना, लाडकी बहीण असे करून लाडकी मशिनही करता येते. लाडक्या बहिणीमुळे दोन-चार हजार मतांचा फरक होऊ शकतो. एवढा फरक पडू शकत नाही, असेही ते म्हणाले.

या वेळी माजी आमदार चव्हाण, खासदार मोहिते पाटील यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक नानासाहेब मारकड यांनी केले, त्यांनी गावातील एकूण मतदानाविषयीची सविस्तर माहिती विशद केली.

जमावबंदी आदेश, पुन्हा ग्रामस्थांवर खटले?

मारकडवाडीतील मतदान प्रक्रिया सरकारी नव्हती. त्यामुळेच ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे ठरविले होते. पोलिसांनी कोणत्या कायद्याने बंदी केली? तुमच्या गावात जमावबंदी होते? वरून खटले भरले जातात. राज्यात निवडणूक आयोग काय करतो आहे, काळ सोकावतो आहे, हे लक्षात घ्या, भविष्यात सर्व निवडणुका ईव्हीएमवर नाही, तर जुन्या पद्धतीनेच बॅलेट पेपर घ्याव्यात, यासाठी आमचा आग्रह राहील, असेही श्री. शरद पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com