Pune News : देशातील रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी संयुक्त खताचे दर वाढविण्यास सुरुवात केली आहे. ही दरवाढ ५० किलोच्या गोणीमागे १०० ते २५० रुपयांपर्यंत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एक जानेवारीपासून रासायनिक खतांचे दर वाढणार, अशी चर्चा गेल्या तीन महिन्यांपासून चालू होती. डीएपीची ५० किलोची गोणी बाजारात १३५० रुपयांना विकली जात होती. हीच गोणी १५५० ते १५७५ रुपयांच्या आसपास मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, केंद्राने हस्तक्षेप करीत डीएपीवरील वाढीव अनुदान मार्चपर्यंत कायम ठेवले. त्यामुळे डीएपीच्या दरात कोणत्याही कंपनीने वाढ केली नाही. परंतु संयुक्त खताबाबत केंद्र सरकार मूग गिळून बसले आहे.
खत उद्योगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की डीएपीसह सर्वच संयुक्त खतांच्या किमती वाढविण्याच्या मनःस्थितीत कंपन्या होत्या. कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा माल महागल्याने सर्व कंपन्यांना तोट्यात संयुक्त खते विकावी लागत होती. ही बाब केंद्राच्या निदर्शनास आणून दिली होती.
परंतु केंद्राने डीएपी वगळता इतर खतांबाबत वाढीव अनुदान देण्याविषयी कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे एक प्रकारे दरवाढ करण्याबाबत कंपन्यांना केंद्रानेच आतून हिरवा कंदील दिला. परिणामी, आता एक जानेवारीपासून उत्पादित होणारी खते वाढीव दराने विकण्याची तयारी खत कंपन्यांनी केली आहे.
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, अद्यापही अनेक खत कंपन्यांनी वाढीव किमतीबाबत कृषी विभागाला माहिती दिलेली नाही. परंतु इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को), पारादीप फॉस्फेट लिमिटेड (पीपीएल) व महाधन अॅग्रिटेक लिमिटेड या तीन नामांकित कंपन्यांनी माहिती दिली आहे.
या कंपन्यांनी संयुक्त खतांच्या काही श्रेणीमधील किमती वाढवल्याचे कळवले आहे. या कंपन्या आता १०:२६:२६ च्या दरात ५० किलोच्या प्रति गोणीमागे २०० ते २५० रुपये वाढ करीत आहेत. त्यामुळे हे खत आता शेतकऱ्यांना १७०० ते १७२५ रुपये दराने विकत घ्यावे लागेल. २०:२०:०:१३ या श्रेणीच्या खताचे दर देखील प्रतिगोणी ५० ते १०० रुपयांनी महागले आहेत.
त्यामुळे प्रतिगोणी १२०० ते १३०० रुपये प्रतिगोणी दराने विकले जाणारे २०:२०:०:१३ श्रेणीचे खत आता १३०० ते १३५० रुपये दराने विकत मिळणार आहे. इफ्को या श्रेणीची किंमत आधीपासून कमी म्हणजेच १२०० रुपये प्रतिगोणी ठेवली होती. सुधारित दरानुसार आता इफ्कोने देखील या श्रेणीची किंमत १३०० रुपये केली आहे.
दरम्यान, एक जानेवारीपासून उत्पादित होणाऱ्या खतांवरच नवी दरवाढ लागू असेल. त्यामुळे आधीच्या साठ्यातील खते जुन्या किमतीनुसारच विकली जातील, असे कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ‘‘युरिया वगळता आता सर्वच रासायनिक खते महागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकाला अंदाजे खते देणे बंद करावे. माती परीक्षण व पिकाच्या गरजेनुसार संतुलित खत मात्रा द्याव्यात. नामांकित कंपन्यांची खते वापरावीत. तसेच, पक्की पावती घेतल्याशिवाय खत विकत घेऊ नये,’’ असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
विक्रीवर परिणाम होणार नसल्याचा दावा
खत उद्योगातील एका नामांकित कंपनीच्या व्यवस्थापकाने सांगितले, की खत निर्मितीमध्ये तोटा होत असल्यामुळे बहुतेक कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता. राज्यात संयुक्त खतांचे दर वाढले असले तरी खताच्या विक्रीवर मोठा परिणाम होईल, असे वाटत नाही. कारण, नगदी पिके घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. संयुक्त खतांच्या मात्रा दिल्याशिवाय चांगले उत्पादन घेता येत नसल्यामुळे ही दरवाढ बाजारपेठेवर प्रतिकूल परिणाम करणार नाही, असे वाटते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.