Soil Management Agrowon
ॲग्रो विशेष

World Soil Day : मातीमोल नव्हे, माती तर ‘अनमोल’

Soil Management : जेव्हापासून शेतीमध्ये माणसाने मातीची उलथापालथ सुरू केली तेव्हापासून मातीचं मातीपण लयाला जात आहे. आजच्या जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून आपण सर्वांनी मातीला मोल असते हे स्वीकारले तर ती मानवजातीच्या कल्याणासाठी एक प्रेरणा ठरू शकेल.

विजय कोळेकर

Soil Conservation : मातीला मूल्य असते हे मान्य नसणारा मानव समाज काही हजारो वर्षांपासून या पृथ्वीतलावर राज्य करतो आहे. मानवाला त्याच्या माहिती असलेल्या इतिहासात मातीच्या महतीविषयी फारच किंचित ज्ञान प्राप्ती झाली आहे, असे मानावयास काही हरकत नसावी. ज्या मातीशिवाय एकूणच या वसुंधरेचं अस्तित्व धोक्यात येऊ शकते इतकी समज येत असलेल्या माणसाला त्या मातीविषयी कधी आदराने व्यक्त होताना पहिले आहे का?

‘सगळं मातीमोल झालं.., अति तेथे माती..., माझे सगळे प्रयत्न मातीत गेले, या आणि अशा समजुतीतून आपण हेच दाखवतो न की मातीला काही किंमतच नाही, किंबहुना ज्याला किंमत नाही अशी एकमेव गोष्ट म्हणजे ‘माती’!

असं काय आहे की मातीविषयी इतकी खालच्या प्रतीच्या भावना आपल्या मनामध्ये हजारो वर्षांपासून रुजल्या गेल्या आहेत. जन्मापासून मरेपर्यंत जिच्या अंगाखांद्यावर खेळायचे बागडायचे आणि शेवटी तिच्यातच मिसळून जायचे त्या मातीविषयी एवढी घृणा का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे उत्क्रांत मानवाच्या बौद्धिक आणि सामाजिक जडणघडणीमध्ये सापडतील.

जगण्यासाठी आवश्यक अन्न मातीतूनच येते हे समजल्यावर निसर्गतः अस्तित्वात असलेल्या जमिनीतून अन्न निर्माण करून घ्यायचे आणि जेव्हा अन्न निर्मिती घटायला लागली तेव्हा ती जागा (माती) सोडून दुसरीकडे नवीन जमिनीकडे जायचे ही ‘वापरा आणि सोडून द्या’ प्रवृत्ती मातीविषयी अनादराला कारणीभूत झाली असे समजण्यास मोठा वाव आहे.

उत्क्रांत मानवाचे विकसित माणसात रूपांतर होताना ही प्रवृत्ती अधिकच बळावत गेली आणि पृथ्वीवरील समस्त मातीला हवेइतकेच गृहीत धरले गेले. जसे ‘हवेचे’ महत्त्व वाटत नाही तसेच ‘मातीचे’ महत्त्व वाटेनासे झाले आहे. आपण हे विसरून चाललो आहोत की जगण्यासाठी जशी हवा आवश्यक आहे तशीच मातीही आवश्यक आहे.

सध्या ज्याला आपण माती म्हणतो ती खरचं निसर्गाने जशी दिली होती तशी माती आहे का? निसर्गाने मानवास दिलेली माती ही जिवंत होती, जिला मानवाने मृतवत केले आहे. मातीचा जिवंतपणा किती व कसा होता याचे पुरावे आजही पृथ्वीवरील काही जंगलामध्ये आणि मानवाने प्रवेश न केलेल्या बेटांवर आढळतात.

तेथील माती ही अत्यंत सृजनशील असून त्या मातीत असंख्य वनस्पती, सूक्ष्म जीव, प्राणी मुक्त संचार करतात आणि अशीच माती सर्वत्र होती. वर्षभर अंगात ओलावा टिकवून ठेवणाऱ्या या मातीतून पाणीही स्वच्छ व निर्मळपणे वाहत असे. ना पाण्यात गढूळपणा ना मातीत कोरडेपणा. मातीच्या याच गुणांमुळेच तर बुद्धी असलेला मानव शेतीकडे वळला.

शेती करणे हे मातीच्या या गुणधर्मांना इजा न पोहोचू देता माणसाची भूक भागविण्यासाठी करावयाची कृती होती, इथपर्यंत सारे काही ठीक चालले होते. पण जेव्हापासून शेतीमध्ये माणसाने मातीची उलथापालथ सुरू केली तेव्हापासून मातीचं मातीपण लयाला लागलं.

जमिनीच्या वरच्या थरातील सजीव माती नष्ट होत चालली आणि मग जमिनीमध्ये शिल्लक राहिला तो भुगा- रासायनिक गुणधर्म असलेला, निष्क्रिय, कोठे हवेविना गुदमरलेला तर कोठे शुष्क आणि जिवंतपणाचा अभाव असलेला.

या काळात किती जिवंत माती नष्ट झाली असेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. १८४९ साली अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या ‘द लॅंड’ या मासिकात असे म्हटले आहे की १००० दशलक्ष डॉलर खर्चून देखील १०० दशलक्ष एकरवरची माती पूर्ववत करता येणार नाही. मग आज आपण पिकवितो आहोत त्या जमिनीत कोणत्या प्रतीची माती आहे हे लक्षात येईल.

सजीव मातीची कधीही धूप होत नाही. तर आज जी धूप होताना दिसतेय ती मातीची नसून ज्या कणांपासून माती तयार होते त्या कणांची होत आहे. म्हणजे मातीचे सजीवपण आणि मातीचे मूळ कण दोन्हीचाही ऱ्हास होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणून धोका वाढत चालला आहे.

दिवसेंदिवस वाढत असलेला धोका आपल्या पायाशी आला असताना, आजच्या आधुनिक युगातील माणूस शांत कसा? असा प्रश्न त्या भूमातेलाही पडला असणार. अनेक शतकापासून पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर कदाचित निसर्ग आपल्याला दाखवतही असेल पण आपल्यालाच ते दिसत नाही.

आपण म्हणतो की ‘कानापेक्षा डोळ्यांवर विश्वास ठेवावा’, पण येथे डोळ्यांनी जे पहिले त्याच्यावरही विश्वास ठेवायला माणूस मागेपुढे पाहतोय. प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीच्या बांधावर नजर टाकत असतो आणि त्याला दिसते की तो बांध बहुतांशी वेळा हिरवागार असतो, त्यामध्ये वर्षभर थोडाबहुत ओलावा असतो, आतल्या जमिनीपेक्षा थंड असतो, कोणतीही मशागत न करता त्यावर प्रत्येक वर्षी भरपूर गवत वाढते, जनावरे खातात आणि पुन्हा ते वाढते.

पण यावर शेतकरी विश्वास ठेवत नसून जमिनीवर मशागतीची कामे करतच आहे. ‘जेथे मशागत थांबते, तेथे समस्या थांबतात’ असे १९४३ साली एडवर्ड फॉक्नर या अमेरिकेतील कृषी शास्त्रज्ञाने ‘प्लोमन्स फॉली’ या पुस्तकात नमूद करून त्या काळी जगभरात एकच नारा दिला होता की ‘शेतीमधून नांगर हद्दपार झाला तरच माती टिकेल.’

याच तत्त्वाला धरून आपल्या देशात हा विचार महाराष्ट्राच्या मातीतून अंकुरत असून कोल्हापूरचे प्रतापराव चिपळूणकर, रायगडचे चंद्रशेखर भडसावळे, संभाजीनगरचे अतुल मोहितेंचे सर्व सहकारी शेतकरी, यवतमाळचे नौशाद पठाण या आणि अशा पाच हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी मातीच्या आणि पर्यायाने शेतीच्या या समस्येला हात घातला आहे.

देशात एक नव्या क्रांतीचा नारा दिला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदनचे असेच क्रांतिकारी शेतकरी नारायण सहाने यांनी स्वतःच्या शेतीमधील जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी मशागत थांबवून उत्तम उदाहरण घालून दिलेले आहेच . पण ते तमाम शेतकरी बांधवांना काव्यरुपाने कळकळीचे आवाहनही करतात.

तू किती दिवस मला नांगरायाचे,

मी किती दिवस हे सोसायचे

त्रास खूप झाला मला आता

मी कसे पिकायचे,

हळू हळू वाहतो मातीचा थर

आणि सुपीक जमीन वाहून जाते दूरवर

हे सर्व दिसूनही आंधळा राहतो तू कुठवर

आता मला नाही हे झेलायचे

सांग कसे मी पिकायचे...

आजच्या जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून आपण सर्वांनी मातीला मोल असते हे स्वीकारले तर ती मानवजातीच्या कल्याणासाठी आणि सुखाने जगण्यासाठी एक प्रेरणा ठरू शकेल.

(लेखक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे मृदा विज्ञान विशेषज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT