चंद्रकांत जाधव
Crop Management : निंबोल (जि. जळगाव) येथील नीलेश पाटील यांच्या संयुक्त कुटुंबाची सुमारे १६० एकर शेती आहे. केळी, हळद या मुख्य पिकांसह कापूस, मका ही पिके ते घेतात.
एवढ्या मोठ्या क्षेत्रावरील व्यवस्थापन सुकर होण्यासह मजुरी, वेळ, श्रम व खर्च कमी करण्यासाठी मशागत ते काढणी व काढणी पश्चात कामांचे यांत्रिकीकरण त्यांनी केले आहे. त्यातून शेतीमालाची उत्पादकता व दर्जा यात त्यांनी वाढ केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील निंबोल (ता. रावेर) परिसर केळीसाठी प्रसिद्ध आहे. काळी कसदार जमीन शिवारात आहे. तापी नदीलगत शिवार असल्याने मुबलक जलसाठे आहेत. येथील नीलेश पाटील यांचे संयुक्त कुटुंब असून, सुमारे १६० एकर शेती आहे. दहा कूपनलिका, चार मोठे ट्रॅक्टर, एक पॉवर टीलर, एक मिनी ट्रॅक्टर, दहा सालगडी अशी यंत्रणा आहे.
आठ गायी आहेत. पूर्वी चार बैलजोड्या होत्या परंतु यांत्रिकीककण वाढविल्याने आता दोनच बैलजोड्या आहेत. केळी व हळद ही मुख्य पिके आहेत.
उतिसंवर्धित ग्रॅण्ड नैन केळीचे ७० ते ८० एकर, तर हळदीचे २० एकरांपर्यंत क्षेत्र आहे. कापूस, मका ही पिके देखील आहेत. नीलेश यांचे वडील अशोकदेखील पूर्णवेळ शेतीच करतात. नीलेश, त्यांचे चुलतबंधू मिलिंद रामदास पाटील तसेच पुतण्या अनिकेत नितीन पाटील असे तिघे शेतीची मुख्य जबाबदारी सांभाळतात. अनिकेत यांनी कृषिपदवीचे शिक्षण घेतले आहे.
पीक व्यवस्थापन
केळीची लागवड मार्च ते सप्टेंबर अशी टप्प्याटप्प्याने असते. त्यामुळे दरांमधील चढ-उतार व अन्य समस्यांचा फटका टाळता येतो. मेमध्ये हळदीच्या सेलम वाणाची तर बीटी कापसाची पूर्वहंगामी लागवड असते. मका खरीप व रब्बीत असतो. कापसाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात मका वा हरभरा
असतो.
शेतीचे यांत्रिकीकरण
सुमारे १६० एकर शेतीचा व्याप सांभाळण्यासाठी पाटील कुटुंबाने यांत्रिकीकरणाची साथ घेतली
आहे. त्यातून मजुरी, वेळ, श्रम व खर्च कमी करीत व्यवस्थापन सुकर केले आहे.
यंत्रांविषयी बोलायचे तर मोठे ट्रॅक्टरचलित हळद लागवड यंत्र घेतले आहे. दोन मजूर बियाणे टाकण्यासाठी बसू शकतील अशी यंत्राच्या वरील भागात व्यवस्था आहे.
बियाणे सोडण्यासाठी दोन पाइप्स आहेत. चालक व चार मजूर सुमारे सहा तासांत दोन ते तीन एकरात हळद लागवड या यंत्राद्वारे करू शकतात. एकरी तीन लिटर डिझेल लागते. या यंत्रामुळे तीन ते चार पटीने मजूरबचत, त्यावरील तेवढा खर्च व वेळेत मोठी बचत केली आहे. काकरी पाडणे, बेणे दाबणे व मातीची भर लावणे ही कामे देखील हे यंत्र करते. त्यामुळे बहुउद्देशीय असेही त्याला म्हणता येईल. त्याची किंमत ८० ते ८५ हजार रुपये आहे.
काढणीपश्चात यंत्रे
हळद शिजवण्यासाठी बॉयलर आहे. शिवाय ती वाळवून पॉलिश करणारे ट्रॅक्टरचलित गोलाकार यंत्र आहे. कमी कालावधीत त्याद्वारे ‘पॉलिशिंग’ शिवाय ‘ग्रेडिंग’ ही होते. त्यानंतर तागाच्या गोण्यांत साठवणूक केली जाते.
पुढील काळात हळद काढणीसाठी मोठे ट्रॅक्टरचलित अवजार विकसित करण्याचा प्रयत्न आहे. त्याचा अभ्यास सुरू आहे.
मक्यासाठी यंत्र
अतिशय हलके, मनुष्यचलित गोलाकार ‘सीड ड्रील’ आहे. त्याला लोखडी हॅण्डल आहे. गोलाकार यंत्रणेत बियाणे साठवून ठेवता येते. त्यातून प्रत्येकी सहा इंचावर बियाणे टाकले जाते. हे अंतर गरजेनुसार बदलताही येते. बियाणे एक इंचापेक्षा खोल जावे यासाठी हलक्या प्रकारचे दाते आहेत. मजबूत प्लॅस्टिकच्या मदतीने ते तयार झाले आहे.
एक मजूर एका दिवसात अडीच एकरांत यंत्राद्वारे पेरणी करू शकते. यातून लागवडीचा खर्च ६० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. जिथे अडीच एकरांत बारा ते तेरा मजूर लागले असते तेथे एका मजूरात हे काम होते.
पॉवर टिलर व अन्य यंत्रे
डिझेलवरील व एका मनुष्याकरवी चालणाऱ्या पॉवर टिलरमुळे केळी बागांतील तणनियंत्रण
सोपे झाले आहे. एका दिवसात तीन ते चार एकरांत आंतरमशागत हे यंत्र करते.
जमिनीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचलित खोल मोठा नांगर आणला आहे. प्रचलित नांगराच्या तुलनेत तो मजबूत, ताकदवान असून ब्लेडसही आकाराने मोठे आहेत.
एका दिवसात चार ते पाच एकरांत त्याद्वारे नांगरणी करता येते. प्रचलित नांगर त्या तुलनेत एका दिवसात तीन एकरांत नांगरणी करतात. ट्रॅक्टरचलित बहुउद्देशीय पेरणी यंत्राही आहे. त्याद्वारे विविध पिकांची पेरणी, त्यावरील खर्च, बियाणे, मजुरी आदींचा २५ टक्के खर्च कमी झाला आहे
ऑटोमेशन यंत्रणा
केळी, हळद ही दीर्घ कालावधीची पिके असल्याने ‘फर्टिगेशन’ वर्षभर करावे लागते.
त्यादृष्टीने प्रत्येकी ३० एकरांसाठी असे एकूण ९० एकरांत स्वयंचलित ठिबक (ऑटोमेशन) सिंचन
यंत्रणा बसवली आहे. प्रत्येक तीस एकरांसाठी दोन लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या
टाक्या तयार केल्या आहे.
टाक्या भरण्यासाठी दोन तर पाणी उचलण्यासाठी एक कृषिपंप आहे.
योग्य ‘फिल्टर’ यंत्रणेच्या वापरातून पिकांना जैविक स्लरीदेखील देता येते. ‘मोबाइल हॅंडसेट’च्या आधारे ही यंत्रणा कार्यान्वित होते.
पिकांचे नियोजन, उत्पादन
यांत्रिकीकरणामुळे शेतीचे नियोजन अधिक नेटक्या पद्धतीने करणे शक्य होऊन मालाचे उत्पादन व दर्जा यात वाढ करणे शक्य झाले आहे. योग्य दर मिळताच हळदीची त्या वेळी विक्री व्हावी यासाठी सांगली येथील खासगी शीतगृहात (कोल्ड स्टोअरेज) साठवणूक केली जाते. त्यातून क्विंटलमागे एक हजार रुपयांनी अधिक दर मिळण्याचीही संधी असते.
केळीचेही चोख व्यवस्थापन केले जाते. त्यातून निर्यातक्षम उत्पादन घेऊन दरही तसे मिळवले जातात. पूर्वी केळीची २० किलोपर्यंत रास मिळायची. आता ती २५ ते ३० किलोपर्यंत मिळते. एकरी हळदीचे १५० क्विंटल (ओल्या), कापूस १२ क्विंटल, तर मक्याचे खरीपात २० ते २५ क्विंटल, तर उन्हाळ्यात त्यागून दीड पट उत्पादन मिळते.
नीलेश पाटील, ९८२३६९९२३३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.