Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Storage: शास्त्रीय पद्धतीने कांदा साठवणूक, प्रतवारी, पॅकिंग

Modern Storage Techniques: नाशिवंत कांद्याची गुणवत्ता राखण्यासाठी, काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी योग्य साठवणूक, प्रतवारी आणि पॅकिंग या बाबी महत्त्वाच्या ठरतात. शास्त्रोक्त पद्धतीने कांद्याची साठवणूक केल्यास संभाव्य नुकसान टाळता येते.

राहुल घाडगे

राहुल घाडगे

Onion Farming: महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड मुख्यत्वे करून नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, बुलडाणा, जळगाव व धुळे या जिल्ह्यांत केली जाते. कांदा पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढते आहे. दैनंदिन आहारामध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणात समावेश केला जातो. त्यामुळे कांद्याला बाजारात कायम चांगली मागणी असते. परंतु दरांमध्ये कायम चढउतार असतात. कांदा हा नाशिवंत असल्याने साठवणूक आणि वाहतुकीवेळी योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. बाजारातील दरांतील चढ-उतार यामुळे योग्य भाव असताना कांदा विक्री करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.

त्यासाठी स्थानिक बाजारपेठेची व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. कांदा साठवणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने कांदा चाळीची उभारणी करताना खर्चात जरी बचत होत असली, तरी साठवणुकीतील होणारे नुकसान हे जास्त असते. त्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने कांदा चाळीची उभारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून साठवणुकीमध्ये होणारे संभाव्य नुकसान कमी करणे शक्य होईल.

कांद्याची गुणवत्ता राखण्यासाठी, काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मकता सुनिश्‍चित करण्यासाठी योग्य साठवणूक, प्रतवारी आणि पॅकिंग या बाबी महत्त्वाच्या ठरतात. यासाठी कांद्याची साठवणूक, प्रतवारी तंत्र, पॅकिंग मानके आणि प्रगत आंतरराष्ट्रीय साठवणुकीबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

शास्त्रोक्त पद्धतीने कांदा साठवणूक

कांदा नाशिवंत आहे. कांद्याची योग्य प्रकारे साठवण न केल्यास ४५ ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इत्यादी कारणांमुळे होते. त्यामुळे कमीत कमी नुकसान होण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक करणे गरजेचे आहे. शास्त्रोक्त पद्धतीने साठवण केल्यास साठवणुकीत होणारे नुकसान कमी करणे शक्य होते. शास्त्रोक्त पद्धतीने उभारलेल्या कांदाचाळीत ४ ते ५ महिन्यांपर्यंत कांदा सुस्थितीत राहू शकतो. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळले जाते. योग्य साठवणुकीमुळे कांद्याची साठवण क्षमता वाढते. त्यामुळे बाजारमूल्य चांगले मिळण्यास मदत होते.

अ) पारंपरिक पद्धती

हवेशीर साठवणूक रचना

भारत आणि इतर उष्ण कटिबंधीय प्रदेशातील शेतकरी जाळीदार भिंती असलेल्या नैसर्गिकरीत्या हवेशीर साठवणूक रचना वापरतात. अशा पद्धतीने बांधलेल्या संरचना बुरशीची वाढ रोखण्यासाठी हवा खेळती ठेवण्यासाठी मदत होते.

बांबू किंवा लाकडी क्रेट्स

प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी क्रेटमध्ये कांदे साठवल्याने कुजण्याची शक्यता कमी होते. कारण क्रेटमध्ये हवा खेळती राहते.

कांद्याचे स्टँड्स किंवा जाळीच्या पिशव्या

जाळीच्या पिशव्या हवा खेळती ठेवतात. तसेच इतर गोष्टींशी थेट संपर्क कमी होतो, त्यामुळे कांदे खराब होण्याची शक्यता कमी होते.

ब) आधुनिक पद्धती

शीतगृह ः शीतगृहामध्ये कांद्याची साठवणूक करताना तेथील तापमान ० ते ५ अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे कांद्याला अंकुरण फुटत नाही, परिणामी नासाडी टळते. कांद्याचे साठवणुकीचे आयुष्य ६ ते ८ महिन्यांपर्यंत वाढते.

नियंत्रित वातावरण (Controlled Atmosphere) साठवणूक ः या पद्धतीमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी केली जाते आणि कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढवले जाते. त्यामुळे चयापचय क्रिया कमी होते. परिणामी, कांद्याला अंकुरण फुटत नाही आणि नासाडी टळते. अशा प्रकारे साठविलेला कांद्यात निर्यातीसाठी गुणवत्ता टिकून राहते.

यांत्रिक व्हेंटिलेशन साठवणूक ः मोठ्या साठवणूक युनिटमध्ये हवा प्रवाह, आर्द्रता आणि तापमान आदी बाबी नियंत्रित ठेवता येते. त्यामुळे पारंपरिक साठवणुकीत होणारे ३० ते ४० टक्के नुकसान सुमारे ५ ते १० टक्क्यांपर्यंत कमी करता येते.

साठवणुकीपूर्वी कांदा वाळविणे (क्युरिंग) ः शेतातून काढणी केलेले ताजे कांदे १० ते १५ दिवसांसाठी सूर्यप्रकाशात किंवा उष्ण, कोरड्या परिस्थितीत वाळवावेत. कांदे वाळविल्यामुळे त्यातील अतिरिक्त आर्द्रता काढून टाकली जाते. त्यामुळे कांद्याचे बाहेरील आवरण कडक होण्यास मदत मिळते. परिणामी साठवणुकीत कांदा कुजण्याचे प्रमाण टाळता येते.

प्रतवारी

भारतीय बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठत चांगल्या दर्जाच्या कांद्यांना विशेष मागणी असते. विक्रीवेळी कांद्याचा आकार, रंग आणि गुणवत्ता एकसारखी असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रतवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सामान्यपणे प्रतवारीसाठी पारंपरिक पद्धतीने मजूर

लावून काम केले जाते. यामध्ये प्रतवारी एकसमान होत

नाही. परंतु आता कन्व्हेअर बेल्ट आणि ऑप्टिकल सेन्सर आधारित स्वयंचलित सॉर्टिंग मशिन बाजारात उपलब्ध आहेत. या मशिनच्या मदतीने अचूक प्रतवारी करणे शक्य होते.

प्रतवारीचे महत्त्व व मापदंड

उच्च प्रतीच्या उत्पादनासाठी जास्त बाजारभाव मिळतो.

खराब किंवा लहान आकाराचे कांदे वेगळे केले जातात.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके पूर्ण करणे.

अ) आकार आधारित प्रतवारी

लहान ः २० ते ४० मिमी (लोणचे, प्रक्रियेसाठी वापर).

मध्यम ः ४० ते ६० मिमी (घरगुती वापरासाठी प्राधान्य).

मोठे ः ६० ते ८० मिमी (निर्यातीसाठी प्राधान्य).

ब) गुणवत्ता आधारित प्रतवारी

A ग्रेड ः एकसमान आकार, नुकसानरहित, योग्य रंग.

B ग्रेड ः किंचित विकृत, परंतु विक्रीयोग्य.

C ग्रेड ः निकृष्ट गुणवत्ता, प्रक्रिया किंवा स्थानिक बाजारात विक्रीसाठी योग्य.

क) रंग आणि स्वरूप

लाल, पिवळे किंवा पांढरे कांदे हे कोणतेही चट्टे नसलेले एकसमान रंगाचे असावेत.

पॅकिंग

साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान कांद्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी योग्य पॅकिंग असणे आवश्यक आहे.

अ) देशांतर्गत बाजारपेठेसाठी

जाळीच्या पिशव्या (नायलॉन किंवा ज्यूट) यांचा वापर पॅकिंगसाठी करता येतो. त्यामध्ये हवा खेळती राहते. त्यामुळे कांद्याची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता कमी होते. या पिशव्या ५ किलो, १० किलो, २५ किलो आणि ५० किलो या वजनामध्ये उपलब्ध आहेत.

प्लॅस्टिक क्रेट्स : वाहतुकीमध्ये कांद्यास होणाऱ्या जखमा टाळण्यासाठी उपयुक्त. कमी अंतरावर वाहतुकीसाठी वापरता येतात.

गोणपाट पिशव्या : पारंपरिकरीत्या कांदा पॅकिंगसाठी गोणपाट पिशव्यांचा वापर केला जातो. परंतु ओलावा टिकवून ठेवण्याच्या समस्येमुळे गोणपाटाची जागा जाळीच्या पिशव्यांनी घेतली आहे.

ब) निर्यातीसाठी पॅकिंग

हवेशीर कार्टन बॉक्स : युरोप आणि यूएसएला निर्यातीच्या प्रीमिअम कांद्यासाठी यांचा वापर होतो.

शिपिंग कंटेनरमध्ये बल्क पॅकिंग : तापमान नियंत्रित कंटेनरमध्ये आर्द्रता नियमनासह साठविण्यासाठी.

लेबलिंग आणि ब्रँडिंग : निर्यात करताना आंतरराष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता नियमांचे पालन करावे.लेबलमध्ये विविधता, वजन, उत्पादन घेण्यात आलेल्या देशाचे नाव आणि हाताळणी सूचनांचा समावेश असतो.

आंतरराष्ट्रीय साठवणूक सुविधा

आज अनेक देशांमध्ये कांद्याची निर्यात गुणवत्ता राखण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित सुविधांचा वापर केला जात आहे. जागतिक व्यापार वाढल्यामुळे कांद्याची निर्यात गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रगत साठवणूक सुविधा आवश्यक आहेत. त्यात प्रामुख्याने कोल्ड स्टोअरेज वेअरहाउस, नियंत्रित वातावरणात साठवणूक, बंदरात बल्क स्टोअरेज सुविधा, स्मार्ट स्टोअरेज तंत्रज्ञान अशा नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक आहे.

नेदरलँड्स, यूएसए आणि जपानसारखे देश कांद्यासाठी अत्याधुनिक कोल्ड स्टोअरेज वेअरहाऊसचा वापर करतात. या माध्यमातून तापमान आणि आर्द्रता नियंत्रण स्वयंचलित प्रणालीद्वारे नियंत्रित केले जाते. त्यामुळे कांद्याची टिकवणक्षमता वाढण्यास मदत होते.

नियंत्रित वातावरण (CA) साठवणूक ः युरोप आणि उत्तर अमेरिकेत ८ ते १२ महिन्यांसाठी कांद्याचा तजेलपणा टिकवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामध्ये ऑक्सिजनची पातळी ३ ते ५ टक्क्यांपर्यंत कमी केली जाते, तर कार्बन डायऑक्साइडची पातळी वाढविली जाते.

कांद्याची साठवणूक, प्रतवारी आणि पॅकिंग या बाबी काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यात आणि बाजारमूल्य सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कोल्ड स्टोअरेज आणि नियंत्रित वातावरण साठवणूक सारखी प्रगत आंतरराष्ट्रीय साठवणूक तंत्रे निर्यातीसाठी कांद्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मदत करतात. आधुनिक साठवणूक आणि पॅकिंग पद्धतींचा अवलंब करून उत्पादित कांद्यास अपेक्षित दर मिळण्यास मदत मिळते.

- राहुल घाडगे, ९४२२०८००११

(कृषी विस्तार विषयतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT