Kolhapur News : भारतासारख्या देशात साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता असताना ब्राझीलमध्ये मात्र हंगामाच्या शेवटीही साखर उत्पादनात वाढ सुरूच आहे. यंदाच्या हंगामात ब्राझीलमध्ये ४०० लाख टनांहून अधिक उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ऑक्टोबरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन २२ टक्यांनी वाढले आहे.
जागतिक बाजारात साखरेच्या किमती विक्रमी पातळीवर आहेत. या पार्श्वभूमीवर वाढलेल्या किमतीचा फायदा उठविण्यासाठी ब्राझीलने यंदा साखर उत्पादन वाढविण्याला प्राधान्य दिले. यंदाचे वर्ष ब्राझीलसाठी अतिशय चांगले ठरले आहे. ब्राझीलच्या साखर हंगामाची एप्रिलला सुरुवात झाली. गेल्या दोन वर्षांपासून या देशात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने उसासह सर्वच पिकांना फटका बसला होता.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यामुळे देशातील उसासह साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. याचा फायदा भारतासारख्या साखर उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या देशांने उठवला. एप्रिलमध्ये हंगाम सुरू होण्यापूर्वी उसासाठी उपयुक्त पाऊस ठराविक कालखंडाने झाला. यामुळे उसाची वाढ चांगली राहिली. साहजिकच उत्पादनातही वाढ झाली होती.
अगदी पहिल्या महिन्यापासूनच गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्क्यांनी साखरेचे उत्पादन वाढलेले राहिले. ऑक्टोबरपर्यंत ब्राझीलमध्ये कोरडे हवामान असल्याने ऊस तोडीत कोणतीही बाधा निर्माण झाली नाही. ऑक्टोबरच्या उत्तरार्धात मात्र काही दिवस पाऊस असल्याने ऊस तोडणीसह साखर हंगाम मंदावला. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र पुन्हा कोरडे हवामान निर्माण झाल्याने हंगामाच्या शेवटी शेवटी ऊस तोडण्यांनी गती घेतली आहे. ब्राझीलचा हंगाम नोव्हेंबरपर्यंत चालतो. नोव्हेंबरनंतर पावसाची शक्यता असल्याने या वेळी हंगाम संपतो.
सध्या ब्राझीलमध्ये ऊस तोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सरकारही शेवटच्या टप्प्यातही अधिकाधिक साखर उत्पादन करून ती जागतिक बाजारात विक्रीसाठी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
भारताची निर्यातबंदी ब्राझीलच्या पथ्यावर
भारतामध्ये केंद्र सरकारने साखरेवर निर्यातबंदी घातल्याने भारतातून जागतिक बाजारात साखर येण्याची शक्यता शून्यावर पोहोचली आहे. हीच बाब ब्राझीलच्या पथ्यावर पडत असून, कारखान्यांना याचा चांगला फायदा होत आहे. हंगाम संपेपर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने ऊस तोडणी करून साखरनिर्मिती करण्याचा प्रयत्न तेथील कारखानदारांकडून होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.