Climate Change : हवामान बदलांच्या परिणामाबद्दल जागरूक राहा

Weather Update : हवामान तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार २०५० पर्यंत तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होईल. तसेच पर्जन्यवृष्टी अधिक जोरदार होईल, परंतु पाऊस पडण्याची दिवस कमी असतील.
Climate Change
Climate ChangeAgrowon

Weather : यंदा अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी तर काही भागात गारपीट, अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. यावर काही काळ चर्चा चालू राहील. पुढे पाऊसमान योग्य झाले तर लोक हे सर्व विसरून जातील.

शास्त्रीय जगतात याबाबत काय चालले आहे या विषयावर मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या अधिवेशनात वि. भ. भिसे यांनी अध्यक्षीय भाषणातून विवेचन केले आहे. या प्रश्‍नांची तीव्रता पुढे जगभर वाढत जाणार आहे. याबाबत वि. भ. भिसे यांनी अभ्यासपूर्वक विचार मांडले आहेत.

जागतिक पातळीवरील चर्चा :
जागतिक तापमान वाढीबाबत विचारमंथन चालू असले, तरी हा विषय गेल्या शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ हाताळला जात आहे. स्वीडनमधील स्वांत अर्हेंसिअस या शास्त्रज्ञाने १८९६ मध्ये भावी काळातील जागतिक तापमान संकटावर पहिल्यांदा संशोधनातून मत मांडले होते. त्यांनी मांडलेले निष्कर्ष सध्याच्या परिस्थितीशी बरेच मिळते जुळते आहेत. रोगोर रिव्हेली यांनी १९५० च्या दरम्यान कार्बनच्या थराचे व्यवस्थित मोजमाप केले आणि तापमानवाढीबाबत जागरूक केले होते.

हवामान बदल म्हणजे तापमान वाढ असा सर्वत्र समज आहे. तापमान वाढीचा मुद्दा १९९० च्या दरम्यान आंतरराष्ट्रीय पर्यावरण धोरणाच्या केंद्रस्थानी आला. या मुद्द्याचे आंतरराष्ट्रीय धोरण आणि महत्त्व लक्षात घेऊन २००७ मधील नोबेल शांती पुरस्कार अमेरिकेचे भूतपूर्व उपाध्यक्ष अल गोर आणि भारतातील शास्त्रज्ञ राजेंद्र पचौरी यांना देण्यात आला.

सध्या हरित वायूचे उत्सर्जन कमी करण्यासंदर्भात जागतिक पातळीवर विचार विनिमय होत आहे. तापमान वाढ ही प्रामुख्याने विकसित देशाने निर्माण केलेली समस्या असून, त्यातून गरीब देशांची असुरक्षितता वाढणार अशी भावना सर्वत्र आहे. विकसित देश आपला विकास दर कमी होण्याच्या भीतीने हरित वायू उत्सर्जन कमी करण्याबाबत बोलत नाहीत. त्याचवेळी भारत आणि चीन यासारख्या देशाकडून ठोस आश्‍वासन आणि कृतीची अपेक्षा ठेवून आहेत. गरीब देशांना यातून मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार हे सत्य नाकारता येत नाही. भारतासारख्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या कृषीवर अवलंबून असणाऱ्या देशात हवामान साक्षरता हा विषय महत्त्वाचा आहे.

Climate Change
Cold Weather Update : उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम

हवामान बदलाचे परिणाम :

सूर्याची किरणे जमिनीवर पडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर परावर्तित होतात. उरलेली किरणे जमिनीमध्ये शोषली जातात आणि पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. असे दिवसभर चालू राहते. विशिष्ट वायूमुळे उष्णता उत्सर्जन होण्याला प्रतिबंध होतो. या प्रक्रियेला हरितगृह परिणाम (ग्रीन हाउस इफेक्ट) म्हणतात. यामुळे पृथ्वी भोवतालचे वातावरण तापते. काही वायू ही उष्णता शोषून घेतात, त्यांना हरितगृह वायू असे म्हणतात.

काही वायू जे निसर्गात अस्तित्वात असतात ते म्हणजे कर्बवायू आणि कमी प्रमाणात असणारा मिथेन वायू. याचाच अर्थ असा, की हरितगृह परिणाम अस्तित्वात नसता तर पृथ्वीचे तापमान आजच्यापेक्षा ३० अंश सेल्सिअसने कमी राहिले असते. म्हणजेच पृथ्वीवर जीवन जवळपास अशक्य झाले असते. हा संदर्भ आपल्यासाठी नवीन आहे. यातून सातत्याने पृथ्वीच्या तापमानात सतत होणारी वाढ यालाच हवामान बदल असे म्हणतात. ही तापमान वाढ ज्या सहा हरितगृह वायूमुळे होते त्यांचे वातावरणातील आयुष्य काहींचे १० वर्षे तर काहींचे १५० वर्षे असते. म्हणूनच त्यांचे वातावरणातील थर वाढत जातात आणि तापमान वाढते.

१) तापमानवाढीस साधारण औद्योगिक क्रांतीपासून (१७५०)
सुरुवात झाली. १९९० काळात अमेरिका, चीन, रशिया आणि जपान नंतर पाचवा क्रमांक भारताचा लागतो. नवीन आकडेवारीनुसार भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु दरडोई कर्बवायूच्या उत्सर्जनात विकसित देश भारताच्या खूप पुढे आहेत.

२) मागील काही वर्षांत हरितगृह वायूंचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले आहे. तापमान वाढीची समस्या निर्माण होण्यास विकसित देश सर्वाधिक जबाबदार आहेत. परंतु त्याचे प्रतिकूल परिणाम मोठी लोकसंख्या तसेच दारिद्र्य असलेल्या आणि या परिणामावर उपाय करण्याची क्रयशक्ती कमी अगर नसणाऱ्या देशांना भोगावे लागत आहेत.

Climate Change
Climate Change : हवामान बदल परिषद की तेल कंपन्यांचा खेळ

३) हवामान बदलासंबंधी अंदाज देणाऱ्या पहिल्या कार्य गटाचा अहवाल २००७ मध्ये जाहीर झाला. औद्योगिक क्रांतीपासून वातावरणातील कर्बवायू, मिथेन, नायट्रस ऑक्साइड यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. पुढील दोन दशकांत तीन अंश सेल्सिअस इतकी तापमान वाढ होईल असा अंदाज आहे. हवामान बदलाला पूर्वी लाखो वर्षे लागली, ते बदल काही दशकात घडून येत आहेत. मागील १०० वर्षांत ही वाढ तीन अंश सेल्सिअसने वाढले. पुढे हेच तापमान वाढणार आहे.

४) पृथ्वीतलावरील कर्बवायूचा सर्वांत जास्त साठा समुद्राचा तळ वगळता जमीन हा आहे. जमिनीमध्ये हवेच्या तिप्पट कर्बाची साठवणूक होती. जंगले तोडून जमिनी शेतीखाली आणण्याच्या कामात जमिनीतील कर्ब हवेत निघून गेला. हा संदर्भ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे.

५) साधारणपणे २०५० पर्यंत २.१ ते २.९ अंश सेल्सिअस आणि २०८०पर्यंत ३.३ ते ४.३ अंश सेल्सिअसने तापमान वाढेल. याच काळात सरासरी पर्जन्यवाढ १ ते ३ टक्क्यांपासून ४ ते १० टक्क्यांपर्यंत राहील. असे बदल संपूर्ण भारतात एकसारखे असणार नाहीत. पुणे येथील उष्णकटिबंधातील हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेच्या अभ्यासानुसार २०५० पर्यंत तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढेल तर पर्जन्यवृष्टी अधिक जोरदार होईल, परंतु पाऊस पडण्याचे दिवस कमी असतील. मॉन्सूनची सुरुवात आणि प्रगतीची रचना बदलेल. क्रियाशील काळ आणि खंड यात बदल होतील. या बदलाचे परिणाम शेतीवर होणार आहेत.

६) हवेतील वाढत्या कर्बवायूचा परिणाम गहू, मका, सोयाबीन, ज्वारी पिकावर होईल. अधिक तापमान आणि पर्जन्यामुळे अन्नधान्य पिकाचे उत्पादन वाढेल, परंतु कमी पावसाच्या प्रदेशात मात्र दर हेक्टरी उत्पादन कमी होईल. आशिया खंडातील भात पिकाच्या अभ्यासात एक अंश सेल्सिअस तापमान वाढीमुळे उत्पादनात ७.४ टक्के घट होईल असे दिसून आले. भात पिकाच्या नुकसानीपैकी ८२.४ टक्के नुकसान केवळ चक्रीवादळ, पूर आणि दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीमुळे होते. तापमानवाढीचा प्रतिकूल परिणाम होतो. मात्र पर्जन्यवृष्टीतील वाढ फायदेशीर असते असे दिसून आले.

७) उत्तर-पश्‍चिम भारतातील गहू आणि भात पिकाच्या संदर्भातील अभ्यासातून दोन अंश सेल्सिअस तापमान वाढ आणि कार्बनचे प्रमाण दुप्पट झाले तर भात पिकाच्या हेक्टरी उत्पादनात फारसा बदल होत नाही. म्हणजेच तापमान वाढीचा प्रतिकूल परिणाम हा कार्बनचा भात पिकाच्या वाढीवर होणारा घन परिणाम भरून काढतो. मात्र पीकवाढीच्या काळात पाण्याची कमतरता भासली तर जवळपास २० टक्के घट येऊ शकते. गहू पिकाच्या संदर्भात तापमानात तीन अंश सेल्सिअस वाढ झाली आणि कार्बनचे प्रमाण दुप्पट झाले तर त्याचा पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत नाही. याच शास्त्रज्ञांच्या मध्य प्रदेशातील सोयाबीन पिकाच्या अभ्यासात तीन अंश सेल्सिअस तापमान वाढ, कार्बनचे प्रमाण दुप्पट आणि दैनिक पर्जन्यात १० टक्के घट झाली असता सोयाबीनच्या दर हेक्टरी उत्पादनात जास्तीत जास्त चार टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते.

८) वरील काही प्रयोगात जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा हवामान बदलावर मात करू शकणारा मुख्य घटक असल्याचे दिसून येते. आम्हाला एसआरटी तंत्र अगर शून्य मशागत तंत्रातून मिळणारे यश हे सेंद्रिय कर्ब वाढीचा परिणाम असल्याची जाणवते. गेली १५ ते २० वर्षांच्या उत्पादनवाढीला दुजोरा देणारे हे संदर्भ आहेत.

संपर्क : प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८
(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com