90-Hour Work Week Controversy : इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर आता
लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) कंपनीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यम यांनी त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, त्यांनी आठवड्यातून ९० तास काम करावे, रविवारीही काम करायला हवे.
“घरी राहून तुम्ही किती वेळ बायकोकडे बघत राहणार? घरी कमी वेळ आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवा,” असं विधान त्यांनी केलं होतं. तर या सुब्रमण्यम यांना खडा सवाल आहे की, “तुमचे कामगार/ कर्मचारी फक्त ९० तासच कशाला कंपनीच्या कारखान्यात आणि ऑफिसेसमध्ये कपडे घेऊन राहायला यायला देखील तयार आहेत.
पैसे किती देणार ते सांगा. ठरलेल्या ८ तासाच्या पेक्षा पुढच्या ८ तासाला किमान दुप्पट आणि नंतरच्या प्रत्येक तासाला तिप्पट वेतन देता का ?” कामाच्या तासाबद्दल बोलणारे नारायणमूर्ती (अनेकवचनी), सुब्रमण्यम (अनेकवचनी) मोबदल्याबद्दल चकार शब्द काढणार नाहीत.
सुब्रमण्यम महाशयांनी २०२३-२४ या वर्षात कंपनीकडून एकूण ५१ कोटी रुपये पगार घेतला. ते रविवारी काम करतात, ते दर दिवशी १२ तास काम करतात, ते ३६५ दिवस असे काम करतात असे समजू. म्हणजे वर्षाला झाले ४३६८ तास. म्हणजे त्यांना तासाला १,१६,००० रुपये म्हणजे मिनिटाला २००० रुपये मोबदला मिळतो.
देशातील वेतन पातळी लक्षात घेतली तर सुब्रमण्यम यांना प्रत्येक दिवसाच्या श्रमाला मिळणारा मोबदला त्यांच्याच कंपनीतील कुशल कामगाराच्या श्रमापेक्षा शेकडो किंवा हजार पटीने जास्त असेल. अर्थव्यवस्थेत प्रत्येकाचे श्रम महत्त्वाचे असतात. कोणाच्या श्रमाला किती मोल मिळणार हे कोण ठरवते? किती पटीत? याला काय आधार आहे? त्याचे काही निकष असावेत की नाही? त्याबद्दल हे नारायणमूर्ती, सुब्रमण्यम आदी मंडळी चकार शब्द काढणार नाहीत.
असे सुब्रमण्यम किंवा नारायणमूर्ती हजारो आहेत. ते स्वतः आयुष्यभर श्रम विकणारी आणि त्या बदल्यात बढत्या / पैसै मिळवणारी मशिन्स आहेत. यांना दुसरे आयुष्य नाही. “मानवी आयुष्य एवढे सुंदर आहे. ही पृथ्वी एवढी सुंदर आहे.
आपण नक्की काय केले आयुष्यभर?” असे अंतर्मुख करणारे विचार देखील त्यांच्या म्हातारपणात त्यांना शिवणार नाहीत; एवढी त्यांची मने / मेंदू बधिर केली आहेत सिस्टिमने. त्यांच्या पदव्या, इंग्रजीवरील प्रभुत्व, शेकडो कोटी रुपयांची संपत्ती याचे दडपण बाळगू नका. शाळेत न गेलेल्या आपल्या आज्या यांच्यापेक्षा हजार पटींनी शहाण्या होत्या, आहेत.
या मंडळींकडे सुट्या व्यक्ती म्हणून पाहू नका. ते आहेत औद्योगिक / वित्त भांडवलशाहीचे ‘फूट सोल्जर्स.' ते इथपासून वॉल स्ट्रीटपर्यंत पेरलेले आहेत. मुख्य म्हणजे ते आपल्याच म्हणजे गरीब / निम्न / मध्यमवर्गीयातून ‘नर्चर' केले गेले आहेत. उदाहरणार्थ ६४ वर्षाचे सुब्रमण्यम तामिळनाडूतील मध्यमवर्गीय घरातून आले आहेत.
रिजनल इंजिनियरिंग कॉलेज, कुरुक्षेत्र मधून अभियांत्रिकीची पदवी मिळून त्यांनी सिम्बॉयसिस, पुणे मधून एम.बी.ए. केलं. त्यांच्या सारखे प्रोफाईल असणारे अक्षरशः हजारो तरुण आपल्या आजुबाजुला, आपल्या घरात, नातेवाईकांत, मित्रांच्या कुटुंबांत आपल्याला माहीत आहेत. सिस्टिमने अशा ‘फूट सोल्जर्स'ची मोठी पाइपलाइन तयार केली आहे.
त्यांच्यासाठी सुब्रमण्यम ‘रोल मॉडेल' आहेत. हेच तरुण प्रोफेशनल्स “येस सर” म्हणून खरेच ९० तास काम करतील आणि स्वतः सुब्रमण्यमच्या जागी बसण्याची स्वप्नं बघतील. आणि त्या जागेवर आल्यावर सुब्रमण्यम सारखेच फतवे काढतील. आपण अदानी / अंबानी / दलाल स्ट्रीट यांची नावे घेतो. पण त्यांच्यापाशी एवढे सामर्थ्य येते कोठून यावर कमी चर्चा करतो.
नारायणमूर्ती / सुब्रमण्यम अपवाद नाहीत. देशातील मोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापकांच्या हृदयातील इच्छा ही मंडळी बोलून दाखवत आहेत. हे प्रकरण गंभीर आहे. हे बोलणाऱ्या व्यक्ती दुय्यम आहेत. संघटित क्षेत्रातील कामगार संघटना आधी बदनाम केल्या गेल्या, मग कमकुवत केल्या गेल्या. आणि आता कामगार संहिता (लेबर कोड) रस्त्याच्या पुढच्या वळणावरून चाल करून येताना दिसत आहे.
देशात जागतिक भांडवल मोठ्या प्रमाणावर येऊ घातले आहे. त्यासाठी असाच कामगार वर्ग असणे ही पूर्वअट आहे. कंपनीच्या गेटबाहेर बेरोजगार आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांसाठी आसुसलेल्या कुशल कामगार / इंजिनिअर्सची मोठी रांग उभी आहे, हे त्यांना माहीत आहे. त्याच्या जोडीला वर्गाच्या पलीकडे जातीय, धार्मिक अस्मितांना धार लावण्याचा उद्योग सुरूच आहे.
हे सगळे ठिपके एकत्रित जोडून बघा. मूर्ती/ सुब्रमण्यम यांच्यावर कमी घसरा. ते खडे मारून बघत आहेत. त्यांच्याकडे सुटी व्यक्ती म्हणून कृपया बघू नका; सिस्टीमचे प्रवक्ते म्हणून बघा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.