Kolhapur News : यंदा पावसाचा कालावधी वाढल्यामुळे रब्बी हंगाम एक महिना लांबणीवर पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५५३० हेक्टरवर रब्बी हंगामातील पेरणी झाली आहे. या हंगामात सर्वत्र पाणी उपलब्ध असल्यामुळे पिकांना तीन व अधिक संरक्षित पाणी मिळेल, असे चित्र आहे. कोरडवाहू डोंगरी भागात नाचना, भुईमूग काढणीला वेग आला आहे. पावसाळ्यात पेरणी केलेला बांधावरचा वरणा तरारला आहे.
यंदा जानेवारीपासून पावसाळ्यासह आजपर्यंत जिल्ह्यात १४९८ मिलिमीटर म्हणजे १४० टक्के पाऊस झाला आहे, अशी माहिती विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अशोक कुमार पिसाळ यांनी दिली. पावसाचे प्रमाण अधिक राहिले. यामुळे हंगाम एक महिना पुढे जात डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
जिल्ह्यात सर्वसाधारण २१ हजार हेक्टर रब्बी हंगामातील क्षेत्र असते. यामध्ये रब्बी हंगामातील ज्वारी १२ हजार हेक्टरवर केली जाते. आतापर्यंत ज्वारीची ३५०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. मका व हरभरा दोन्ही मिळून सुमारे ४०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. रब्बी हंगामातील मुख्य पीक गहू होते. मात्र, रेशनवर गहू मिळतो.
यामुळे शेतकऱ्यांनी गहू पिकाकडे पाठ फिरवविली आहे. गव्हाचे सर्वसाधारण १६०० हेक्टर क्षेत्र असते. अद्याप तीन ते पाच हेक्टरवरच पेरणी झाली आहे. पाऊसमान चांगले झाल्याने सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे यंदा रब्बी हंगामाला किमान तीन व जास्तीत जास्त जादा संरक्षित पाणी मिळेल. यामुळे हंगामात अपेक्षित उत्पादन मिळेल, असे चित्र आहे.
दरम्यान, अद्याप खरीप हंगामातील भात कापणी सुरू आहे. यातच निवडणूक व साखर कारखान्यांचे हंगाम पुढे जात आहेत. खोडवा ऊस पीक तुटल्यानंतर रब्बी हंगामाच्या कामाला गती येणार आहे. यानंतर हरभरा, ज्वारी, मका अशी पिके घेतले जातात. तसेच हंगामात १८ हजार हेक्टर आडसाली हंगामाचे ऊस पीक असते.
आता प्रत्यक्ष सुमारे १८ हजार हेक्टरवर आडसाली लागण झाली असून, यंदा क्षेत्र वाढून २५ हजार हेक्टर होईल, असा अंदाज कृषी खात्याने वर्तवला आहे. तसेच पूर्व हंगामी लागणीला सुरुवात झाली आहे.
गहू, हरभरा पेरणीला अडचणी
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडला. यामुळे हवेत रात्री गारठा असला तरी थंडी गायब आहे. अपेक्षित थंडी पडली नसल्यामुळे गहू, हरभरा पेरणीला अडचणी निर्माण झाल्या आहेत.
रब्बी हंगामासाठी खते, बियाणे मागणी प्रमाणात उपलब्ध आहेत. नोव्हेंबर व डिसेंबरसाठी ५७ हजार टन खत शिल्लक आहे. खरिपातील पीक काढणी सुरू आहे.- जालिंदर पांगरे, जिल्हा कृषी अधीक्षक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.