Harish Jakhete and his Wife Agrowon
ॲग्रो विशेष

Vasubaras Diwali Article : माळरानी फुलले चैतन्य...

Agriculture Success : गेल्या तेरा वर्षांपासून अठरा एकर माळजमिनीवर फळबाग आणि लाल कंधारी गोवंशाच्या साथीने जमीन आणि उत्पादनाची सकसता वाढविणारी ‘आनंदाची शेती’ मी करतोय. या माळरानाला नवं चैतन्य मिळू लागलंय... हे अनुभवाचे बोल आहेत, छत्रपती संभाजीनगर येथील हरीश जाखेटे यांचे...

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Indian Agriculture : छत्रपती संभाजीनगर शहराच्या समर्थ नगरातील रहिवासी आणि औषधी व्यवसाय करणारे हरीश जाखेटे यांच्या कुटुंबाचे मूळ गाव तापी तीरावर वसलेले वडगाव बुद्रुक (ता. चोपडा, जि. जळगाव). कुटुंबाकडे शेती असल्याने बालपणापासूनच त्यांना शेतीचं मोठं आकर्षण. वडील बांधकाम अभियंता असल्याने ते व्यवसायाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरात स्थायिक झाले.

त्यामुळे हरीशरावांचं बालपण आणि शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं. बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर कृषी पदवीधर होऊन चांगली शेती करावी असे त्यांना वाटलं. त्यांनी वडिलांना शिक्षणाबाबत सांगितले. परंतु वडील म्हणाले, की जग कुठं चाललं ते शीक, लोक शेती सोडून उद्योग किंवा नोकरी करीत असताना तू शेतीकडे वळणं योग्य नाही.

त्यांनी हरीशरावांना औषध निर्माण शास्त्र विषयात करिअर करण्याचा सल्ला दिला. हरीशरावांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नामांकित खासगी औषध निर्मिती उद्योग समूहात दीड वर्ष संशोधन विभागात नोकरी केली. हे करत असताना त्यांना औषध विक्री व्यवसायाची संधी आली आणि ते नोकरी सोडून त्यांनी स्वतःची विक्री व्यवसायातील एजन्सी सुरू केली.

शेतीच्या ओढीने...

औषध विक्री एजन्सी व्यवसाय करत असले तरी हरीशरावांच्या मनातील शेती काही सुटत नव्हती. अशातच साधारणत: २००५ मध्ये त्यांचे मित्र मोहम्मद अफसर यांनी शेतजमीन घ्यायची का, अशी विचारणा केली आणि त्यांच्या मनाने पुन्हा शेतीच्या विचारानं उचल खाल्ली अन् २५ किलोमीटर अंतरावरील कसाबखेडा शिवाराजवळील दिवशी गावाच्या डोंगराला लागून असलेल्या माळ जमिनीत त्यांची गाडी येऊन थांबली.

पावसाळ्याचे दिवस असल्याने शिवार हिरवेगार होते. शेताजवळील ओढा खळखळून वाहत होता. परिसर आवडल्याने सौदा पटला तर आपण घेऊ असे मनाने कौल दिला आणि जागेवरच मोहम्मद अफसर यांना होकार दिला. ज्या शेतकऱ्यांची शेती पाहिली होती, त्याच्या सोबत त्याच दिवशी सायंकाळी बैठक झाली. शेतकऱ्याने सांगितलेली रक्कम आवाक्याबाहेर होती, पण जमीन चांगल्या भागात असल्याने वडील, भाऊ मित्रमंडळींशी बोलून पुरेशी रक्कम जमा करता येईल असा विचार केला.

याबाबत शेतकऱ्याला परिस्थिती सांगून एका टप्प्यातच १८ एकरांचा डाग खरेदीचे मान्य केले. व्यवहार करण्यासाठी आवश्‍यक रक्‍कम नसल्याने पूर्ण रक्‍कम देण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मागितली. विकणाऱ्या शेतकऱ्यानेही पूर्ण १८ एकर शेती एकाच वेळी विकली जात असल्याने ती मुदत मान्य केली. नोकरी, व्यवसायातून जमविलेले जवळपास आठ लाख रुपये देऊन इसार पावती झाली.

मनातल्या शेतीच्या इच्छेने केलेली ही सगळी खटपट कुणालाही माहिती नव्हती. जेव्हा घरच्यांना याबाबत कल्पना दिली आणि आर्थिक मदतीची मागणी केली कोणाचीही साथ मिळाली नाही, उलट वेगळेच सल्ले ऐकून घ्यावे लागले. एका बाजूला इसार पावती तर झालेली, काय करावं हे सुचत नव्हतं. विचार करण्यामध्ये पाच महिने निघून गेले. उत्तर काही मिळत नव्हते. हातामध्ये केवळ एक महिना राहिला असताना एका महाविद्यालयातील मित्राची आठवण झाली आणि शेवटचा पर्याय म्हणून त्याला संपर्क केला.

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा...

जेव्हा कोणी सोबत नसते, तेव्हा मित्र सोबत येतो, याचा प्रत्यय हरीशरावांना आला. याबाबत ते म्हणाले, की चिंताग्रस्त मनाने माझ्यासोबत फार्मसी पदवी शिक्षणावेळी सोबत असलेला आणि आता मुंबईत व्यावसायिक असलेल्या दीपन दलाल या मित्राला संपर्क केला. चर्चा करून त्याला शेत पाहायला बोलावले. शेती पाहिल्यावर त्याने खरेदीसाठी आर्थिक मदत करण्यास होकार दिला. मी मुंबईला करार पत्र आणि चेकबुक घेऊन गेलो. परंतु तो म्हणाला, की मी तुला आर्थिक मदत करतो, पण आपण दोघे मिळून शेती घेण्याऐवजी सगळी शेती तूच विकत घे. मी दिलेल्या आर्थिक मदतीची कोणतीही लिखापढी, करार करून नको. मला तुझे पोस्ट डेटेड चेकही नकोत.

दिलेल्या रकमेवर मला व्याजही देऊ नको, कारण मी काही सावकार नाही. तुझ्या आनंदात माझा आनंद आहे. असे बोलून ठरलेली रक्कम मला सुपूर्त केली. मी शेती व्यवहार पूर्ण केला. मित्र कसा असतो.... दुःख अडवायला उंबऱ्यासारखा... मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा... या ओळीची जाणीव मला झाली. खरेदी व्यवहार पूर्ण होतात, माझ्या मनातील इच्छेप्रमाणे माझ्या मित्राच्या साक्षीने गणेश मंदिर उभारून शेतीचा शुभारंभ केला. पुढील दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने मी त्याने केलेली सर्व आर्थिक मदत परत केली.

प्रत्यक्षात आले चैतन्य कृषी पर्यटन...

शेती तर घेतली ती कशी करावी, हा प्रश्‍नच होता. मनानं पर्यावरणपूरक शेती करण्याचं सुचवलं अन् पावलं त्या दिशेने पडू लागली. पर्यावरण संवर्धन हा संदेश आपल्या शेतीतून लोकांना पटावा म्हणून पर्यावरणपूरक कृषी पर्यटन करण्याचे हरीशरावांनी ठरविले. या प्रवासाबाबत ते म्हणाले, की मला खरं मार्गदर्शन मिळाले ते ‘ॲग्रोवन’मुळे. शेतीची आवड असल्याने मी पहिल्यापासून या दैनिकाचा वाचक आहे.

मला जे तांत्रिक लेख, यशोगाथा आवडल्या त्यांची नोंद ठेवत असल्याने माझ्या शेतीचे नियोजन करताना काहीही अडचण आली नाही. मी अनेक तज्ज्ञ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना संपर्क केला, त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन घेतले आणि हे माळरान हिरवेगार करण्यास सुरवात केली. पहिल्या टप्प्यापासूनच कृषी पर्यटनाच्या दृष्टीने शेतीची आखणी केली. पोटखराब जागेत निवासासाठी चार खोल्या आणि एक दगडी वाडा पर्यटकांसाठी उभा केला.

या ठिकाणांना ग्रीष्मा, वर्षा, वसंत, हेमंत, शिशिर अशी नावेदेखील दिली. अठरा एकरामध्ये चैतन्यमयी वातावरणातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी तयार केलेल्या शेतरत्यावरील फलकावर शेती आणि निसर्गाशी निगडित कविता लावल्या. विविध फळझाडे, फुलझाडांची लागवड सुरू केली आणि परिसराला ‘चैतन्य’ असं नाव दिलं. आपल्या शेतीमातीचं चैतन्य लोकांना कळावं, हे नाव देण्यामागची भूमिका. संपूर्ण शेतीच्या व्यवस्थापनासाठी दोन मजूर कुटुंबे कायमस्वरूपी शेतामध्ये आहेत. पीक व्यवस्थापनाच्या गरजेनुसार ८ ते १० मजूर घेतले जातात.

माळरान बहरले...

शाश्‍वत पाणीपुरवठ्यासाठी शेतीमध्ये १ कोटी २५ लाख लिटर क्षमतेचे शेततळे आहे. शेतातील विहिरीचे पाणी फेब्रुवारीपर्यंत टिकते. १८ एकर शेतीपैकी दहा एकरावर फळबाग आहे. यामध्ये १०० पेरू, २०० केसर आंबा, २५० बालानगर सीताफळ कलमे आहेत. याशिवाय बांधावर रामफळ, नारळ, चिकू, जांभूळ, तुती, भोकर, बोर, पिंपळ, कडुनिंब लागवड आहे. दोन एकरांवर चारा पिकांची लागवड आहे.

उर्वरित क्षेत्रामध्ये हंगामानुसार भाजीपाला, भुईमूग, ज्वारी, बाजरी, मूग उडीद, तूर आणि गव्हाची लागवड असते. फळबाग आणि हंगामी पिकांना सेंद्रिय खते आणि सेंद्रिय कीडनाशकांचा वापर करतात. टप्प्याटप्प्याने जमीन सुपीकतेकडे चालली आहे. शेतावर आलेले पर्यटक हेच फळे, भाजीपाला आणि धान्याचे मुख्य ग्राहक आहेत.

तसेच छत्रपती संभाजीनगरमध्येही मागणीनुसार फळे, धान्य, भाजीपाल्याची विक्री केली जाते. गहू ५५ रुपये, ज्वारी, ६५ रुपये, बाजरी ३५ रुपये आणि विना पॉलिश डाळ बाजारपेठेतील दरानुसार विक्री होते. या शेतीमाल विक्रीतून दर महिन्याला दोन लाखांची उलाढाल होते.

शेती झाली पर्यटन केंद्र

दर शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी चैतन्यदायी शेती पर्यटकांनी भरून जाते. याच बरोबरीने या परिसरात प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रमासाठी येणारे संत महंत, जैन मुनी यांचे वास्तव्य या शेतीमध्ये असते. येत्या काळात नागरिक आणि मुलांना भारतीय शेती आणि संस्कृतीची माहिती होण्यासाठी गुरुकुल उभे करण्याचा हरीशरावांचा मानस आहे. हरीशरावांच्या पत्नी सीमाताई यांच्याकडे शेती, कृषी पर्यटन आणि गोठ्याची जबाबदारी आहे. दर शुक्रवार ते रविवार त्या शेती नियोजनात रमतात.

मुलीने निवडलं ‘ॲडव्हेंचर टुरिझम’

हरीशराव आणि सीमाताईंच्या संसारवेलीवर राशी आणि कल्याणी या दोन मुली. मोठी मुलगी राशी हिने आई-वडिलांनी उभ्या केलेल्या कृषी पर्यटनाच्या पुढे एक पाऊल टाकत पर्यटन विषयात शिक्षण घेतले. आता ती फ्रान्समध्ये नामांकित कंपनीत ॲडव्हेंचर टुरिझमची जबाबदारी सांभाळते. दुसरी मुलगी कल्याणी ही मुंबईतील ‘एनआयएफटी’मध्ये टेक्‍स्टाइल डिझायनिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. दोन्ही मुलींनी आपापल्या कलानुसार शिक्षणाची वाट निवडलेली आहे.

शेतामध्ये आले गोकूळ...

मैं तो अकेला चला था, मगर काफिला बनता गया... तसंच काहीसे हरीशरावांच्या शेती बाबतीत झाले. ओळखीच्या लोकांनी रसायन अवशेषमुक्त, पर्यावरणपूरक आणि जमिनीची सुपीकता वाढविणारी शेती करा, असा सल्ला दिला आणि मार्गही दाखविला. त्यामागे मराठवाड्यातील गोवंशाचे संवर्धन हा देखील या मान्यवर व्यक्तींचा उद्देश होता. शेतीच्या बरोबरीने मराठवाड्यातील लाल कंधारी किंवा देवणी गोवंशाचे संवर्धन करण्याचा निर्णय हरीशरावांनी घेतला आणि काही दिवसांत शेतीमध्ये गोकूळ उभे राहू लागले. हरीशरावांनी २०११ मध्ये पशुतज्ज्ञ आणि प्रयोगशील पशुपालकांशी चर्चा करून कंधार परिसरातून दहा जातिवंत दुधाळ लाल कंधारी गाई आणि एक पैदाशीसाठी वळू खरेदी केला. आज या गोकुळात ३५ जातिवंत लाल कंधारी गोवंश नांदत आहेत.

उन्हाळ्याचे चार महिने गाईंचा मुक्‍त गोठ्यात संचार असतो. वर्षातील आठ महिने जवळपासच्या डोंगरात गाई चरायला जातात. त्यामुळे विविध प्रकारचे गवत त्यांना खायला मिळते. मुक्त संचार गोठ्यातील कीटक आणि जनावरांच्या अंगावरील गोचिड नियंत्रणासाठी गावरान कोंबड्यांचे संगोपन त्यांनी केले आहे. दर दीड, दोन वर्षांनी पैदाशीचा वळू बदलला जातो. शेतातील ज्वारी, बाजरी कडबा, गहू कुटाराचा वापर पशुखाद्यात केला जातो. तसेच दोन एकर क्षेत्रावर नेपिअर गवताची लागवड केली आहे. दुधाच्या विक्रीपेक्षा जन्माला येणाऱ्या वासरांना दूध पाजण्यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे वासरे सशक्त होतात.

दरवर्षी होणारी कालवड, खोंड हा परिसरातील शेतकरी घेऊन जातात. सध्या सात गाई दुधात असून दररोज वीस लिटर दुधाचे उत्पादन होते. शेतातील गडी दररोज छत्रपती संभाजीनगर येथे दूध घेऊन येतो. ग्राहकांना ७० रुपये लिटर दराने विक्री होते. प्रामुख्याने ज्यांच्या घरी लहान मुले आणि वयस्क व्यक्ती आहेत अशा कुटुंबांना रतिबासाठी प्राधान्य दिले आहे. गोठ्यातील जनावरांमुळे शेतीला पुरेसे शेणखत, गांडूळ खत उपलब्ध होते. याच बरोबरीने जिवामृत, दशपर्णी अर्क निर्मिती केली जाते. दरवर्षी दहा टन गांडूळ खत निर्मिती होते. हे सर्व फळबागांना वापरले जाते. त्यामुळे दर्जेदार फळांचे उत्पादन मिळते.

लक्षवेधक फलक...

शेतामध्ये विविध ठिकाणी नामवंत कवींच्या कविता लिहिलेल्या आहेत. एक फलक पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. एक किलो शेतीमाल पिकविण्यासाठी लागणाऱ्या पाण्याबरोबरच एका वेळच्या एका ताटातील विविध प्रकारचे अन्न शिजविण्यासाठी लागणारे पाणी या सोबतच दैनंदिन कामांसाठी लागणाऱ्या पाण्याचा मांडलेला ताळेबंद डोळ्यात अंजन घालणारा आहे.

- हरीश जाखेटे, ९८२३१४२८४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Cultivation : अतिघन आंबा लागवडीतून निर्यात योग्य उत्पादन शक्य

Hurda Jowar : हुरडा ज्वारी उत्पादनाचे गवसले तंत्र

Maharashtra Vidhansabha Election : अखेरच्या दिवशी सुमारे ११ हजार अर्ज; ४७ ठिकाणी सेना विरूद्ध सेना अशी लढत, महायुती २८२ तर मविआकडून २८७ उमेदवार

Wheat Sowing : गहू पेरणीची सुधारित पद्धत

Shatavari Benefits : आरोग्यासाठी फायदेशीर शतावरी

SCROLL FOR NEXT