संदीप नवले
Women Self Help Group : झेंडेवाडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील महिलांनी एकत्रित येऊन तीन वर्षांपूर्वी पुरंदर लक्ष्मी शेतकरी महिला प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. कंपनीच्या माध्यमातून सीताफळ, अंजीर या फळांवर प्रक्रिया उद्योग सुरू झाला. उत्पादित प्रक्रिया उत्पादने कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवून मागणीनुसार विक्री केली जाते. यामुळे गावातील महिला शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला आर्थिक आधार मिळाला आहे.
पुणे -सासवड रस्त्यांवर झेंडेवाडी हे सुमारे अडीच ते तीन हजार लोकसंख्येचे गाव. या शिवारात अनेक शेतकरी अंजीर आणि सीताफळाचे उत्पादन घेतात. गावातील वीस महिलांनी एकत्र येत मार्च बचत गट तयार केला. त्यानंतर २०२० मध्ये पुरंदर लक्ष्मी शेतकरी महिला प्रोड्यूसर कंपनी स्थापन प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला भागभांडवल किती लागेल यांची फारशी कल्पना नसल्याने त्यांनी कृषी विभागाचे कृषी संचालक दिलीप झेंडे, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांच्याकडून तांत्रिक माहिती समजून घेतली.
या महिला कंपनीमध्ये सुमारे ४०० महिला सभासद आहेत. तसेच ३० टक्के पुरुष सभासददेखील आहेत. कंपनीच्या कार्यकारिणीमध्ये १४ महिला संचालक आहेत. कंपनीसाठी येणारा खर्च लक्षात घेऊन कंपनीतील प्रत्येक महिला संचालकांकडून एक लाख रुपये, असे एकूण १४ लाख रुपयांचे शेअर्स जमा केले. तसेच सभासदांकडून ५०० ते १००० रुपयांचे शेअर्स घेण्यात आले. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर महिलांनी कंपनीची उभारणी केली. फळपिकावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रणांची खरेदी केली. सध्या कंपनीचे अध्यक्षा म्हणून संगीता विठ्ठल झेंडे आणि सचिव म्हणून स्नेहल विशाल खटाटे या कार्यरत आहेत.
फळ प्रक्रिया केंद्राची उभारणी :
झेंडेवाडी शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागांचे क्षेत्र आहे. उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. कमी दर असण्याच्या काळात शीतगृहामध्ये फळांची साठवण किंवा प्रक्रिया करून साठवण केल्यास चांगला दर मिळू शकतो हे महिलांच्या लक्षात आले.
त्यानंतर या महिला कंपनीने प्रक्रिया उद्योग राबविण्यासाठी योग्य पावले उचलली. त्यासाठी घरच्या व्यक्तींकडून योग्य मार्गदर्शन मिळाले. सर्वांगीण अभ्यास करून प्रक्रिया प्रकल्प उभा करण्याचे कंपनीने निश्चित झाले. सध्या महिला कंपनीच्या कार्यक्षेत्रामध्ये ४०० एकर क्षेत्र आहे. त्यामध्ये अंजीर, सीताफळ, पेरू, चिकू, आंबा या फळपिकांची मोठ्या प्रमाणात लागवड आहे.
कंपनीने सुरुवातीला जवळ असलेल्या भागभांडवलाचा अंदाज घेऊन दहा गुंठे क्षेत्रावर पत्र्यांचे शेड उभारले. त्यानंतर प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी यंत्रणा खरेदी केली. यामध्ये हार्डनर, पल्पर, वजन काटा, पॅकिंग यंत्राची खरेदी केली. यासाठी सुमारे एक कोटी ६३ लाख ५४ हजार रुपयांचा खर्च आला. कंपनीला कृषी विभागाच्या विविध योजनांतून ९८ लाख ११ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. कंपनीने बॅंकेकडून ५२ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.
नवीन शेडमध्ये प्रक्रिया यंत्रणा बसवून झाल्यानंतर महिलांनी पहिल्यांदा सीताफळावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली.
प्रत्येकी महिला सदस्याकडे एक ते दोन एकर अंजीर, सीताफळ, पेरूची फळबाग आहे. फळांची काढणी केल्यानंतर प्रतवारी केली जाते. त्यानंतर क्रेटमधून फळांची वाहतूक केली जाते. चांगल्या प्रतीच्या फळांचा प्रक्रियेसाठी वापर केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांत फळे कमी पडत असल्याने गावातील शेतकरी तसेच बाजारपेठेतून सीताफळ, अंजीर, पेरू, चिकू या फळांची खरेदी केली जाते.
फळांवर प्रक्रिया ः
ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन कंपनीने तीन वर्षांपूर्वी शेतामध्ये फळांवर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शेतात प्रक्रिया केंद्राची उभारणी केली. प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या विविध यंत्रांची खरेदी करण्यात आली. या केंद्रामध्ये सध्या सीताफळ पल्प तयार करतो. येत्या काळात आंबा, चिकू, पेरू, अंजीर, स्ट्रॉबेरी, जांभूळ, रासबेरी, मलबेरी, लिची, तसेच मका, वाटाण्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे.
विविध प्रकारची फळे नैसर्गिक पद्धतीने पिकवली जातात. त्यानंतर हॅण्डमेड पद्धतीने त्यावर प्रक्रिया केली जाते. कंपनीने सध्या फळांपासून पल्प आणि स्लाइसेस तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर ही उत्पादने उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात सात ते आठ तास ठेवून हार्डनिंग केले जाते. पुन्हा उणे २० अंश सेल्सिअस तापमानात साठवून ठेवले जातात. काही वेळेस फळे विकत घेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते. हे सर्व कामकाज कंपनीतील महिला पाहतात.
महिलांना मिळाला रोजगार :
कंपनीने प्रक्रिया उद्योग सुरू केल्यामुळे परिसरातील महिलांना रोजगार मिळण्यास मदत झाली. सध्या प्रक्रिया उद्योगामध्ये सुमारे १५ ते २० महिला काम करीत आहेत. येत्या काळात प्रक्रिया प्रकल्प संपूर्ण क्षमतेने चालू झाल्यास किमान ५० ते ६० महिलांना रोजगार मिळणार आहे.
शीतगृहाची उभारणी ः
बाजारात काही वेळा फळे, भाजीपाल्याचे दर पडून नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी कंपनीने ४० टन क्षमतेच्या शीतगृहामध्ये फळे, भाजीपाल्याची साठवण केली जाते. त्यामुळे टिकवण क्षमता वाढली आहे. जेव्हा बाजारपेठेत दर वाढतात त्या वेळी शीतगृहात ठेवलेली फळे, भाजीपाल्याची विक्री केली जाते.
त्यामुळे चांगला दर मिळण्यास मदत होते. याशिवाय ताजी फळे, भाज्यांच्या साठवणुकीसाठी दहा टन क्षमतेचा प्रीकूलिंग चेंबर आहे. प्रक्रिया पदार्थ साठविण्यासाठी दहा टन क्षमतेची चिलर रूम आहे. एक टनाचे ब्लास्ट फ्रिजर कंपनीच्या प्रकल्पात आहे.
मिळविली शहरी बाजारपेठ...
सध्या सीताफळ आणि अंजीर या फळांवर प्रक्रिया केली जाते. ज्यावेळी दर कमी असतात त्यावेळी फळांवर प्रक्रिया करून शीतगृहात साठवणूक केली जाते. त्यानंतर टप्याटप्याने प्रक्रिया उत्पादनाची विक्री केली जाते. सध्या पुणे, मुंबई शहरातील विविध मॉलमध्ये फ्रोझन सीताफळ पल्पची विक्री केली जाते.
मागणीनुसार एक किलो, पाच किलो, दहा किलोमध्ये पॅकिंग केले जाते. प्रक्रिया केल्याने चांगला दर मिळत आहे. दरवर्षी प्रक्रिया केलेल्या शेतीमालास प्रति किलो १२० ते १६० रुपये दर मिळतो. ग्राहकांची मागणी आणि आवड लक्षात घेऊन प्रक्रियायुक्त मालाची पुण्यातील मॉल, प्रदर्शने, शासनामार्फत आयोजित केलेल्या विविध स्टॉलवरून विक्री केली जाते.
पहिल्या वर्षी सीताफळ पल्पची साधारण विक्री झाली होती. दुसऱ्या वर्षी त्यात काही प्रमाणात वाढ झाली. सध्या दर महिन्याला दोन टनांपर्यंत सीताफळ पल्पची विक्री होते. गेल्या वर्षी दहा ते बारा लाखांच्या दरम्यान उलाढाल झाली. वाहतूक, फळांची खरेदी, मजुरी, इतर खर्च असा मिळून सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचा खर्च झाला.
खर्च वजा जाता महिला कंपनीला एक ते दीड लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले. यंदाच्या वर्षी उलाढालीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. येत्या काळात फळांपासून कुल्फी आणि आइस्क्रीम निर्मिती प्रकल्पाचे नियोजन कंपनीने केले आहे.
-------------------------------------------------------------
संपर्क ः संगीता विठ्ठल झेंडे, ८६०५९२०४०२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.