डॉ. विशाल गमे, डॉ. बापूसाहेब भाकरे
‘इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायन्सेस’ने (IUSS) २००२ मध्ये जागतिक मृदा दिवस साजरा करण्यासंदर्भात केलेली शिफारस ही जागतिक अन्न आणि कृषी परिषदेने २० डिसेंबर २०१३ रोजी ६८ व्या संयुक्त राष्ट्र महासभेत मान्य केली.
२०१४ पासून दरवर्षी ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्यासाठी दरवर्षी मातीचे आपल्या जीवनातील महत्त्व अधोरेखित करणारी एखादी थीम घेऊन वर्षभर काम केले जाते. २०२४ या वर्षाची मृदा दिनाची संकल्पना “मातीची काळजी- मापन, निरीक्षण, व्यवस्थापन” यावर आधारित आहे.
भारत हा कृषिप्रधान देश असून, शेतीसाठी जमीन म्हणजेच सुपीक माती अत्यंत महत्त्वाची असते. खरेतर ही राष्ट्राची संपत्ती आहे. भावी पिढ्यांसाठी तिचे जतन करण्याची आवश्यकता आहे. भारतीय संस्कृतीमध्ये जमिनीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. मानवाच्या मूलभूत गरजा पुरविण्याची क्षमता मातीमध्ये आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये जमिनींचा ऱ्हास विविध कारणांनी होत आहे.
जमिनीची सुपीकता, जमिनीचा पोत, जमिनीचे वेगवेगळे गुणधर्म व जमिनीचे आरोग्य बिघडत चाललेले आहे. हे जमिनीचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी, ते चिरंतन ठेवण्यासाठी शाश्वत उपाययोजना करण्याची आवश्यकता असते.
जमिनीमध्ये मातीचा सर्वांत वरचा थर सुपीक मानला जातो. या मातीच्या थरामध्ये उपलब्ध विविध सेंद्रिय पदार्थ, ओलावा, योग्य प्रमाणात खेळती हवा यामुळे सूक्ष्म जिवाणूंची वाढ होते. हे जिवाणू या मातीतील विविध अन्नद्रव्यांची पिकांना उपलब्धता करण्यामध्ये मोलाची भूमिका निभावतात. या वर्षीची मृदा दिनाची संकल्पना ही मापन, निरीक्षण आणि व्यवस्थापन अशी आहे.
मापन
मातीची सध्याच्या स्थिती नेमकी कशी आहे, हे मोजणे. मातीच्या शाश्वत व्यवस्थापनाकरिता मातीच्या विविध पैलूंचे मोजमाप करणे गरजेचे आहे. त्यासाठी मातीचे विश्लेषण प्रयोगशाळेत करणे आवश्यक असते. मातीच्या भौतिक, रासायनिक व जैविक अशा विविध गुणधर्मांचे मापन करणे आवश्यक आहे. मातीच्या भौतिक गुणधर्मांचा परिणाम पिकाच्या वाढीवर दिसून येतो. मातीमुळे वनस्पतींना व पिकांना आधार मिळतो.
पिकांना जमिनीतून हवा, पाणी आणि सेंद्रिय पदार्थ मिळतात. जमिनीच्या भौतिक गुणधर्मांवर रासायनिक आणि जैविक कार्य अवलंबून असते. जमिनीचा पोत व संरचना जमिनीचा आत्मा आहे. जमिनीतील हवेच्या पोकळीमुळे जमिनीत हवा व पाणी खेळते राहून ते मुळांना घेता येते. जमिनीचा रंगामुळेही मातीचे तापमान कमीजास्त होते. मातीचे भौतिक गुणधर्मांमध्ये मातीचा कणांचा आकार, कणांची संरचना, रंग, घनता, जमिनीतील हवेच्या पोकळ्या, जमिनीचा पोत आणि जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता यासारख्या गुणधर्मांचा समावेश होतो.
मातीच्या रासायनिक गुणधर्मांवर पिकांना आवश्यक असणाऱ्या मूलद्रव्यांची उपलब्धता अवलंबून असते. जमिनीतील जैविक क्रिया ही जमिनीच्या रासायनिक गुणधर्मांवर अवलंबून असतात. या रासायनिक गुणधर्मांमध्ये प्रामुख्याने आम्ल विम्ल निर्देशांक (सामू), जमिनीची प्रतिरोधक क्षमता, क्षारता, आयन विनिमयक्षमता आणि जमिनीतील माती मिश्रित पाणी (मृदा विद्राव) यांचा समावेश होतो.
माती दिसायला जरी निर्जीव दिसत असली तरी त्यात प्रत्यक्षात असंख्य सूक्ष्मजीव, जिवाणू, बुरशी आणि गांडुळांसारखे संपूर्ण जीवनच मातीमध्ये फुलत असते. त्याच प्रमाणे मातीमध्ये बिळे करून राहणारे लहान मोठे सजीवही मातीच्या कणांच्या व संरचनेमध्ये बदल घडवत असतात.
या सर्व सूक्ष्म जिवाणूंना योग्य प्रमाणात आर्द्रता, ऊब, खेळती हवा आणि खाद्यासाठी सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता या बाबी वाढीस अनुकूल परिस्थिती निर्माण होते. यातील कोणत्याही बाबीमध्ये बदल घडल्यास त्याचे त्यांच्या क्रियाशीलतेवर परिणाम किंवा प्रभाव पडतो. अनुकूल वातावरणामध्ये कमी काळात अनेक पटीने वाढ होते. जिवाणूंची संख्या जेवढी जास्त तेवढी मातीची श्रीमंती अधिक असे म्हटले जाते.
निरीक्षण
मातीमध्ये आपण करत असलेल्या व्यवस्थापन पद्धतीमुळे होणाऱ्या किंवा होऊ शकणाऱ्या बदलांचे निरीक्षण करणे किंवा लक्ष ठेवणे, ही बाब शाश्वततेसाठी महत्त्वाची आहे. एका मागोमाग पिके घेत जाताना आपण राबवलेल्या मशागतीसह विविध कारणांनी मातीच्या आरोग्यावर परिणाम होत असतात.
माती निरीक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. दर काही काळानंतर माती परीक्षण करण्यासोबतच प्रत्यक्ष शेतकऱ्याने मातीचे भौतिक व अन्य गुणधर्मात होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवले पाहिजे. अलीकडे मातीचे गुणधर्म सांगणारे वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स उपलब्ध होत आहेत. त्याद्वारे मातीचे तापमान, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, ऑक्सिजन पातळी, सूर्यप्रकाश आणि न्य बाबी मोजता येतात. हे सेन्सर्स डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत.
त्याच प्रमाणे इंटरनेट ऑफ थिंग्ज (एकमेकांशी जोडलेली) असू शकतात. त्यातून सातत्याने मोजली जाणारी माहिती मध्यवर्ती प्रणालीकडे पाठवली जाते. तिथे त्याचे विश्लेषण करून संभाव्य परिणामांचे अंदाज शेतकऱ्यांना पाठवले जातात. त्यानुसार त्याला सिंचनासह अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे सोपे होते.
मातीच्या रंगावरून मातीची निर्मिती कोणत्या खडकापासून झाली, हे समजते. त्यावर हवामानाचे होणारे परिणामही जाणून घेता येते. जमिनीचा उंचसखलपणा, पाण्याचा होणारा निचरा व हवामान यावर जमिनीचा रंग अवलंबून असतो. मातीच्या निरीक्षणातून व हाताच्या बोटांनी माती चाचपून देखील जमिनीचा पोत काढता येतो. ही एक साधी व उपयुक्त पद्धत आहे.
वरील प्रमाणे मातीचे मापन, निरीक्षण तसेच योग्य व्यवस्थापनाद्वारे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत तर होईलच. जमिनीचे आरोग्यही दीर्घकाळ टिकून राहील, यात शंका नाही.
व्यवस्थापन
मातीची सुपीकता वाढविण्यासोबतच ती कमी करणाऱ्या घटकांचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यवस्थापनामध्ये योग्य पद्धतींचा अवलंब करणे. यात अनेक पद्धतींचा समावेश आहे.
सेंद्रिय निविष्ठांचा वापर करणे : सातत्याने रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढवण्याची गरज आहे. त्यात शेणखत, कंपोस्ट खत, कोंबडी खत, गांडूळ खत इ. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. जमिनीची पोत व संरचना सुधारते. पाणी आणि अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता वाढते. निचराक्षमता वाढते. धूप व ऱ्हास कमी होतो. जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
शून्य मशागत तंत्र : मोठी यंत्रे उपलब्ध होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मातीची मशागत केली जाते. त्यातून होणाऱ्या अनावश्यक घुसळणीमुळे मातीचा सुपीक थर खाली जाण्याचा धोका आहे. त्याच प्रमाणे मातीचा ऱ्हास व धूपही वाढू शकते. हे टाळण्यासाठी किमान किंवा शून्य मशागत तंत्राचा अवलंब करणे गरजेचे आहे. नांगरणी, वखरणी, कुळवणी कमीत कमी करून किंवा अजिबात न करता पुढील पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे मातीचा पृष्ठभाग विस्कटला जात नाही. आधीच्या पिकाची मुळे व त्याचे सेंद्रिय पदार्थ जमिनीत तसेच राहून सावकाश कुजतात. त्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. त्यात ओलावा टिकून राहिल्याने उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते. परिणामी जमीन सुपीकतेकडे वाटचाल करू लागते.
हिरवळीचे खत : दोन हंगाम किंवा पिकांच्या दरम्यान हिरवळीच्या खतपिकांची लागवड करून ती योग्य वेळी जमिनीत गाडली जातात. उदा. ताग, धैंचा इ. त्याच प्रमाणे शेताच्या बांधावर किंवा पडीक जमिनीमध्ये शेवरी, गिरिपुष्प, सुबाभूळ यांसारख्या झाडांची वाढ केली जाते. त्याची पाने व कोवळ्या फांद्या शेतजमिनीवर टाकून त्या गाडल्या जातात. त्यामुळे पुढील पिकांना नत्र व अन्य अन्नद्रव्यांची उपलब्धता होते. जमीन आणि जिवाणूंना सेंद्रिय कर्ब उपलब्ध होते. हिरवळीची पिके जमिनीत गाडल्यानंतर जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते व त्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची संख्या व वाढ चांगली होते.
पिकांची फेरपालटीमध्ये नत्र स्थिरीकरण करणाऱ्या पिकांचा उदा. शेंगावर्गीय, कडधान्य पिकांचा समावेश करावा. त्यांचा पालापाचोळा जमिनीत पडून सेंद्रिय पदार्थांचे चक्रीकरण होते.
शेतातील पिकाचे उरलेले अवशेष न जाळता त्यांचा आच्छादन म्हणून उपयोग करावा. ते फारच मोठे असल्यास व कुजण्यास अधिक काळ लागत असल्यास श्रेडरने त्याचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावेत.
मिश्र पीक व आंतरपीक पद्धती : एकाच वेळी एकाच शेतात दोन किंवा अधिक पिके घेताना पिकांची निवड महत्त्वाची असते. दोन्ही पिके एकमेकाशी स्पर्धा न करता जमीन, पाणी आणि सूर्यप्रकाश यांचा उपयोग अधिक कार्यक्षमतेने करू शकतात. त्याच प्रमाणे एक पीक मुख्य ठेवून, दुसरे दुय्यम आंतरपीकही घेता येते. आंतरपिकाच्या ठरावीक ओळी पेरता येतात.
जैविक घटकांचा वापर : जमिनीची सुपीकता टिकविण्यात जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा मोलाचा वाटा आहे. या जैविक घटकांची प्रयोगशाळेत विशिष्ट माध्यमात वाढ करून त्यापासून बनवलेली संवर्धकांचा वापर शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. हे जिवाणू पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध करून देतात. उदा. नत्र स्थिर करणारे जिवाणू - ऱ्हायझोबिअम, ॲझेटोबॅक्टर; स्फुरद विरघळणारे जिवाणू, पालाश वहन करणारे जिवाणू, सेंद्रिय घटक कुजविणारे जिवाणू इ.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन : केवळ रासायनिक खतांवर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर द्यावा. उदा. जैविक खते, सेंद्रिय खते, पीक अवशेष, हिरवळीचे पीक, पीकपद्धती व द्विदल पिकांचा अंतर्भाव इ.
डॉ. विशाल गमे (सहायक प्राध्यापक), ९४०३९२९६१७, डॉ. बापूसाहेब भाकरे (प्राचार्य), ७५८८००५८९०
(मराठा विद्या प्रसारक समाज, कृषी महाविद्यालय, नाशिक)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.