Sustainable Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Sustainable Agriculture : शाश्‍वत शेतीला हवी जैविक घटकांची जोड

Article by Satish Khade : शाश्‍वत शेती म्हणजे काय तर शेतीमधून उत्पादन काढत राहिल्यानंतर तिची उत्पादकता नैसर्गिक व पर्यावरणीय नियमांनी कायम टिकवून ठेवणे.

Team Agrowon

सतीश खाडे

Addition of Biological Components : शाश्‍वत शेती म्हणजे काय तर शेतीमधून उत्पादन काढत राहिल्यानंतर तिची उत्पादकता नैसर्गिक व पर्यावरणीय नियमांनी कायम टिकवून ठेवणे. हे शक्य आहे का ? तर, होय हे शक्य आहे. मानवाने शेती करण्याची सुरुवातच मुळात नैसर्गिक शेती पद्धतीद्वारे केली. पुढे त्याला शेण, गोमूत्र यापासून खत मिळते हे समजल्यावर सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली.

ती अनेक शतके केली. गेल्या शतकात शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर सुरू झाला. तसेच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बॉम्ब व दारूगोळा बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात रसायनांची निर्मिती झाली. युद्ध संपल्यानंतर त्यांचा खूप मोठा साठा शिल्लक होता. त्यातून कीडनाशके, तणनाशके यांची निर्मिती झाली.

या सर्व रसायनांचे सुरुवातीच्या काळात उत्तम परिणाम दिसून आले. पण त्यांच्या वापराबाबतचे अपुरे ज्ञान आणि त्याचे दुष्परिणाम या बाबत पुरेशी माहिती नसल्याने आजची ही परिस्थिती ओढवली आहे. त्यावर शेतीमध्ये जैविक खते, कीडनाशकांचा वापर शेती अधिक शाश्‍वत करता येईल.

जिवामृत व्यवसायाची चळवळ

जैविक खते, जैविक कीडनाशके यांचा वापर अनेक ठिकाणी सुरू आहे. कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्याबरोबरच राज्यातील काही साखर कारखाने, कृषी महाविद्यालये, विविध बचत गट, विविध स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक उत्पादकांनी त्याच्या उत्पादनाचा प्रसार व वापर सुरू केला आहे.

असे असले तरी एकूण शेतीचे क्षेत्र व शेतकऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत यांचा वापर अजून बराच कमी आहे. जैविक खते आणि जैविक कीडनाशके यांचा वापर ही महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची चळवळ बनणे गरजेचे आहे.

यात जिवामृत व तत्सम खते बनवणे, त्यांचा खप वाढवणे, उपलब्धता वाढवणे, त्यांच्या वापराने शेतकऱ्याला होणाऱ्या आर्थिक फायद्यासह त्यांची निर्मिती करणाऱ्याला होणाऱ्या फायद्यांबाबतची माहिती सर्वांसमोर मांडणे व जिवामृताची बाजारपेठ तयार होणे ही ती चळवळ.

यामुळे रासायनिक अवशेषमुक्त अन्नाबरोबरच शेतकरी व पशुपालक या दोघांच्याही अर्थकारणात चांगलीच भर पडेल. दुग्ध उत्पादनासारखाच जिवामृत उत्पादनाचा ही मोठा व्यवसाय उभी राहण्याची ताकत या चळवळीने साध्य होईल.

यामुळे अगदी भाकड जनावरे ही उत्पादक संसाधने होतील. एका गायीपासून दिवसाला एक लिटर गोमूत्र व दहा किलो शेण मिळते. एक लिटर गोमूत्र व दहा किलो शेणापासून सातव्या दिवशी शंभर लिटर जिवामृत तयार करता येते.

आजच्या बाजारभावाने विचार केल्यास, २० रुपये लिटर दराने दोन हजार रुपयांच्या जिवामृताची निर्मिती होऊ शकते. हेच उत्पन्न भाकड जनावरांपासूनही मिळवता येते. जिवामृताचा वापर वाढवून रसायनमुक्त शेतीचे नियोजन केले तर दुहेरी फायदा होईल. दुग्ध व्यवसायिकांना दुधापासून मिळणाऱ्या उत्पनांइतकेच उत्पन्न जिवामृतातून मिळेल.

शाश्‍वत शेती व्हावा राष्ट्रीय कार्यक्रम

रसायन विरहित शेती ही देशातील तसेच जगातील देखील अति प्राथमिकता असणारी चळवळ असायला हवी. यासाठी राज्याचे आणि देशाचे कृषी खाते, कृषी विद्यापीठांसहित सर्व विद्यापीठे, पेयजल संबंधित सर्व शासकीय विभाग, ग्रामविकास विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न व भेसळ प्रतिबंध विभाग, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, सर्व कृषी निविष्ठा उत्पादक व स्थानिक विक्रेते या सर्वांचे योगदान आवश्यक आहे.

प्रबोधन कायदे, कायद्यांची कडक अंमलबजावणी, रसायनमुक्त पीक उत्पादनासाठी प्रोत्साहन, त्यासाठी उत्तम विपणनाचे नियोजन या सर्व बाबींची अमंलबजावणी कार्यक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. पाणीटंचाई सबंधित मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था बरोबरच इतर अनेक स्वयंसेवी संस्था ही या चळवळीत सक्रिय होणे खूप अगत्याचे आहे.

उत्पन्न की निरोगी आयुष्य

कृत्रिम रसायनमुक्त शेतीपासून उत्पन्न कमी मिळते ही चर्चा ऐकायला मिळते. हे तितकेसे सत्य नाही. कारण सेंद्रिय शेती किंवा जैविक रसायने वापरून यशस्वी झालेल्या अनेक यशोगाथा आपल्या ‘ॲग्रोवन’मध्येच कितीतरी वेळा झळकत असतात. तसेच अधिक प्रयोग, अधिक अभ्यास अधिक सखोल ज्ञान यातून उत्पन्न वाढीबाबत काम चालूच राहील. त्यातून ही जाणकार लोकांच्या मते गंभीर आजार आणि अनारोग्यापेक्षा थोडे उत्पन्न कमी आले तरी चालेल.

जैविक वा पर्यावरणीय पद्धतीने कीड नियंत्रणाची उदाहरणे

अ) कापसाच्या बोंडावर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. अशा अनेक उपद्रवी कीटकांना रानमुंग्या (मुंगळे) खाऊन टाकतात. इतर उपद्रवी कीटकांचे जैविक नियंत्रण करण्यासाठी रानमुंग्यांचा उपयोग करून घेता येतो. यातून रानमुंग्यांचाही उपद्रव वाढला तर त्यांचे जैविक रसायनांनी नियंत्रण करणे शक्य असते.

ब) स्पेनमधील कीडनाशके

आपण ‘रासायनिक कीटकनाशके’ विकत आणून त्यांची फवारणी करतो. याउलट स्पेनमध्ये चक्क ‘मित्रकीटक’ विकत आणून त्यांचे प्रसारण केले जाते.

प्रत्येक किडीसाठी वेगवेगळे कीटकनाशक आपण वापरतो. त्यात आंतरप्रवाही, स्पर्शजन्य, पोटविष असे प्रकार असतात. स्पेनमध्ये थ्रीप्स, पांढरी माशी, तुडतुडे, मिलिबग, अळी अशा प्रत्येकासाठी वेगवेगळे मित्रकीटक, मित्रकोळी (प्रिडेटर माइट), मित्रसूत्रकृमी असे तब्बल २० ते २५ हून विविध पर्याय उपलब्ध आहेत. छोटे सॅशे, बॉटल, बॉक्स स्वरूपात प्रौढ व पिले या स्वरूपात मित्रकीटक उपलब्ध आहेत.

मित्रकीटकांचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन करणाऱ्या कंपन्या स्पेनमध्ये आहेत. त्यांचे संशोधन आणि विकास विभाग देखील आहेत. तिथे किडींच्या नव्या समस्या व नव्या मित्रकीटकांवर सतत संशोधन सुरू असते.

वेगवेगळ्या पिकांत त्यांचा वापर एकरी किती व कसा करायचा, या बाबतच्या शास्त्रीय चाचण्या घेतल्या जातात. त्यामुळेच त्यांचे परिणाम प्रभावी मिळतात.

या कंपन्याकडूनच शेतकऱ्यांना मित्रकीटक वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

स्पेनमध्ये ‘मित्रकीटक जास्त आणि किडी कमी’ असे चित्र पाहायला मिळते. तर आपल्याकडे या उलट चित्र पाहायला मिळते.

स्पेनचे शेतकरी मित्रकीटकांच्या वापराबाबत केवळ पिकापुरता विचार न करता भोवतालच्या निसर्गाबाबतही जागरूक आहेत. तेथील शेतकरी शेताच्या कडेला मित्रकीटकांसाठी झाडे लावून ते त्यांचे संवर्धन करतात.

आफ्रिकेतील काही शेतकरी फळांचे फळमाशीच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी रानमुंग्यांचा (मुंगळे) वापर करतात. या रानमुंग्या फळामाशीवर हल्ला करून तिला खातात. यासाठी फळबागांमध्ये या रानमुंग्या पाळल्या जातात. त्यांना या झाडावरून त्या झाडावर जाण्यासाठी झाडांना दोऱ्याही बांधलेल्या असतात.

काही आशियन देशांमध्ये भात शेतीतील कीटक नियंत्रणासाठी बेडकांचा वापर केला जातो. तसेच सरड्यांचाही बऱ्याच वेळा कीटक नियंत्रणासाठी वापर होतो.

जैविक कीटकनाशकांचे फायदे 

नैसर्गिक घटकांपासून बनवत असल्याने किडींव्यतिरिक्त इतर जीवांसाठी विषारी ठरत नाही. रासायनिक कीटकनाशकांमुळे होणारी हानी थांबते.

रासायनिक कीटकनाशकांमुळे शत्रू किडींबरोबरच उपयुक्त मित्रकिडी देखील नाश पावतात. त्यामुळे त्या जागेतील परिसंस्था, पर्यावरण आणि पिके या सर्वांचेच नुकसान होते. जैविक कीटकनाशकांमुळे ही परिस्थिती ओढवत नाही.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रासायनिक कीटकनाशकांमध्ये मर्यादित रसायनांचे रेणू असतात. एकदा या रसायनांचा वापर केल्यानंतर किडीमध्ये त्या विशिष्ट रसानाविषयी प्रतिकारकता तयार होते. आणि किडीच्या पुढील पिढीमध्ये ते बदल घडून येतात. त्यामुळे पुढे त्या संबंधिक कीडनाशकांचा वापर करूनही कीड नियंत्रण प्रभावी होत नाही.

आणि पुन्हा नव्याने कीडनाशकांच्या वाढीव मात्रा वापराव्या लागतात. या उलट जैविक कीडनाशकांत अनेक प्रकारची रसायने असतात. त्यांच्या पुढे टिकाव धरण्यासाठी किडींच्या पुढच्या पिढ्यांच्या गुणसूत्रातील हवे असलेले बदल खूप गुंतागुंतीचे असल्याने अशक्य होतात. त्यामुळे जैविक कीडनाशकांना प्रतिकार करणारी किडींची पुढची पिढी निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे जैविक कीडनाशक कायमच प्रभावी ठरते.

सतीश खाडे, ९८२३०३०२१८

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT