Zero Tillage Technique  Agrowon
ॲग्रो विशेष

Zero Tillage Technique : शून्य मशागत तंत्राने फळबाग यशस्वी केलेले शिक्षक

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील वाई हातोला येथील नौशाद खान पठाण यांनी शिक्षकपदाची नोकरी करीत अभ्यासपूर्वक शेतीही साध्य केली आहे. फळबाग पद्धती व शून्य मशागत तंत्रज्ञान या माध्यमातून शेतीमालासह मातीची उत्पादकता, गुणवत्ता वाढवली. महत्त्वाचे म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात माझे जीवन खूप समाधानी झाले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील वाई हातोला येथील नौशाद खान पठाण यांची सात एकर शेती आहे.
सध्या ते परिसरातील बोरी येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी
इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इंग्रजी, अर्थशास्त्र आदी विषयांमध्ये एमए केले आहे.
दिवसभराची नोकरी सांभाळून दर शनिवार, रविवार, अन्य सुट्ट्यांच्या दिवशी तसेच अन्य दिवशी शक्य तो वेळ ते शेतीला देतात.

शून्य मशागत तंत्राचा वापर

नौशाद पूर्वी उन्हाळ्यात टरबूज (कलिंगड), खरबूज व जून महिन्यात कपाशी अशी एकाच पॉली मल्चिंगवर तीन पिके घेत. पीक काढणीनंतर ते गादीवाफा (बेड) काढून टाकायचे. पुन्हा पुढील पिकासाठी नव्याने लागवडीची तयारी व्हायची. सन २०१६ मध्ये कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्र. रा. चिपळूणकर यांची ओळख झाली. त्यांनी ‘बेड’ न काढता शून्य मशागत तंत्राचा वापर करण्याचा सल्ला व फायदे सांगितले. मग नौशाद यांनी त्याच तंत्रज्ञानाद्वारे शेती सुरू केली.

...अशी आहे शेती पद्धती

नौशाद सांगतात, की सन २०१६ ते २०२३ पर्यंत थोडक्यात माझी शेती पद्धती सांगायची, तर
ऑक्टोबर २०१६ मध्ये खरबुजाच्या पिकापासून शून्य मशागत तंत्राचा वापर सुरू केला.
त्यानंतर मार्चमध्ये कलिंगड घेतले.

त्याच वेळी त्यात पपई घेतली. पपईच्या काढणीनंतर त्यात खरबूज, कलिंगड घेतले. त्यानंतर पपई, त्यानंतर मागील दोन वर्षे हळद अशी पद्धत ठेवली. बेड आता आठ वर्षे जुने आहेत. यात दर तीन वर्षांनी मातीची भर दिली जाते.

उन्हाळ्यात तापमान ४५ अंशांपर्यंत जात असल्याने ढेंच्यासारख्या हिरवळीच्या खताचा वापर होतो. त्याची उंची सुमारे आठ फुटांपर्यंत वाढल्यामुळे बागेत सावली तयार होते. काढणीदरम्यान त्याचे बूड जमिनीत ठेवल्याने त्यापासून सेंद्रिय खत जमिनीला मिळते.

पीक पद्धती व उत्पादन

शून्य मशागत तंत्रावरील सेलम जातीच्या हळदीचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी सुकविलेल्या हळदीचे उल्लेखनीय म्हणजे एकरी ५० क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. त्यापुढील वर्षी हवामानाची योग्य साथ न मिळाल्याने ते ३० क्विंटलपर्यंत मिळाले.

त्यास प्रति क्विंटल आठ हजार ते १२ हजारांपर्यंत दर मिळाले. केळी उत्पादनाचे यंदा पहिलेच वर्ष आहे. आतापर्यंत एकूण झाडांमधून ९६ टन मालाची विक्री झाली असून, ११ रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. यापूर्वी कलिंगडाचे एकरी २५ टन, खरबुजाचे १५ टनांच्या दरम्यान उत्पादन मिळाले आहे. परिसरातील व्यापारी जागेवर येऊन माल खरेदी करतात.

शून्य मशागत तंत्राचे झालेले फायदे

- नौशाद सांगतात, की नांगरणीवरील एकरी चार-पाच हजार रुपये, तर सात एकरांत पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च वाचत आहे. शिवाय डिझेल, पेट्रोल अर्थात राष्ट्रीय संपत्तीची बचत होत आहे.

- या भागात ‘बेडमेकर’ किंवा तत्सम अवजारे मिळत नाहीत. तो उपलब्ध करण्याचे त्रास, वेळ कमी झाला.

- मशागत, नांगरणी नसल्याने प्रत्येक पिकाचे अवशेष जमिनीला सातत्याने मिळत राहिले.
गेल्या काही वर्षांत पिकांचे अवशेष कधीच जाळलेले नाहीत. त्यामुळे जमिनीची सुपीकता, पोत, भुसभुशीतपणा वाढला आहे. त्यामुळे पिकांची एकरी उत्पादकता वाढली आहे.

-पीक सशक्त, निरोगी राहिल्याने किडी-रोगांची समस्या कमी राहिली आहे.

-नांगरणी नसल्याने ठिबकच्या नळ्या उचलणे व पुन्हा अंथरणे या कामाची गरज पडत नाही. सात एकरांत त्यासाठी २५ पर्यंत मजूर लागतात. त्यामुळे त्यांच्यावरील बचतीबरोबर १० हजारांपर्यंत खर्चही वाचला.

-शेतीतील अनेक कामे कमी झाली. त्यामुळे पूर्वी देखरेखीसाठी ठेवलेल्या व्यक्तीवर होणारा वार्षिक सव्वा लाख रुपये व चार वर्षासाठीचा पाच लाख रुपये खर्च वाचला आहे.

नौशाद सांगतात की शून्य मशागत तंत्राने मी शेती व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर केली आहे. पण निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे समाधान मी मिळवले आहे. शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा अन्य दीर्घ सुट्टीत मी अन्य कोठेही फिरायला जात नाही. पूर्ण वेळ शेतालाच देतो. शेतीत नियोजनाला मी खूप महत्त्व दिले आहे. पुढील दोन-तीन वर्षांचे आगाऊ नियोजन माझे तयार असते. आणि ते शंभर टक्के तडीस नेले जाते.

मुलांसाठी शेवगा

नोकरीत रामनगर रुई येथे असताना जिल्हा परिषद शाळेत त्यांनी शेवग्याची ६० झाडे लावली. विद्यार्थ्यांना पोषक आहारात तो मिळावा हा त्यामागे उद्देश होता. त्यानुसार मुलांना भाजीच्या माध्यमातून त्याचा आस्वादही त्यांनी दिला. आत्ता नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या पुढाकारातून व लोकवर्गणीतून शेवग्याच्या १७५ झाडांची व आंबा, पेरू, फणस, चिकू आदी ५० झाडांची लागवड
झाली आहे.

नौशाद खान पठाण, ९४०४०८२६४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan and Namo Yojana : 'पीएम किसान’चा १८ वा आणि ‘नमो’चा पाचवा हप्ता खात्यात जमा

Congress questions on Modi's visit : राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी जीवन संपवले, भाजपने काय केलं? काँग्रेसचा मोदींना सवाल

Organic Pesticide : जैविक कीटकनाशक ‘मेटाऱ्हायझियम’

Makhana Benefits : मखनाचे आरोग्यदायी फायदे

Rahul Gandhi : राहुल गांधीचा भाजपवर हल्लाबोल, कोल्हापुरात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

SCROLL FOR NEXT