Sugarcane Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : गळीत हंगाम मंदावला

Sugarcane Harvesting : पावसाअभावी उसाची वाढ चांगली न झाल्याने यंदाचा ऊस हंगाम लवकर संपेल हा अंदाज पूर्णपणे खोटा ठरला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : पावसाअभावी उसाची वाढ चांगली न झाल्याने यंदाचा ऊस हंगाम लवकर संपेल हा अंदाज पूर्णपणे खोटा ठरला आहे. फेब्रुवारी संपत आला तरी यंदा राज्यातील केवळ ८ साखर कारखाने बंद झाल्याने हंगाम एप्रिलच्या मध्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे.

२७ फेब्रुवारीअखेर गेल्यावर्षी तब्बल ४५ साखर कारखाने बंद झाले होते. हंगाम अंतिम टप्प्यात येत असला तरी वेळेवर ऊस जात नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार ऊस पट्ट्यात कायम आहे. कारखाना प्रतिनिधी व शेतकऱ्यांमध्ये ऊस तोडीवरून संघर्ष कायम असल्याचे चित्र आहे. मजूर कमी असल्याचे सांगत कारखान्यांकडून ऊस तोडणीला टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप ऊस उत्पादकांचा आहे. विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस पट्ट्यामध्ये संघर्षाची धार अधिक आहे.

राज्यात ८८४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. १० टक्के उताऱ्याने ८८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी या कालावधीत ९५३ लाख टन उसाचे गाळप होऊन ९४ लाख टन साखर उत्पादित झाली होती. या आकडेवारीवर नजर टाकल्यास ऊस तोडणी किती संथ चालली आहे हे लक्षात येते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उताऱ्यात किंचितशी वाढ आहे. गेल्या वर्षी ९.८६ टक्के साखर उतारा होता. यंदा तो १० टक्क्यावर गेला आहे. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा सर्वाधिक म्हणजे ११.३६ टक्के इतका आहे. या विभागात सर्वाधिक २३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

पुणे विभागात १०.२८ टक्के साखर उताऱ्याने १९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. नगर विभागात ९.६६ उताऱ्याने १० लाख टन साखर तयार झाली. उसाचे क्षेत्र जास्त असणाऱ्या कोल्हापूर, पुणे, नगर, सोलापूर विभागात केवळ एकेक कारखाना बंद झाला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात तीन कारखाने बंद झाले आहेत.

अनेक कारखान्याकडे यंत्राची संख्या मुबलक असली तरी वेगाने ऊस तोडणी करणे अशक्य होत असल्याचे चित्र आहे. छोट्या क्षेत्रामध्ये ही यंत्रे काम करत नसल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना ऊस तोडणी कामगारावरच अवलंबून राहावे लागते. तोडणी कामगार नसल्याने कारखाना व्यवस्थापनाकडे ऊस तोडणीसाठी ऊस उत्पादक गयावया करीत असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांना दुहेरी फटका

अनेक गावांमध्ये स्थानिक लोक एकत्रित येत (खुद तोड) ऊस तोडणी करत आहेत. मजुरांअभावी हा पर्याय वापरला जात आहे. उन्हाचा तडाखा वाढत आहे. यातच ऊस तोडणीसाठी तयार असल्याने तोड येईल म्हणून शेतकऱ्यांनी महिना महिना उसाला पाणी दिलेले नाही. याचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उसाला आगी लागण्याचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उत्पादक अस्वस्थ आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT