Soil Management : जमिनीची निचरा शक्ती सुधारणे गरजेचे...

Article by Pratap Chipalunkar : पाणी जमिनीत एका ठरावीक वेगाने मुरत असते. याला जमिनीची निचरा शक्ती असे म्हणतात. पिके घेण्याच्या नियोजनात निचराशक्ती कमी होत असते; त्यामुळे शेतकऱ्यांनी ती प्रयत्नपूर्वक वाढविणे गरजेचे आहे.
Soil Management
Soil ManagementAgrowon

Drainage of Soil : पाणी उपसणे यावर जितके संशोधन होते, त्यामानाने जमिनीत पाणी जिरवण्यावर फारशी चर्चा होत नाही. डोंगर माथ्यावर पाणी जिरणे व शेतजमिनीत पाणी जिरवणे, असे दोन थोडे वेगळे प्रकार आहेत. डोंगर उतारावरील पाणी जिरणे हे आपण एका स्वतंत्र लेखातून पाहणार आहोत. शेतजमिनी व त्यालगतचा सपाट भाग या ठिकाणी जमिनीत पाणी मुरण्याचा या लेखात अभ्यास करूयात. ओलित करून रानात भरलेले गरजेपेक्षा जास्त पाणी जिरणे आणि पावसाचे पाणी जिरणे असे दोन भाग भाग आहेत.

पाणी जमिनीत एका ठरावीक वेगाने मुरत असते याला जमिनीची निचरा शक्ती असे म्हणतात. ही जशी नैसर्गिक असते तसे ती सतत कमी जास्त होत असते. पिके घेण्याच्या कामात ती कमी होत असते; तर शेतकऱ्यांनी ती प्रयत्नपूर्वक वाढवायची असते. पावसाचे पाणी ज्या वेळी निचरा शक्तीपेक्षा कमी वेगाने पडत असते, त्या वेळी पाणी जिरून जाते. निचरा शक्तीपेक्षा पाऊस पडण्याचा वेग ज्या वेळी जास्त असतो अशा वेळी पाणी आडवे वाहू लागते.

मातीची कणरचना

मातीत सेंद्रिय कण, पोयटा माती, लहान वाळू आणि मोठी वाळू चार प्रकारचे कण असतात. सेंद्रिय कणात सर्वांत जास्त पाणी धरून ठेवले जाते. त्या खालोखाल पोयटा कणात लहान मोठी वाळूमध्ये सर्वांत कमी पाणी धरले जाते. डोंगर संपून प्रथम सपाट प्रदेश लागतो तिथे हलकी माती असते. नदीकडे, ओढ्याकडे जावे तसतसे पोयटा मातीचे कण वाढत जातात. पोयटा मातीच्या कणात माळाच्या मातीच्या तुलनेत पाणी जास्त धरून ठेवले जाते. यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत. पोयटा मातीचा कण एकूण पाच थरांचा बनलेला असतो. कणाभोवताली पाणी जमा झाले की हे थर एकमेकांपासून दूर जातात आणि दोन थरांमध्ये जास्तीत जास्त पाणी धरून ठेवले जाते. त्यामानाने माळ जमिनीतील मातीचे कण तीन थराचे असतात. हे थर एकमेकांपासून फार दूर सरकू शकत नसल्याने थोडे पाणी धरून ठेवतात.

मातीचा बारीक कण पहावयाचा असेल तर चिमूटभर माती एक पेलाभर पाण्यात टाकून ढवळावी. पाणी गढूळ होईल. या गढूळ पाण्यातील एखादा मातीचा थर चिमटीत धरा म्हटले तर ते खूप अवघड आहे. असे मातीचे बारीक बारीक कण एकत्र येऊन त्याचे दाणेदार स्वरूपात रूपांतर होते, याला शास्त्रीय भाषेत मातीची कण रचना असे म्हणतात. ही कण रचना वनस्पती अगर प्राणिजन्य पदार्थ कुजत असता एक डिंकासारखा पदार्थ तयार होतो. हा पदार्थ मातीचे कण एकत्र आणून त्याचे दाणेदार स्वरूपात रूपांतर करतो. हे दाणेदार कण पाण्यात स्थिर कण रचना आणि पाण्यात अस्थिर कण रचना अशा प्रकारचे असतात.

स्थिर कण रचनेतील कण पाण्यात विरघळत नाहीत. पाणी शोषण झाल्याने कणाचा आकार थोडासा वाढेल; परंतु कण मूळ आपला गोल आकार सोडत नाही. अस्थिर कण रचनेतील कण सभोवती पाणी झाल्यास एकमेकांपासून दूर जातात आणि गोळी मोडली जाते. पुढे पाणी आटत जाईल तसे परत कण एकत्र येऊन गोळी बनते.

लोकसहभागातून जलसंधारण

धुळे- नंदूरबार रस्त्यावर लांबकानी म्हणून गाव आहे. (ही यशकथा पूर्वी ‘ॲग्रोवन’मधून छापून आली आहे.) सदर गावात पावसाळा संपताच टँकर चालू करावा लागत असे. आठ महिने पाणीटंचाईमुळे बहुतेक तरुण मंडळ स्थलांतर करीत असे. गावाला डोंगररान भरपूर आहे. पावसाळा चालू होताच गावातील बहुतेक जनावरे डोंगरात चारण्यासाठी सोडली जात. तेथील समाजसुधारक डॉ. जनवाडकर यांनी ग्रामसभा घेऊन लोकांना आवाहन केले, की चराई बंदी आपण केली तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटेल. पुढे या प्रस्तावाला भरपूर विरोध झाला; परंतु डॉक्टर अखेर लोकांना चराई बंदीचे महत्त्व पटवून देण्यात यशस्वी झाले.

चराईमुळे मोठ्या प्रमाणावर धूप होऊन डोंगरावरील जमीन ओसाड बरड झाली होती. अशा जमिनीत फक्त खुरटे कुसळी गवत उगवते. चराई बंदी झाल्यावर सालोसाल गवताची उंची वाढू लागली. डोंगरावर सर्वत्र एकमेकांना लागून गवताचे गड्डे तयार झाले. पावसाळा अखेर पूर्ण वाढ झालेले गवत सर्व गावाने कापून नेण्याचा कार्यक्रम चाले. हे सर्व लिहिण्यामागे उद्देश हा आहे, की डोंगरात गवताच्या गड्ड्यांनी अडविल्यामुळे पाणी आडवे वाहिले नाही. मूलस्थानी जलसंवर्धन झाले.

Soil Management
Rain Update : सातारा जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

गावातील विहिरी व कूपनलिकांचे पाणी वाढले. आता ते गाव बारमाही बागायत शेती करीत आहे. टँकर पहिल्याच वर्षी बंद झाला. सर्व गावाची एकी हेच भांडवल, वैयक्तिक शेतकरी आणि सरकारवर एक पैशाचाही बोजा न टाकता हे परिवर्तन पार पाडले आहे. स्थलांतर पूर्ण थांबून सर्व स्थलांतरित परत गावात येऊन शेती करू लागले आहेत. असेच काहीसे काम धुळे जिल्ह्यात वसंतराव ठाकरे यांचे आहे. चराई बंदी व कुऱ्हाड बंदी अशा कामाची चळवळ राज्यात उभी राहणे गरजेचे होते तसे काही झाले नाही. या तंत्राने यंदासारख्या दुष्काळावरही काही प्रमाणात मात करणे शक्य आहे. पुढील वर्षही दुष्काळी असण्याची चर्चा होत आहे. फक्त सरकारने मदत करावी अशी मागणी करण्यापेक्षा वरील तंत्रे राबविल्यास अनेक संकटातून सुटका होऊ शकतो.

जमिनीची निचरा शक्तीमध्ये सुधारणा

जमिनीची निचरा शक्ती वाढविणे अगर अतिरिक्त पाणी जलद निचरून जाऊन जमिनीला लवकर वाफसा येणे हे सुपीकतेसाठी उत्तम गुणधर्म मानले जातात. कुजायला जड असणारे पदार्थ कुजविल्यास पाण्यात स्थिर कण रचना तयार होते. सहज व जलद कुजविणारे पदार्थ कुजविल्यास पाण्यात अस्थिर कण रचना तयार होते. आपण गेले हजारो वर्षे चांगले कुजलेले खत जमिनीत मिसळत आलेले आहोत.

इथे जमिनीबाहेर सेंद्रिय पदार्थ कुजविले जातात. त्यामुळे तेथे तयार होणाऱ्या डिंकाला कोणतेही काम नसल्याने डिंक तेथेच संपून जातो. याच्या जोडीला कच्चा पदार्थ म्हणजे जनावराचे शेण आणि गदाळा हा पदार्थ कुजण्यास हलका असल्याने अस्थिर कण रचना देणाऱ्या गटातील असतो. चांगले कुजलेले खत टाकण्यात तोही कधी जमिनीकडे येत नाही. यामुळे पारंपरिक पद्धतीत मशागत व पीक घेण्यातून कण रचना मोडत असते; परंतु परत जोडण्याला वाव मिळत नाही. परिणामी, जमिनीची निचरा शक्ती कमी कमी होत जाते.

Soil Management
Cotton Market : ‘सीसीआय’कडून कापूस खरेदीसाठी नोंदणी सुरू

जमिनीची निचरा शक्ती सुधारणे याला शेतीत खूप महत्त्व आहे. आम्ही पारंपरिक शेती बंद करून विना नांगरणी शेतीकडे वळल्यानंतर कुजण्यास जड पदार्थ जमिनीत कुजत गेले. अशा जमिनीची निचरा शक्तीत भरपूर प्रमाणात वाढ झाली आहे. अगदी काळ्याभोर जमिनीतही या मार्गाने निचरा शक्ती वाढविता येते. मागल्या पिकाचे अवशेष कुजविल्याने तयार होणाऱ्या पोकळ्या आपण जमीन नांगरून मशागत करून मोडून टाकतो. कापूस, तुरीसारख्या खोलवर जाणाऱ्या पिकाची मुळे यंत्र लावून उपसून काढतो आणि फेकून देतो अगर जाळतो.

धसकटे गोळा करून रानातील सर्व काडी कचरा गोळा करून रान एकदम चकचकीत केल्याशिवाय पूर्वमशागत केल्याचे समाधान मिळत नाही. पुढे गांडुळांची आराधना करतो. गांडूळ हा प्राणी कुजणारा पदार्थ खाऊन त्याचे खतात रूपांतर करण्याचे काम करणारा आहे. आपण त्याला खाण्याला जमिनीत काहीच शिल्लक ठेवत नाही. मग गांडुळे कशी वाढणार? गांडुळे खालीवर फिरून जादा पाणी निचरून जाण्याचे मार्ग तयार करतो असे बोलले जाते; परंतु त्याच्या वाढीसाठी मात्र काहीच करीत नाही. आपली सर्व कामे निचरा शक्ती संपविण्याच्या मार्गातील आहेत.

पिकांच्या अवशेषातून भूजल साठ्यात सार्वत्रिक वाढ होईल असे म्हणता येणार नाही. यासाठी बांधावर लहान मोठे वृक्ष असणे गरजेचे आहे. वृक्षांच्या मुळाला धरून जमिनीत खोलवर पाणी उतरू शकते. तसे वृक्ष विरहित जमिनीत पाणी उतरू शकणार नाही. असे मी जरी लिहिले असले तरीही एका शेतकऱ्याने नुकताच आपला अनुभव कळविला आहे. मी पारंपरिक पद्धतीने शेती करीत होतो त्या काळात पावसाळाअखेर माझ्या जमिनीतील विहिरीची पाणीपातळी १० ते १५ फूट खोल राहत असे. आता मी विनानांगरणी पद्धतीने शेती करीत आहे. चालू वर्षी पाऊसमान कमी असूनही विहीर वरपर्यंत काठोकाठ भरलेली आहे. या अनुभवातून शेतकऱ्यांनी बरेच काही शिकण्यासारखे आहे.

जमिनीत पाणी जिरून भूजल पातळी वाढण्यासाठी दोन पद्धतीचा बोलबाला महाराष्ट्रात आहे. समतल चर व चराचे भराव्यावर वृक्ष लागवड, तर दुसऱ्या पद्धतीत नद्या, नाले खोल करून त्यातील गाळ उचलून गरजेच्या जमिनीवर पसरणे गाळ उपसल्याने निचरा मोठ्या प्रमाणावर वाटून भूजल पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते. दोन्ही पद्धतीवर भरपूर काम झाले आहे व या तंत्रांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com