World Soil Day : जमीन सुपीकतेतून मानवी, पशू पोषण

Soil Fertility Management : संयुक्त राष्ट्र संघाने अधिकृतरित्या ५ डिसेंबर, २०१४ पासून जागतिक मृदा दिन साजरा करणे सुरू केले. मातीची काळजी घेणे : परीक्षण, निरीक्षण आणि व्यवस्थापन करणे ही यंदाची संकल्पना आहे.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Sustainable Soil Health Management : संयुक्त राष्ट्र संघाने अधिकृतरित्या ५ डिसेंबर, २०१४ पासून जागतिक मृदा दिन साजरा करणे सुरू केले. मातीची काळजी घेणे ः परीक्षण, निरीक्षण आणि व्यवस्थापन करणे ही यंदाची संकल्पना आहे. अन्न सुरक्षा आणि पोषण, शाश्वत माती आरोग्य व्यवस्थापन करण्यासाठी माती परीक्षण, निरीक्षण माहितीचा आधार आणि महत्त्व अशी संकल्पना संयुक्त राष्ट्र संघाने मांडली आहे.

आपले ९५ टक्के अन्न जमिनीपासूनच मिळते. जमीन वातावरणापेक्षा तीन पट जास्त कार्बन धरून ठेवू शकते, त्यामुळे आगामी काळात बदलणा­ऱ्या वातावरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करू शकते. मातीमध्ये ४५ टक्के रासायनिक पदार्थ, ५ टक्के सेंद्रिय पदार्थ, २५ टक्के पाणी आणि २५ टक्के हवा हे सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहेत. या घटकांचे प्रमाण संतुलित असल्यास पीक उत्पादन वाढ आणि वाढीचे सातत्य या बाबी सहज शक्य होतील. परंतु मूलभूत घटकांचे प्रमाण असंतुलित झाले आहे.

मातीचे आरोग्य बिघडल्यामुळे पशुधन आणि मानवाचे आरोग्य बिघडत चालले आहे. पीक उत्पादनवाढीसाठी व दर्जेदार उत्पादनासाठी पिकांचे पोषण हा महत्त्वपूर्ण घटक आहे. संतुलित पीक पोषणासाठी माती हा महत्त्वाचा घटक आहे. माती ही एक सजीव संस्था आहे. यामध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्म जिवाणू, बुरशी व इतर सूक्ष्म सजीव घटक, गांडूळ यांचा अधिवास आहे. यामुळेच मातीस जैविक गुणधर्म प्राप्त झाले आहेत. मातीत सेंद्रिय पदार्थ नसल्यास, तसेच सूक्ष्मजीव व गांडुळांचा अभाव असल्यास माती ही मृतवत होते.

Agriculture
Soil Fertility : जमिनीच्या सुपीकतेचे संवर्धन

जमीन आरोग्य संकल्पना :

जमिनीच्या आरोग्याची सांगड जमिनीच्या गुणधर्माशी जोडलेली असते. उदा. सामू ६.५० ते ७.५० च्या दरम्यान, क्षारांचे प्रमाण कमी, सेंद्रिय कर्ब १ टक्क्यांपेक्षा जास्त, चुनखडीचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी, पाण्याची निचरा होणारी, क्षारयुक्त किंवा चोपण नसलेली, योग्य त्या अन्नद्रव्यांचा समतोलपणे पुरवठा करणारी, पाणी आणि हवेचे योग्य प्रमाण असणारी, भरपूर जिवाणूंनी युक्त असलेली जमीन म्हणजे चांगली आरोग्य असलेली जमीन होय. परंतु या गुणधर्माच्या जमिनीचे क्षेत्र अत्यंत कमी होत आहे. मानवी हव्यासाने जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे.

जमिनीच्या पृष्ठभागावर मातीचा एक इंच थर तयार होण्यासाठी निसर्गाला ३०० ते ५०० वर्ष कार्य करावे लागते. याच मातीवर सर्व शेती आणि शेतीवर सर्व सजीवसृष्टी अवलंबून आहे. निसर्गातील सर्व सजीवांना जगण्यासाठी पोषणाची गरज असते. पृथ्वीतलावर सूक्ष्म जीवजंतू, किटक, जनावरे, मनुष्यप्राणी, वनस्पती, इतर आणि जमीन या सजीवांचे वास्तव्य आहे. या सर्व सजीवांचे जीवन वनस्पतीवर अवलंबून आहे. कारण केवळ वनस्पतीच स्वत:चे अन्न स्वत: तयार करू शकते.

वातावरणातील सूर्यप्रकाश आणि जमिनीतील पाणी व अन्नद्रव्ये यांच्या साहाय्याने हरितद्रव्य या घटकांव्दारे वनस्पतीमध्ये अन्न तयार होण्याची प्रक्रिया घडत असते. वनस्पतींना जगण्यासाठी माती/जमीन गरजेची असते. वनस्पतीद्वारे तयार अन्नावरच जनावरे, मानवप्राणी, सूक्ष्मजीव व जमीन यांचे पोषण घडत असते, परंतु जमिनीच्या बाबतीत आपण दुर्लक्ष करत आहोत त्यामुळे जमिनी सध्या कुपोषित झाल्या आहेत, याच कुपोषित मातीला संतुलित पोषणाची गरज आहे.

भारतातील जमिनीत अन्नद्रव्यांच्या कमतरता जमिनीचे आरोग्य बिघडले आहे असे दर्शवितात, केवळ आरोग्यच नाही तर जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचा एकूण साठा, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अधिक पीक उत्पादन घेण्यासाठी मर्यादा याबाबत देखील अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सध्या भारतात प्रतिवर्षी प्रति हेक्टरी १६ किलो नत्र, ११ किलो स्फुरद आणि ४२ किलो पालाश असे एकूण ६९ किलो तीन मुख्य अन्न अतिरिक्त प्रमाणात उपसा होतात. त्यामुळे अन्नद्रव्यांच्या कमतरता हा एक गंभीर स्वरूपाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Agriculture
Soil Management : पाणी, मृदा व्यवस्थापनात शेतकऱ्यांना अधिक सक्षम करावे

पालाशचे प्रमाण जास्त आहे कारण पिके पालाश नत्राच्या दीडपट प्रमाणात शोषण करतात, परंतु वापर हा नत्र अन्नद्रव्यापेक्षा खूप कमी आहे. अशाप्रकारे पिकांची अन्नद्रव्यांची गरज आणि संबंधित अन्नद्रव्यांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे केवळ एकाच स्त्रोताचा वापर पुरेसा ठरणार नाही त्याकरिता अनेकविध अन्नद्रव्यांच्या स्त्रोतांचा वापर करणे उदा. हिरवळीचे खते, विविध सेंद्रिय खते, जिवाणू खते, रासायनिक खते, पिकांचे अवशेष इत्यादी आवश्यक ठरते. सध्या जमिनीच्या बाबतीत जमिनीच्या सुपीकता पातळीत घट, जमिनीचे आरोग्य खालावले आहे, मातीचे प्रदूषण वाढत आहे.

शाश्वत जमिनीसाठी उपाययोजना :

शेतकरी, शेतमजूर, ग्राम विस्तारक, खते, कीडनाशक विक्रेते यांना जमिनीचे आरोग्य टिकविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठात प्रशिक्षण देण्याची सोय असावी.

शेतावर प्रात्यक्षिके आयोजित करुन भू-सुधार आणि भू-संरक्षण कार्यक्रम हाती घ्यावा.

बिगरशेती परवाना देताना सुपीक जमिनी अकृषक होणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यासाठी मृदशास्त्रज्ञ प्रमाणपत्र मिळण्याची अट असावी.

उथळ आणि ओसाड जमिनीत वनशेती, गवत शेतीची शिफारस केली आहे.

भारी, काळ्या चिकण मातीच्या जमिनीत रुंद वाफे व सरी पद्धतीचा अवलंब करावा. याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे.

पाण्याचा अवाजवी व अतिरेकी वापर टाळण्यासाठी ठिबक,तुषार सिंचनास व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जमीन आणि पिकानुसार ओलीत व्यवस्थापनाच्या आधुनिक तंत्राचा वापर करावा.

जमिनीच्या क्षमतेनुसार निरनिराळ्या पीक पद्धतीचा वापर व्हावा. जमीन क्षमतेनुसार पिके निवडल्यास उत्पादकता वाढेल.

जमिनीची बांध बंदिस्त करुन पावसाच्या पाण्याचे नियोजन करावे. पाणी अडवा - पाणी जिरवा यावर भर द्यावा लागेल. त्यासाठी बंधारे , शेततळे, गावतळे, नाला बंदिस्त, कंटूरबांध ही कामे करावी. कोरडवाहू क्षेत्रात प्रभावी व एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवावा. पाण्यासोबतच माती व सेंद्रिय घटकांचे संवर्धन करावे.

जमिनीच्या उत्पादकतेसाठी एकात्मिक अन्नद्रव्ये पोषण पद्धतीचा अवलंब करावा.

आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय अहवालामधील निष्कर्ष :

जागतिक पातळीवर ३३ टक्के मातीचे आरोग्य खालावले आहे.

आफ्रिका खंडातील १६ टक्के जमिनीतील मातीचा दर्जा खालावला आहे.

युरोपमध्ये विस्तारत असणाऱ्या शहरांच्या पायाभरणीत दर तासाला ११ हेक्टर माती गाडली जात आहे.

जागतिक स्तरावर दर मिनिटाला २३ हेक्टर जमिनीचा अनेकविध कारणांमुळे ऱ्हास होत आहे. यामुळे २० दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनामध्ये दरवर्षी नुकसान होते.

२०११ मध्ये अन्न व कृषी संघटनेने जमिनीच्या बाबतीत भारत देशात ४२ टक्के लागवडीखालील जमीन क्षेत्र नापीक झाल्याबद्दल नमूद केले आहे.

तज्ज्ञांच्या मते आपल्याला केवळ ६० वर्षे पुरेल इतकीच माती पृष्ठभागावर शिल्लक आहे.

एकूण अन्नांपैकी एक तृतीयांश अन्न वाया जाते. या वाया जाणाऱ्या अन्नातून जो कचरा निर्माण होतो त्यातील निम्म्याहून अधिक कचऱ्याचे मातीत मिसळून विघटन केले, तर मातीचे भरण-पोषण करता येईल.

मातीमध्ये मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय पदार्थाचा वापर करून माती जिवंत करणे आवश्यक आहे.

पर्यावरण मंत्रालयाच्या अहवालानुसार जमिनीचा ऱ्हास व दुष्काळामुळे राष्ट्रीय सकल उत्पादनात २.५४ टक्के घट होत आहे.

हैद्राबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्थेच्या अहवालानुसार देशात अन्नपदार्थातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होत आहे. यासाठी जमिनीतील पोषक अन्नद्रव्यांच्या कमतरता हे कारण आहे.

अन्न व कृषी संघटनेच्या आकडेवारीनुसार जागतिक लोकसंख्येला पुरेसे अन्न मिळण्यासाठी दरवर्षी ६० लाख हेक्टर नवीन जमीन शेत लागवडीखाली आणावी लागेल. त्यामुळे पुरेसे व दर्जेदार अन्न निर्मिती मुख्य आव्हान असणार आहे. यासाठी मातीची सुपीकता जपणे गरजेचे आहे.

आंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान संघटनेमार्फत२०१५-२०२४ हे दशक मृदा आरोग्य दशक म्हणून घोषित केले आहे.

राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षण (२०१५-१६) नुसार पाच वर्षाखालील ३८.४ टक्के मुलांची वाढ खुंटलेली आहे. देशातील अर्धी मुले कुपोषणाच्या छायेत आहेत.

मागील पन्नास वर्षांत सुमारे १० दशलक्ष टन नत्र, स्फुरद, पालाश प्रति वर्षी जमिनीतून जास्त उपसा झाला आहे. त्याची भरपाई होणे बाकी आहे यामुळेच जमिनीची अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात पिकांना पुरविण्याची क्षमता (जमिनीची सुपीकता) कमी झालेली आहे.

कृषी व्यवसायातील उपपदार्थ यांचे खतामध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे. यासोबतच विशिष्ट भू सुधारकांचा वापर करून जमिनीचा ­ऱ्हास थांबविणे आवश्यक आहे.

खतांचा व सिंचनाचा कार्यक्षम वापर करून माती संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे.

- डॉ. हरिहर कौसडीकर, ७५८८०८२०४९

(संचालक (शिक्षण व संशोधन), महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद,पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com