Farm Management Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Management : काटेकोर व्यवस्थापन हेच शेतीचे सूत्र

Banana Crop : रमेश जनार्दन पाटील यांनी नोकरी सांभाळून गोद्री (ता.जामनेर, जि.जळगाव) येथील वडिलोपार्जित शेतीमध्ये केळी, सोयाबीन,तूर,कापूस पिकांच्या दर्जेदार उत्पादन घेतात.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

चंद्रकांत जाधव

Mixed Cropping : रमेश जनार्दन पाटील यांनी नोकरी सांभाळून गोद्री (ता.जामनेर, जि.जळगाव) येथील वडिलोपार्जित शेतीमध्ये केळी, सोयाबीन,तूर,कापूस पिकांच्या दर्जेदार उत्पादन घेतात. जमीन सुपीकता, पीक फेरपालट, सूक्ष्म सिंचनाचा वापर, एकात्मिक कीड,रोग नियंत्रणावर भर देत पाटील यांनी पीक उत्पादनात सातत्य ठेवले आहे. प्रशिक्षण तसेच शिवारफेरीत सहभागी होत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

जळगाव शहरामधील रमेश जनार्दन पाटील यांची गोद्री (ता.जामनेर, जि.जळगाव) शिवारात वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीमध्ये पीक फेरपालट करत उत्पन्नवाढीवर भर दिला आहे. पाटील सध्या एरंडोल येथे जलसंपदा विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत आहे. नोकरी सांभाळून दर शनिवार,रविवार जळगावपासून ७० किलोमीटर अंतरावरील गोद्री गावातील शेतीचे सालगड्यांच्या मदतीने काटेकोर व्यवस्थापन करतात. कांग प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात गोद्री गाव आहे. या गावशिवारामध्ये पाटील यांची वीस एकर शेती आहे. त्यामध्ये तीन विहिरी आहेत. तसेच कांग प्रकल्पातून जलवाहिनी केली आहे. शेती व्यवस्थापनासाठी तीन सालगडी असून, इतर कामांसाठी मजुरांची मदत घेतली जाते. शेतीमध्ये दोन बैलजोड्या आहेत. शेतीत गुंतवणूक करून चार पैसे इतरांनाही मिळावेत, असा त्यांचा प्रयत्न आहे. वडिलांकडून त्यांना शेती व्यवस्थापनाचे धडे मिळाले आहेत.

शेतीचे नियोजन ः
गोद्री शिवारामध्ये पाटील यांची एकाच ठिकाणी वीस एकर शेती असून पूर्णपणे ओलिताखाली आहे. दरवर्षी कांदेबाग केळीची सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये लागवड होते. तेरा एकरात केळी लागवडीचे नियोजन असते. ग्रॅण्ड नैन जातीच्या उतिसंवर्धित रोपांची सहा बाय पाच फूट अंतरावर लागवड केली जाते. केळीसाठी गादीवाफा आणि ठिबक सिंचन तंत्राचा अवलंब केला आहे. सोयाबीन काढणीनंतर केळी लागवड केली जाते. सुपीकता टिकविण्यासाठी पीक फेरपालट, हिरवळीचे पीक आणि शेणखताच्या वापरावर पाटील यांचा भर आहे. माती परिक्षणानुसार पिकाला वेळापत्रकानुसार रासायनिक आणि विद्राव्य खते दिली जातात. यासाठी शरद महाजन यांचे मार्गदर्शन मिळते.

जूनमध्ये ठिबक सिंचनावर बीटी कापूस आणि तूर लागवड असते. कापसाची पाच बाय अडीच फूट आणि तुरीची आठ बाय अडीच फूट अंतरावर लागवड केली जाते. तुरीमध्ये सोयाबीनचे आंतरपीक घेतले जाते. कमी कालावधीत येणाऱ्या कापूस जातीची लागवड केली जाते. कापूस, सोयाबीन,तूर पिकामध्ये एकात्मिक कीड, रोग नियंत्रणावर पाटील यांचा भर आहे. केळी काढणी ऑक्टोबरमध्ये पूर्ण होते. काढणी झाल्यानंतर हलकी पूर्वमशागत करून ठिबकवर मका लागवड केली जाते. मका पिकाच्या कमी कालावधीत येणाऱ्या जातींची निवड केली जाते. जेथे मका पीक घेतात, त्या क्षेत्रात पीक अवशेष गाडून जमिनीची सुपीकता राखली जाते.

उत्पादनात सातत्य ः
पाटील यांना योग्य व्यवस्थापनातून केळीची सरासरी १८ ते २० किलोची रास मिळते. कापसाचे एकरी १० क्विंटल, सोयाबीन एकरी आठ ते दहा क्विंटल आणि तुरीचे दहा क्विंटल उत्पादन मिळते. योग्य व्यवस्थापनातून पाटील यांनी पीक उत्पादकता टिकून ठेवली आहे. अनेकदा अधिकचा पाऊस असतो तर काही वेळेस कमी पाऊस असतो. काहीवेळा गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसतो, याचा कापूस उत्पादकतेवर अनेकदा परिणाम होतो. पाटील यांनी व्यापारी, खरेदीदारांशी चांगला संपर्क ठेवला आहे. त्यामुळे केळी, कापूस, तूर या पिकांची थेट किंवा शिवार खरेदीत विक्री केली जाते. शेतीमालाची गुणवत्ता जोपासली असल्याने खरेदीदार केळी, कापसाची लगोलग खरेदी करतात. केळीची काढणी ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरमध्ये सुरू होते. या काळातील गणेशोत्सव व नवरात्रोत्सवामुळे चांगला दर मिळतो. यंदा तुरीला जागेवर ७,६०० रुपये प्रति क्विंटलचा दर
मिळाला आहे.

तज्ज्ञांशी संवाद ः
रमेश पाटील हे नेहमी केळी उत्पादक शेतकरी, तज्ज्ञ यांच्या संपर्कात असतात. छत्रपती संभाजीनगर येथील ‘वाल्मी‘ संस्थेतून पीक, पाणी व्यवस्थापनाबाबत माहिती घेतात. याचबरोबरीने कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून हिरवळीची खते, जमिनीचा पोत, बागायती पिकांचे व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन घेतात. जलसंपदा विभागातर्फे आयोजित पाणी वापर प्रशिक्षणात पाटील सहभाग होतात. विविध खते, बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्या शेतामध्ये येऊन मार्गदर्शन करतात. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान कळण्यास मदत होते.


शेतीने उंचावले जीवनमान ः
रमेश यांचे वडील जनार्दन पाटील यांनी शेतीमध्ये केलेली मेहनत, गुंतवणुकीचा कुटुंबाला फायदा झाला आहे. रमेश यांच्यासह त्यांचे बंधू कृष्णा आणि भगवान हे देखील शेती करतात. शेतीतून प्रगती होते, हा विश्वास असल्याने रमेश यांनी वडिलोपार्जित शेतीमध्ये टप्प्याटप्प्याने विकास केला. रमेश यांची थोरली कन्या प्रतीक्षा ही पुण्यामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. धाकटी कन्या सोनम ही सातवीत आहे. शेती व्यवस्थापनात रमेश यांना त्यांच्या पत्नी सुरेखा यांची चांगली साथ लाभली आहे. रमेश यांचा परिवार उच्चशिक्षित आहे. शेतीमुळेच कुटुंब शिकून सावरून मोठे झाले, असे रमेश पाटील सांगतात.

शेती व्यवस्थापनातील बाबी ः
१) सालगड्यांच्या सोबत दर आठवड्याला पीक व्यवस्थापन, सिंचन, खतांबाबत नियोजन.
२) शेतीमधील खर्चासंबंधी वार्षिक ताळेबंद. नोंदीनुसार नव्या हंगामात पीक लागवडीचा आराखडा.
३) मजूर टंचाईवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणावर भर.
४) केळी निर्यातीसाठी प्रयत्न.
५) तज्ज्ञ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांशी सतत संपर्क.
------------------------------------------------
संपर्क ः रमेश पाटील, ९४२०१०७८४१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT