Solapur News : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने पंढरपूरसह नदीकाठच्या गावात निर्माण झालेला पूरस्थितीचा धोका बुधवारी (ता. ७) तूर्त टळला. सध्या पंढरपूरसह नदीकाठी परिस्थिती नियंत्रणात असून, या भागातील ग्रामस्थांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या चार दिवसांपासून उजनी धरणातून भीमा नदीत जवळपास सव्वा लाख क्युसेक आणि वीर धरणातून नीरा नदीत ३० हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता. परिणामी, या दोन्हींचे पाणी पंढरपुरात चंद्रभागा नदीत एक होत असल्याने पंढरपूरसह नदीकाठच्या १०५ गावांना पुराचा धोका निर्माण झाला होता.
संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने पंढरपुरातील नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टीतील जवळपास ८५ कुटुंबांतील २५० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते. पंढरपुराततील वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली होती. त्याशिवाय पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांनाही पुराचा धोका निर्माण झाला होता.
तालुक्यातील मुंढेवाडी, करोळे, पटवर्धन कुरोली, आवे, कौठाळी, गोपाळपूर येथील बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. पाण्याचा प्रवाह वाढतच होता. हे पाणी पंढरपूर शहरात शिरण्याची भीतीही होती. पण पुणे जिल्ह्याकडून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गात मोठी घट झाली.
त्यामुळे उजनीतून पुढे भीमा नदीत सोडण्यात येणारा सव्वा लाख क्युसेकचा विसर्ग बुधवारी (ता. ७) निम्म्याहून कमी झाला, तो ५१,६०० क्युसेकवर ठेवण्यात आला. त्याशिवाय दहिगाव योजनेला २१० क्युसेक, बोगद्याला ९०० क्युसेक, कालव्याला १७०० क्युसेक, वीजनिर्मितीला १६०० क्युसेक असे पाणी सोडण्यात आल्याने भीमेची पातळी पूर्णपणे नियंत्रणात राहिली आहे. परिणामी पंढरपूरसह नदीकाठच्या गावातील पूरस्थिती तूर्तास तरी टळली आहे.
उजनी धरणाचा उपयुक्त साठा ५६.८७ टीएमसीवर
मुख्यतः पुणे जिल्ह्यात पाऊस थांबल्याने दौंडकडून उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्यात मोठी घट झाली. बुधवारी २५ हजार ५३७ क्युसेक पाणी येत होते. त्यामुळे धरणाची पाणी पातळी काहीशी स्थिर राहिली. बुधवारी (ता. ७) दुपारी धरणाची पाणी पातळी ४९७.१०५ मीटरपर्यंत राहिली. त्यात एकूण पाणीसाठा १२०.५३ टीएमसी तर त्यापैकी उपयुक्त साठा ५६.८७ टीएमसी राहिला. तर या पाण्याची टक्केवारी १०६.१५ टक्के राहिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.