World Soil Day 2024 : सजीव माती, तर समृद्ध शेती

December 5 : जागतिक मृदा दिवस दरवर्षी पाच डिसेंबर रोजी निरोगी मातीच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मृदा स्रोतांच्या शाश्‍वत व्यवस्थापनावर जनजागृती करण्यासाठी आयोजित केला जातो. केवळ या दिवसापुरतेच नव्हे तर सदैव सजीव मातीच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्नशील असायला हवे.
World Soil Day
World Soil DayAgrowon
Published on
Updated on

Soil Conservation : ‘पृथ्वीकडे प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरेसे आहे, परंतु प्रत्येकाच्या लोभासाठी नाही’ - महात्मा गांधी. पृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ८ अरब लोकसंख्येला ९५ टक्के अन्न उत्पादन करून देणारे माध्यम म्हणजे माती! ज्या मातीच्या एक ग्रॅम निर्मितीसाठी १००० वर्षांपेक्षा जास्त काळ लागतो त्या मातीला ‘मातीमोल’ म्हणून तिची किंमत शून्य ठरविणारे आम्ही किती कृतघ्न! मानवी शरीरावर जसे त्वचेचे आवरण आहे, तसे मातीचे पातळ आवरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे. माती पिकाच्या मुळाला आधार, अन्न आणि पाणी देते. मातीत अहोरात्र कोट्यवधी जीव शेकडो रासायनिक अभिक्रियाद्वारे मातीच्या जडणघडणीचे काम करतात. म्हणून माती ही सजीव माध्यम आहे.

कोट्यवधी सूक्ष्म जिवाणूंनी समृद्ध, पोषक अन्नद्रव्ये, हवा आणि पाणी असा सुवर्ण संगम साधलेले माध्यम माती हेच मानवी संस्कृतीच्या विकासाचे उगम स्थान आहे. म्हणून मातीला आपण ‘काळी आई’ म्हणतो. शेतीसाठी निरोगी मातीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भरघोस आणि दर्जेदार उत्पादन हवे असेल तर आपल्या शेतातील माती सुद्धा तेवढीच निरोगी आणि सुपीक हवी.

‘जागतिक मृदा दिवस’ दरवर्षी पाच डिसेंबर रोजी निरोगी मातीच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मृदा स्रोतांच्या शाश्‍वत व्यवस्थापनावर जनजागृती करण्यासाठी आयोजित केला जातो. डिसेंबर २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने पाच डिसेंबर २०१४ हा पहिला अधिकृत जागतिक मृदा दिवस म्हणून जाहीर केला. या वर्षी आपण १० वा जागतिक मृदा दिवस साजरा करत आहोत.

World Soil Day
World Soil Day : मातीमोल नव्हे, माती तर ‘अनमोल’

या वर्षीच्या उत्सवाचे घोषवाक्य आहे, ‘मातीची काळजी : मापन, निरीक्षण व व्यवस्थापन.’ मातीची वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी, मातीच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी, जागतिक अन्न सुरक्षेसाठी शाश्‍वत माती व्यवस्थापन आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी मातीची अचूक माहिती मिळवून त्याचे विश्लेषण करण्याचा हा दिवस. मुळात मातीसाठी असा दिवस साजरा करण्याची वेळ आपल्यावर का यावी, हा खरा प्रश्‍न आहे.

भारताच्या ३२८.७३ दशलक्ष हेक्टर जमिनीच्या क्षेत्रफळापैकी १२०.४० दशलक्ष हेक्टर एवढी जमीन नापीक होत चालली आहे. पाणी आणि वाऱ्यामुळे देशातील दरवर्षी ५.३ अरब टन सुपीक मातीची धूप होऊन ती नष्ट होत आहे. महाराष्ट्राच्या ३.०७ दशलक्ष हेक्टर भौगोलिक क्षेत्रफळापैकी सुमारे ४२.५० टक्के जमीन खराब आहे. राज्यातील १५९ लाख हेक्टर क्षेत्र दुष्काळाच्या छायेत येते. इतर राज्याच्या तुलनेत, ऊस वगळता, इतर सर्व पिकांची उत्पादकता कमी असून महाराष्ट्रात सुमारे १४६ लाख हेक्टर क्षेत्रफळावर माती आणि पाणी संवर्धनाची तत्काळ गरज आहे.

मातीची निर्मिती प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असून, खडकांपासून बारीक मातीचे कण निर्मितीसाठी शेकडो वर्षे लागतात. ऊन, वारा, पाऊस या निसर्गचक्राद्वारे हळूहळू अनेक प्रकारचे खडक खंडित होत होत मातीत रूपांतरित होतात. मातीचे प्रारूप चार घटकात विभाजित केले जाते. ज्या मातीत ४५ टक्के मातीचे कण, २५ टक्के पाणी, २५ टक्के हवा आणि ५ टक्के सेंद्रिय कर्ब असते ती पिकांच्या वाढीसाठी आदर्श माती समजली जाते. हे प्रमाण जर बिघडले तर मातीचे आरोग्य बिघडले असे समजावे.

World Soil Day
World Soil Day : जमीन सुपीकता वाढीसाठी प्रयत्न गरजेचे

मातीची सुपीकता आणि उत्पादकता हे मातीचे गुणवत्ता मोजण्याची दोन परिमाणे आहेत. मातीची सुपीकता म्हणजे पिकाला लागणारे सर्व अन्नघटक पुरवण्याची मातीची अंगभूत क्षमता. ही क्षमता मातीच्या निर्मिती प्रक्रियेपासून तयार झालेली असते. ती सहजासहजी बदलता येत नाही. पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी १७ अन्नघटक लागतात. यांपैकी एक अन्नघटक जरी कमी पडले तरी पिकाची वाढ व उत्पादन प्रभावित होते तर मातीची उत्पादकता ही पिकाच्या एकरी उत्पादनाशी संबंधित आहे.

मातीचे आरोग्य बिघडण्याचे प्रमुख कारण आहे पाण्याचा जास्त वापर, जमिनीची धूप, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांचा कमी वापर, एकच एक पीक वारंवार घेणे आदी. रासायनिक खतांमुळे जमीन खराब होते हे अर्धसत्य आहे. जमीन खराब होत आहे ती रासायनिक खतांच्या जास्त आणि चुकीच्या पद्धतीने वापरामुळे. मातीचे आरोग्य बिघडते ते पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे. क्षारयुक्त पाण्याचे बाष्पीभवन होऊन मातीत क्षाराचे प्रमाण वाढले आहे. माती कडक झाली, त्यात पाणी मुरत नाही, ओलावा टिकत नाही परिणामी मुळांचा विकास होत नाही, पिकांची वाढ खुंटते आणि अपेक्षित उत्पादन मिळत नाही.

मातीचे आरोग्य जपण्यासाठी व त्यात सुधारणा करण्यासाठी शेतातील काडीकचरा, गवत व पिकांच्या अवशेषांचे मूलस्थानी विघटन करून सेंद्रिय कर्ब वाढवावे लागेल. जमिनीला ही थोडा आराम द्यावा लागेल. पाणलोट क्षेत्रांचा पुनर्विकास, शेतात व पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, पिकांची फेरपालट आणि अन्नद्रव्यांचा संतुलित वापर, पाण्याचा मोजून वापर करण्याची हीच वेळ आहे.

आता खत मातीला नाही तर पिकाला, तेही पानावर, योग्य वाढीच्या अवस्थेत फवारून देण्याची गरज आहे. यासाठी इफको ने मोठे संशोधन करून नॅनो युरिया व नॅनो डीएपी ही ८७ टक्के कार्यक्षमता असलेले, पर्यावरणपूरक, वाहतूक व हाताळणीस सोपी द्रवरूप नॅनो खते विकसित केली आहेत. नॅनो खतांचा वापर मातीचे आरोग्य तर जपेलच पण देशाला ‘आत्मनिर्भर शेती, आत्मनिर्भर भारत’ बनविण्यास मोठी भूमिका बजावणार आहे.

वाढते नागरीकरण जमिनीचा अकृषक वापर वेगाने वाढवत आहे. माणसांच्या गरजा पूर्ण होताहेत पण त्यांचा हव्यास वाढतो आहे. शेतकऱ्यांच्या नव्या पिढीचा शेतीविषयी दृष्टिकोन नकारात्मक झाला आहे. त्याला कारण शेतीचे बिघडलेले अर्थकारण आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन, विश्वसनीय बाजार व्यवस्था उभी करून, शेती आणि शेतकऱ्यांना सन्मान आणि त्यांचा कष्टाला मोल मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.

यासाठी शेतातील मातीच्या नमुन्याची किमान दर तीन वर्षांनी तपासणी करून मातीच्या आरोग्य पत्रिकेच्या आधारे शास्त्रीय पद्धतीने पिकांची निवड, त्याचे पाणी आणि अन्नघटक व्यवस्थापन होणे आता अपरिहार्य आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, अत्याधुनिक हवामान मापके यांचा वापर करून ‘अचूक, काटेकोर शेती’ करावी लागेल. माती हे अत्यंत दुर्लभ पण दुर्लक्षित संसाधन आहे, ही जागरूकता भारतासारख्या शेतीप्रधान देशात निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. मातीचे संवर्धन आणि संगोपन, ही आजची खरी गरज आहे.

(लेखक ‘इफको’चे उपव्यवस्थापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com