Sugarcane Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Shortage : चाराटंचाईमुळे ऊसतोड; कारखान्यांचा मात्र हिरमोड

Sugarcane Cultivation : गेल्या वर्षी अतिवृष्टी, तर यंदा कोरडा दुष्काळ. बागायती भागातील शेतकरीही या दुष्टचक्रात सापडला. जिरायती भागाची अवस्था तर आणखीनच बिकट आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : गेल्या वर्षी अतिवृष्टी, तर यंदा कोरडा दुष्काळ. बागायती भागातील शेतकरीही या दुष्टचक्रात सापडला. जिरायती भागाची अवस्था तर आणखीनच बिकट आहे. नगदी पिकांबरोबरच ऊसलागवडीही कमी झाल्या. गेल्या वर्षीच उसाची टंचाई निर्माण झाल्याने कारखान्यांना एक महिना आधीच हंगाम आटोपते घ्यावे लागले होते.

यंदा तर परिस्थिती अधिक बिकट आहे. आधीच कमी ऊसलागवड, त्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊसतोड सुरू आहे. त्यामुळे यंदा कारखान्यांसमोर गाळप हंगाम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

गेल्या वर्षी नगर जिल्ह्यात १ लाख ६० हजार हेक्टरवर ऊसलागवड झाली होती. यंदा त्यात ५० हजार हेक्टरची घट झाली असून, १ लाख ९ हजार ४५७ हेक्टरवर ऊसलागवड झालेली आहे.

त्यातही जिल्ह्यात नव्याने ११ हजार ९११ हेक्टरवर ऊस लागवड झाली असून, खोडवा उसाचे क्षेत्र (५६ हजार ३३० हेक्टर) अधिक आहे. अनेक तालुक्यांत नव्याने ऊसलागवडी झाल्या नाहीत. यंदा तर दुष्काळी परिस्थिती असल्याने खोडवा उसांनाही पाणी कुठून द्यावे, असा प्रश्‍न आहे. शिवाय जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्‍न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी चाऱ्यासाठी ऊस विकत आहेत. त्यामुळे कारखान्यांना किती ऊस उपलब्ध राहणार, हाही प्रश्‍नच आहे.

नगर जिल्ह्यात आता कुठे पावसाला सुरुवात झाली असली, तरी तो पुरेसा नाही. परतीच्या पावसावरच आता ऊसलागवडीचे गणित अवलंबून असेल. परतीच्या पावसाने दगा दिल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नव्याने ऊसलागवडी होण्याची शक्यता नाही. शिवाय, अनेक शेतकरी खोडवा ऊसही काढून टाकू शकतात. त्यामुळे पुढील वर्षी तर कारखान्यांना यंदापेक्षाही मोठ्या ऊसटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

दरवर्षी राज्यात १५ ऑक्टोबरदरम्यान साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होतो. किमान चार महिन्यांपेक्षा अधिक काळ हंगाम चालला, तर कारखान्यांना फायदा होतो. मात्र ऊसटंचाईमुळे यंदा तीन महिनेही हंगाम चालणे मुश्कील आहे. पावसाअभावी उसाची वाढ हवी तशी झालेली नाही. पूर्ण वाढ झालेला ऊस गाळपाला गेला, तरच त्याचे वजन अन् उतारा चांगला येतो.

१५ ऑक्टोबरला कारखान्यांची धुराडी पेटल्यास अपरिपक्व ऊस गाळपाला येऊ शकतो. त्यातून साखर उतारा व उत्पादनातही मोठी घट होऊ शकते. ही घट टाळण्यासाठी कर्नाटकने यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.

महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती असल्याने १५ नोव्हेंबरला हंगाम सुरू करावेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांची प्रति दिन गाळप क्षमता वाढली आहे. वाढलेल्या क्षमतेनुसार ऊस उपलब्ध करणे, कारखान्यांसमोर आव्हान ठरणार आहे.

कारखान्यांपेक्षा जादा भाव मिळत असल्याने विक्री

आतापर्यंत ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांना मुकादमाच्या मागे लागावे लागत होते. मात्र यंदा उलट कारखान्यांना शेतकऱ्यांची मनधरणी करावी लागेल. त्यातून स्पर्धा निर्माण होऊन उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील बागायती भागातून दररोज अनेक वाहने उसाची चाऱ्यासाठी वाहतूक करीत आहेत. त्यासाठी पशुपालक प्रति टन ३००० ते ४००० हजार रुपये मोजत आहेत. कारखान्यांपेक्षा जादा भाव मिळत असल्याने ऊस उत्पादकही चाऱ्यासाठी ऊस विकत आहेत.

नगर जिल्ह्यातील यंदाची

ऊस लागवड (हेक्टर)

आडसाली १६४२०.८०

पूर्वहंगामी १४१७१

सुरू २२५३६

खोडवा ५६३३०

एकूण १,०९,४५७.८०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT