Crop Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Variety : सोयाबीन, हरभरा, कपाशी, तीळ वाणांचा राजपत्रात समावेश

Soybean Variety : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केल्यामुळे या वाणांचे बीजोत्पादन हे मुख्‍य बियाणे साखळीमध्ये घेता येणार आहे.

Team Agrowon

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या (वनामकृवि) हरभऱ्याचा परभणी चणा १६ (बीडीएनजी २०१८-१६), सोयाबीनचा एमएयूएस-७३१, देशी कपाशीचा पीए-८३३, अमेरिकन कपाशीचा एनएच-६७७, तिळाचा टीएलटी-१० या पिकांच्‍या ५ वाणांचा केंद्रीय बियाणे समितीच्‍या शिफारशीनुसार भारत राजपत्रात समावेश करण्‍यात आला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केल्यामुळे या वाणांचे बीजोत्पादन हे मुख्‍य बियाणे साखळीमध्ये घेता येणार आहे.

याविषयी बोलताना कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा म्हणाले, ‘‘देशाच्‍या राजपत्रात समावेश केल्‍यामुळे या वाणांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर होईल.’’ हे वाण विकसित करण्‍यास योगदान देणारे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. खिजर बेग, डॉ. व्ही. एन. चिंचाणे, डॉ. डी. के. पाटील, डॉ. एस. पी. मेहेत्रे, डॉ. व्ही. के. गिते, डॉ. मोहन धुप्पे शास्‍त्रज्ञांचे कुलगुरू डॉ. मिश्रा यांनी अभिनंदन केले.

हरभरा, अमेरिकन कपाशी, तीळ पिकांच्या वाणास महाराष्‍ट्रात लागवडीकरिता, तर सोयाबीनच्या वाणास मराठवाडा विभागात लागवडीकरिता मान्‍यता मिळाली. देशी कपाशीच्या वाणास दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू राज्‍याकरिता लागवडीस मान्‍यता मिळाली असे संशोधन संचालक तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ. बेग यांनी सांगितले.

वाणांची वैशिष्ट्ये ः

सोयाबीन : एमएयूएस-७३१ हा वाण ९४ ते ९८ दिवसांत परिपक्व होतो. पाने निमपसरी, गोलाकार व मोठी. शेंगाचे प्रमाण अधिक व गुछ्यामध्ये शेंग. तीन दाण्यांच्या शेंगांचे अधिक प्रमाण. शेंगा फुटण्यास पंधरा दिवस सहनशील. कोरडवाहूत अधिक उत्पादन, कीड व रोगास प्रतिकारक. शंभर दाण्यांचे वजन १३ ते १५ ग्रॅम, उत्पादकता हेक्टरी २८ ते ३२ क्विंटल, तेलाचे प्रमाण २०.५ टक्के, तर प्रथिनांचे प्रमाण ४०.५ टक्के.\

हरभरा : परभणी चणा-१६ (बीडीएनजी २०१८-१६) वाण : बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेला हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित करण्यात आला. सरासरीपेक्षा अधिक उत्पादन देणारा, ११० ते ११५ दिवसांत परिपक्व होतो. दाणे टपोरे, शंभर दाण्याचे वजन २९ ग्रॅम, मर रोगास प्रतिकारक, किडींचा प्रादुर्भाव तुल्यबळ वाणापेक्षा कमी.

देशी कपाशी : पीए-८३३ वाण :अखिल भारतीय समन्वित कापूस सुधार प्रकल्पामार्फत विकसित हा वाण १५० ते १६० दिवसांत परिपक्व होतो. उत्पादकता हेक्टरी १५ ते १६ क्विंटल, तर रुईचा उतारा ३५ ते ३६ टक्के आहे. धाग्याची लांबी २८ ते २९ मिलिमीटर. विशेष गुणधर्म म्हणजे धाग्याची लांबी व मजबुती, रस शोषक किडी, कडा- करपा व दहिया रोगासह पाण्याच्या ताणास सहनशील आहे.

अमेरिकन कपाशी : एनएच-६७७ या वाणाचा कालावधी १५५ ते १६० दिवस आहे. उत्पादकता हेक्टरी १४ ते १५ क्विंटल, तर रुईचा उतारा ३७ ते ३८ टक्के आहे. धाग्याची लांबी २५ ते २६ मिलिमीटर आहे. पाण्याचा ताण व रस शोषक किडींस सहनशील असून सघन पद्धतीने लागवडीस योग्य आहे.

तीळ : टीएलटी-१० वाण : लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्राद्वारे विकसित हा वाण ९० ते ९५ दिवसांत परिपक्व होतो. खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागवडीकरिता शिफारस आहे. उत्पादकता हेक्टरी ६ ते ७ क्विंटल. हजार बियाचे वजन ३.५ ते ४.० ग्रॅम भरते. तेलाचे प्रमाण ४५ ते ४७ टक्के आहे. सर्कोस्पोरा पानावरील ठिपके, अल्टरनेरिया व भुरी रोगास प्रतिबंधक याबरोबरच तुडतुडे, पाने गुंडाळणारी, बोंडे पोखरणारी अळी या किडीस सहनशील आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Vidhansabha Election : अहिल्यानगर जिल्ह्यात बंडखोरीने पक्षीय उमेदवारांचे वाढवले ‘टेन्शन’

Cotton Market : दर्यापूर बाजार समिती यार्डवर होणार कापूस लिलाव

Paddy MSP : भातपिकाला हमीभावाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Livestock Census Survey : जळगावात पशुगणना सर्व्हेक्षण सुरू

Karnataka Sugar Factories : कर्नाटक सीमाभागातील साखर कारखाने सुरू; कोल्हापूर विभागातील उसाची होणार पळवापळवी

SCROLL FOR NEXT