Sangli News : जिल्ह्यात उन्हाळ्यात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ५९ कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे. जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून असा दोन टप्प्यांचा हा आराखडा असून, यामध्ये ३८३ गावे टंचाईच्या उंबरठ्यावर असल्याचा अंदाज असून, त्यांना टंचाई काळात टँकरद्वारे, तसेच विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
प्रशासनातर्फे प्रतिवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता गृहीत धरून टंचाई आराखडा तयार केला जातो. त्यानुसार यंदाचा आराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हा आराखडा तयार केला आहे.
सन २०२३ च्या पावसाळ्यात ३२ टक्के पाऊस कमी झाला होता. त्यामुळे डिसेंबर-२३ पासूनच जतमध्ये टंचाईची स्थिती निर्माण झाली होती. त्याची तीव्रता वाढत जाऊन गत वर्षी एप्रिल-मेमध्ये १०० हून अधिक टँकरने जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगाव या तालुक्यांत पाणीपुरवठा करावा लागला होता. विशेषतः जत आणि आटपाडी तालुक्यात टंचाईची तीव्रता अधिक होती.
गत वर्षी सरासरीहून अधिक पाऊस
गत वर्षी जूनमध्ये टंचाईची तीव्रता वाढली होती. मात्र, त्यानंतरच्या पावसाळ्यात वरुणराजाने कृपा केली. त्यामुळे गत वर्षी जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत समाधानकारक पावसाची नोंद झाली. सरासरीहून अधिक पाऊस झाला. जिल्ह्यात तब्बल १६४ टक्के जादा पावसाची नोंद गत हंगामात झाली आहे. जतमध्ये १३०, खानापूरमध्ये १४० आणि कडेगांवमध्ये १४३ टक्के वगळता, अन्य तालुक्यात १७५ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला.
धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा
गत वर्षी सरासरीपेक्षा १६४ टक्के पाऊस अधिक झाला आहे. त्यामुळे पावसाळ्याअखेर सांगली जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी कोयना आणि वारणा ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरली होती. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत या दोन्ही धरणांमध्ये निम्म्याहून अधिक पाणीसाठा आहे.
१०५ टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या ७८.३८ टीएमसी पाणीसाठा आहे, तर ३४ टीएमसी क्षमता असलेल्या वारणा धरणात २५.३१ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई निवारणासाठी या धरणांच्या साठ्यामधून सिंचन योजना सुरू राहू शकतात.
विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा
प्रशासनाच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार मार्चअखेर १५५ गावांना ७२ टँकरद्वारे, तसेच ११९ विहिरी अधिग्रहीत करून पाणीपुरवठा करावा लागू शकतो. एप्रिल ते जूनअखेर ही संख्या वाढून ३८३ गावांना १८७ टँकरद्वारे आणि २३४ विहिरी अधिग्रहीत करून पाणी द्यावे लागण्याचा अंदाज आहे. या संभाव्य आराखड्यानुसार टंचाई निवारणासाठी पावणेतेरा कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
सिंचन योजनांसाठी ३० कोटींची आवश्यकता
गत वर्षी सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे कोयना आणि वारणा या दोन धरणांमध्ये पाणीसाठाही पुरेसा आहे. उन्हाळ्यात जाणवणाऱ्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर या धरणांमधून ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू या सिंचन योजनांसाठी पाणी उचलण्याची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी विजेची बिले भागवण्यासाठी जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या काळात ३० कोटी रुपयांचा खर्च या आराखड्यात धरण्यात आला आहे.
जतला सर्वाधिक फटका
एप्रिल ते जून दरम्यान निर्माण होणाऱ्या टंचाई परिस्थितीचा सर्वाधिक फटका जत तालुक्याला बसणार आहे. जतमधील ८७ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता भासू शकते. मिरज तालुक्यातील ३८, खानापूर तालुक्यातील ११ शिराळा आणि आटपाडी तालुक्यातील प्रत्येकी ७, कडेगाव तालुक्यातील पाच, तर कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील प्रत्येकी एका गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.