Agri Tourism : उजाड माळरानावर बहरले कृषी पर्यटन केंद्र

Agriculture Tourism Business : निसर्ग भटकंतीच्या व्यासंगातून चौघा मित्रांना कृषी पर्यटनाची संकल्पना सुचली. याच संकल्पनेवर पश्‍चिम विदर्भातील दुर्गम चनाखा (ता. राजूरा, जि. चंद्रपूर) येथे २०१६ मध्ये ‘एक मोकळा श्‍वास’ या कृषी पर्यटन केंद्राची सुरुवात केली.
Agri Tourism
Agri TourismAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : पुणे येथील सुहास आसेकर आणि त्यांच्या पत्नी सौ. कांचना यांच्या मित्रांच्या यादीत रिंकू मरसकोल्हे, नितीन मुसळे आणि रूपेश शिवणकर यांचा समावेश आहे. यातील काही जण खासगी कंपनीत नोकरी करतात, तर नितीन मुसळे हे एका शाळेत लिपिक पदावर आहेत.

असे असले तरी या चौघांना निसर्ग पर्यटन आणि भटकंतीचा व्यासंग होता. त्याकरिता हे मित्र पुण्यात एकत्रित येत भटकंतीवर निघायचे. त्याचवेळी चर्चेदरम्यान नवी पिढी निसर्ग आणि मातीपासून दुरावत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या पिढीची नाळ शेतीमातीशी कशी जोडता येईल, यावर मंथन सुरू केले. आणि त्यातूनच ‘एक मोकळा श्‍वास’ या नावाने कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र अस्तित्वात आले. सहा एकरावरील पर्यटन केंद्रालगत आणखी ४ एकर शेती खरेदी करत दहा एकरावर प्रकल्पाचा विस्तार करण्यात आला. एमडीटीसी तसेच पर्यटन संचालनालयाचे रीतसर परवाने घेतले आहेत. २०२० मध्ये ‘नॅशनल ॲग्रो टुरिझम या पुरस्काराने या प्रकल्पाला गौरविण्यात आले आहे.

पर्यटन केंद्राची सुरुवात

चौघा मित्रांपैकी रिंकू मरसकोल्हे यांची चनाखा (ता. राजूरा, जि. चंद्रपूर) येथे उजाड माळरानावर सहा एकर जमीन होती. या शेतीलगतचा परिसर निसर्गरम्य होता. त्यामुळेच या शेतीला उत्पन्नक्षम करण्यासाठी या ठिकाणी प्रकल्पाची उभारणी करण्याचे चौघा मित्रांनी ठरविले. त्याकरिता मशागतीपासून झाडांची लागवड करण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली. मात्र कृषी पर्यटनापूर्वी उत्पन्नासाठी पहिल्या टप्प्यात गोट फार्म उभारण्यात आला. मात्र या व्यवसायात अपेक्षित यश आले नाही.

त्यानंतर वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीवर भर दिला. एक एकरातील आले लागवडीतून सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर स्वीट कॉर्न लावले. स्वीट कॉर्न बाजारात विक्रीसाठी घेऊन गेल्यानंतर पाच ते दहा रुपयांचा अत्यल्प दर मिळाला. अशाप्रकारे विक्री करण्यापेक्षा थेट खवय्यांनाच स्वीट कॉर्न खाण्यासाठी शेतात बोलावले तर ! असा विचार मनात आला. मग या विचारावर काम सुरू केले.

Agri Tourism
World Agri-Tourism Day : कृषी पर्यटनातून पूरक व्यवसायाची संधी

वाटेल तितके स्वीट कॉर्न खा

स्वीट कॉर्नची चांगल्या दरात विक्री व्हावी याकरिता थेट बांधावर येऊन हवे तितके स्वीटकॉर्न खा अशी जाहिरात खवय्यांसाठी केली. इच्छुकांसाठी १०० रुपये प्रवेश शुल्क लावण्यात आले. बांधावर बसून भाजलेले लिंबू, मीठ लावलेले स्वीट कॉर्न चाखण्या संधी लोकांना मिळाली. परंतु घरी खाण्यासाठी न्यायचे असल्यास प्रति नग वीस रुपये दर आकारण्यात आला. याला व्यापक प्रतिसाद मिळाला. यातून शेतमाल शेतातूनच विकल्यास त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, हे ही लक्षात आले. त्यातून कृषी पर्यटनाचा विस्तार होत गेला, असे सुहास आसेकर सांगतात.

मराठमोळ्या पद्धतीने पर्यटकांचे स्वागत

चनाखा हद्दीत असलेले हे पर्यटन केंद्र या गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. चंद्रपूरपासून ३६ किमी, तर नागपूरपासून २२५ किमी अंतरावर आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा तेलंगणा राज्याशी संलग्नित आहेत. या राज्याच्या आदिलाबाद, मंचेरीयल, कागजनगर, आसिफाबाद या भागातून देखील ३० टक्‍के पर्यटक या ठिकाणी भेट देतात.

त्यासोबतच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील पर्यटकांची चांगलीच रेलचेल राहते. वर्षभरात सुमारे ८ ते १० हजार पर्यटक भेटी देतात. पर्यटन केंद्रात आलेल्या पाहुण्याचे खास मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने हळद-कुंकू लावून त्यांचे औक्षण करून स्वागत केले जाते. त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात त्यांना पर्यटनस्थळी आणले जाते.

बालपणात जाल हरवून

नवी पिढी मैदानी खेळांऐवजी आता घरामध्ये मोबाईलवर बैठे खेळ खेळण्यात रमलेली दिसते. त्यामुळे त्यांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाला चालना मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन पर्यटन केंद्रामध्ये जुन्या पारंपरिक खेळांचे साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. कंचे (गोट्या), विटू दांडू, लगोरी, मामाचं पत्र हरवलं, कॅरम, रान माकड, टायर चालविणे, रस्सी खेच, सायकलिंगचा अनुभव या ठिकाणी पर्यटकांना घेता येतो. शिवाय शेतीचे आकर्षण लहान मुलांमध्ये वाढावे यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात.

Agri Tourism
Agri Tourism : मावळ तालुका झालाय ‘कृषी पर्यटन हब’

स्वीमिंग पुलसह साहसी खेळांची रेलचेल

केंद्रामध्ये बेबी पुलसह वेगवेगळ्या वयोगटासाठी तीन स्वीमिंग पूल उभारले आहेत. त्यात वॉटरगेम करिता स्लाइडही बसविल्या आहेत. त्यातूनही पर्यटक वॉटर ॲडव्हेंचर अनुभवतात. या सर्वांच्या जोडीला झिप लाईन, झिगझॅग लाईन, रॉक क्‍लायमबींग, कमांडो नेट यासह ११ प्रकारचे साहसी खेळांची सोय करण्यात आली आहे.

रसरशीत हुरडा पार्टी

कृषी पर्यटन आणि हुरडा पार्टी हे समीकरणच रूढ झाले आहे. त्यानुसार हुरडा पार्टीचे देखील आयोजन केले जाते. हुरडा पार्टीच्या मेन्यूत हुरडा, वांग्याचे भरीत, मठ्ठा, पाच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, मिरचीचा ठेचा, तीळ, शेंगदाणा व इतर चटण्यांचा समावेश असतो. हुरडा पार्टीचे आयोजन खास चेरीच्या बागेत केले जाते. नगर भागातून हुरड्याकरिता खास वाणाची ज्वारी मागवली जाते. त्याकरिता काही शेतकऱ्यांशी खरेदी करार देखील केला आहे. गेल्या हंगामात एकाच शेतकऱ्याला साडेपाच लाख रुपयांचे पेमेंट हुरड्यासाठी केले आहे, असे सुहास आसेकर सांगतात.

पर्यटक करतात पीक लागवड आणि काढणी

‘एक मोकळा श्‍वास’ या पर्यटन केंद्राने एक वेगळेपण जपले आहे. पीक लागवडीच्या काळात पर्यटकांना लागवडीच्या कामांचा तसेच काढणीच्या हंगामात प्रत्यक्ष काढणी करण्याचा अनुभव घेता येतो. या माध्यमातून पर्यटकांना शेतकऱ्यांचे जीवन अनुभवता येते, असे नितीन मुसळे यांनी सांगितले. ॲपल बोर, वॉटर ॲपल, फणस, आंबा, चिकू, पेरू, संत्रा, मोसंबी, जमायकन चेरी, अंजीर, काजू, सुपारी अशा विविध फळझाडे लावली आहेत. तसेच हळद, भाजीपाला लागवड देखील केली जाते. पर्यटकांना स्वतः भाजीपाला तोडण्याची येथे मुभा आहे. हळद पावडर पर्यटन केंद्रात तयार केली जाते. त्यास पर्यटकांकडून मोठी मागणी राहते.

जेवणासाठी खास मेन्यू

सारे खेळ खेळून दमल्यानंतर साहजिकच जोराची भूक लागते. आणि त्याकरिता अस्सल वैदर्भीय पद्धतीने बनविलेले गावरान शाकाहारी जेवण तयार असते. त्यात पिठलं, भाकरी, वांग्याचे भरीत यांच्या जोडीला शेंगदाणा, तिळाच्या चटणीसह कांदा, लिंबू, पापड असे सारे जीभेचे चोचले पुरविणाऱ्या मिष्ठानं पर्यटकांना आस्वाद चाखण्यासाठी पुरविले जातात. जेवणाच्या शेवटी स्वीट तर लागणारच म्हणून आइस्क्रीम, गुलाबजाम हे नेहमीच्या पठडीतील पदार्थ न ठेवता ‘गोडवरण’ हा खास पदार्थ येथे चाखायला मिळतो. चना डाळ ९० टक्‍के यात राहते. त्यासोबतच गूळ किंवा साखर, तूप, विलायची, थोडे काजू मिसळले जातात.

पर्यटन केंद्रातून रोजगार

चनाखा हे दुर्गम गाव आहे. या गावात शेतमजुरी शिवाय रोजगाराचा दुसरा पर्याय नाही. मात्र चौघा मित्रांच्या या प्रकल्पामुळे १६ व्यक्‍तींना नियमित रोजगार मिळाला आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यास त्याकरिता अतिरिक्‍त कामगारांची गरज भासते. सरासरी ४२ व्यक्‍तींना हंगामी रोजगार या प्रकल्पातून मिळतो.

- सुहास आसेकर, ७०२००७३१३१

- नितीन मुसळे, ९८२२७२८८७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com